

Pune News: ‘‘सरकारी कार्यालयात कागद आणि फाइलींशी निगडित जुनाट कामकाज पद्धतीत गुंतून पडल्यास तुम्ही सतत पिछाडीवर राहाल. जनता आणि वरिष्ठांना तुम्ही चांगली सेवा देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मनःशांती व गुणवत्ता हवी असल्यास यापुढे खिशातला पैसा खर्च करून तंत्रज्ञानाची साधने वापरा,’’ असा सल्ला कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिला.
दिल्लीत अलीकडेच आयोजिलेल्या ‘महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताहा’च्या निमित्ताने कृषी आयुक्तांनी निवडक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यभरातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी आयुक्तांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. श्री. मांढरे म्हणाले, ‘‘शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर खूप अवघड असतो, अशी मानसिकता कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यातून तुम्ही लवकर बाहेर यायला हवे. मुळात तंत्रज्ञान सर्वांना समन सेवा देते.
भेदाभेद नष्ट करते. एलॉन मस्क यांचा आणि तुमचा जी-मेल एकाच पद्धतीचा असतो. मस्क यांच्यासा ठी स्वतंत्र जी-मेल तंत्र तयार केलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्तादेखील (एआय) सर्वांना समान सेवा देते. एआय तांत्रिकदृष्ट्या कसे काम करते याच्या खोलात तुम्ही जाऊ नका.
मात्र एआयचा नेमका उपयोग काय व त्यातून मी जलद कामे कशी करू शकतो, याचा शोध तुम्ही घ्या. सध्या सरकारी कार्यालयात कर्मचारी कमी आणि कागदेच जास्त दिसत आहेत. आपल्या कार्यालयात वेळेचे काहीच नियोजन नसते. तंत्रज्ञान वापराने नियोजन, उत्तरदायित्व, सेवेत जलदपणा व उत्कृष्टता येते. मात्र तंत्रज्ञान न वापरणारा कर्मचारी सतत ताणतणावात असतो.’’
‘कामाची द्विरुक्ती होते’
‘‘सरकारी कामकाजात सध्या क्षेत्रिय पातळीवर माहिती गोळा केली जाते. ती टाइप होते. त्याची हार्डकॉपी काढली जाते. तीच माहिती वरिष्ठ कार्यालयात पुन्हा टाइप करतात. वरिष्ठांकडून उच्चस्तरावर माहिती जाताच पुन्हा तेच घडते. जितके स्तर अधिक तितक्यावेळा एकाच माहितीवर अनेकदा उगाच काम केले जाते.
या गोंधळात अनेक चुका घडतात. हा गोंधळ आणि चुका टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच पर्याय आहे. आता कोणत्याही सरकारी कार्यालयात हस्तलिखित कागदपत्रे तयार होत नाहीत. त्यामुळे राज्यात कुठेही टाइप होणारा सरकारी कागद इतर ठिकाणाहून पुन्हा मिळवता (अॅक्सेस) येतो. त्यामुळे कामाची द्विरुक्ती टाळता येते,’’ असे कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले.
‘जुगाड कामकाज हा दुर्गुण’
‘‘नियोजन न करता आपत्ती आल्यावर कामे करू, अशी मानसिकता आपली असते. जुगाड पद्धतीने काम करण्याचा दुर्गुण तंत्रज्ञान वापराने कायमचा घालवता येतो. कमी कष्टात क्षमतापूर्ण कामाची सुविधा तंत्रज्ञान देते. सरकारी कार्यालयात आपण नेमके कोण आहोत, आपली जबाबदारी काय, वर्षभरात मला माझा विभाग कुठे न्यायचा आहे याचे उद्दिष्ट आपण ठेवले पाहिजे.
नियोजन न करता सरकारी काम केल्यामुळे चिडचिड होते. काही राहून गेले का, अशी भीती असते. त्यामुळे आनंद, स्वास्थ्य हवे असल्यास तंत्रज्ञानाची कास धरा. खरे तर कार्यालयाला उपयुक्त ठरणारी सर्व कामे तुम्ही टॅबमधून करू शकतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च येत नसून २० हजार रुपयांपर्यंत चांगले टॅब मिळतात,’’ असेही आयुक्त मांढरे म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.