Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

Kokan Departmental Agricultural Advice : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ६ ते १० मार्च या काळात दिवसाचे कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत असेल.
Mango Disease
Mango DiseaseAgrowon

Kokan Agricultural Guidance :

हवामान अंदाज :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ६ ते १० मार्च या काळात दिवसाचे कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत असेल.

विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात १० ते १६ मार्चदरम्यान कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे.

कमाल तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेला संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच रोपांना वरून सावली करावी. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी झाडाचे कडक उन्हापासून तसेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी.

आंबा

फळधारणा अवस्था

फुलकीड :

सध्या कमाल आणि किमान तापमानातील तफावत ही फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक ठरते. आंबा मोहरावर आणि फळांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड कोवळ्या साली, मोहर किंवा फळे यांचे भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो.

पाने वेडीवाकडी होऊन गळून पडतात. मोहरही काळा पडून गळून जातो. फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. लहान फळांची गळ होते. किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मि.लि.

प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास, दुसरी फवारणी ८ ते ९ दिवसांनी, थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.२ ग्रॅम.

(टीप : किडीचा संपूर्ण जीवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होत असल्याने नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते.)

Mango Disease
Desi Mango : गावरान आंब्याची गोडी वाढणार

भुरी रोग :

सध्या रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस इतके राहत असून, भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक आहे. परिणामी, तिसऱ्या टप्प्यातील मोहर आणि नुकतीच फळधारणा झालेल्या आंबा झाडांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.

रोग नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

हेक्झाकोनॅझोल (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि.

वाढते तापमान व ‘सनबर्न’ :

आर्द्रतेतील घट आणि बाष्पीभवनातील वाढीमुळे आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे प्रखर सूर्यकिरणामुळे फळे भाजण्याची, फळे तडकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात संध्याकाळी किंवा सकाळी पाणी द्यावे. ओलावा टिकून राहण्यासाठी बुंध्याभोवती आळ्यांमध्ये गवताचे आच्छादन करावे.

आंबा फळांचे फळमाशी आणि प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी आणि फळांचा आकार, वजन वाढून डाग विरहीत फळे मिळविण्यासाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना २५ × २० सें.मी. आकाराची कागदी/ वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

फळांचे उत्पादन आणि प्रत सुधारण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्का) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना साधारणत: १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

ज्या आंबा झाडांना पुरेशी फळधारणा झाली असून, पुन्हा मोहोर आल्यास अन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहराला असलेली वाटाणा ते अंडाकृती आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता असते. यासाठी झाडाला पुरेशी फळधारणा झाल्याची खात्री असल्यास जिबरेलिक ॲसिड (५० पी.पी.एम) म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी या प्रमाणे एक स्वतंत्र फवारणी झाडावर करावी. जिब्रेलिक ॲसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून घेतल्याननंतर पाण्यात मिसळावी.

मोहर/फळधारणा अवस्थेतील आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड मोहर, कोवळ्या फळातील रस शोषून घेते. परिणामी मोहराची गळ होते. त्याच प्रमाणे तुडतुड्यांच्या शरीरातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थ पानावर पडून तिथे काळी बुरशी वाढते. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहर अवस्था ५ किंवा त्यापेक्षा अधिक तुडतुडे प्रति पालवी/मोहर ही ओलांडली असल्यास फवारणी करण्यात यावी. फवारणी प्रति लिटर पाणी

Mango Disease
Mango Orchard : आंबा बागायतदारांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे

अ) बोंगे फुटण्याच्या अवस्थेत, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. अ)

ब) मोहर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत, इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.

क) वाटाणा अवस्थेत असताना, थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम.

मोहर अवस्थेत असलेल्या आंब्यामधील परागीकरण वाढविण्यासाठी मोहर फुललेल्या अवस्थेत असताना सकाळच्या वेळेस (सकाळी ९ ते १२ वा.) हलका हलवून घ्यावा. फळधारणा झालेल्या झाडावरील मोहरातील सुकलेल्या अवस्थेतील नर फुले दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडून घेतल्यास किडी- रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच कीटकनाशकाची फवारणी अधिक प्रभावी होते.

(टीप : बाग मोहर फुलणे ते फलधारणा या टप्प्यात असेल, तर कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेचीच असल्यास परागीकरणाचा कालावधी (सकाळी ९ ते १२) वगळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी फवारणी करावी.)

आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी रक्षक फळमाशी सापळे एकरी २ या प्रमाणात झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील असे टांगावेत. या सापळ्यात ठेवलेले आमिष (मिथाईल युजेनॉल) ६ ते ७ आठवड्यांपर्यंत चालते. मात्र त्यानंतर पुन्हा २ ते ३ मि.लि. मिथाईल युजेनॉल जाळीदार डब्यात ठेवलेल्या बोळ्यात घालावे. खालील साबणाचे पाणी आवश्यकतेनुसार बदलावे.

कडधान्य पिके

शेंगा अवस्था

वाल, चवळी, मूग सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून, पक्व शेंगा उन्हामुळे तडकून मोठे नुकसान होते. हे नुकसान कमी करण्यासाठी जसजशा शेंगा वाळतील, तसतशी शेंगांची तोडणी सकाळच्या वेळेस करावी. शेंगा उन्हात ४ ते ५ दिवस वाळवाव्यात. मळणी करावी.

वाल, चवळी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल तर पाणी देण्याची व्यवस्था करावी.

मोहरी

शेंगा भरणे ते पक्वता अवस्था

मोहरी पिकाच्या सुमारे ९० टक्के शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी.

कापलेले पीक उन्हात २ ते ३ दिवस वाळवावे. नंतर मळणी व उफवणी करून काडीकचरा व दाणे वेगळे करावेत.

उन्हाळी भात

फुटवे अवस्था

भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.

भात पिक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा ८७५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी.

डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (नोडल ऑफिसर, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com