
Nashik News : केंद्र शासनाने लादलेले कांदा निर्यात शुल्क आठ दिवसांत रद्द न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली.
स्व. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त मुंजवाड (ता. सटाणा) येथे शरद जोशी प्रणित शेतकरी आक्रोश मेळाव्याचे रविवारी (ता. ३) आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील होते. तर या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनवट महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष सिमा नरोडे, प्रांतिक उपाध्यक्ष देविदास पवार, कांदा उत्पादक व व्यंग चित्रकार किरण मोरे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाने, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, बागलाण तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क आकरण्याची कारवाई सुरू केल्यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याला चांगला दर मिळेपर्यंत थांबता यावे म्हणून शेतकऱ्यांनी खर्च व कर्ज काढून कांदा चाळी तयार कांदा साठवला पण सरकारच्या धोरणामुळे कांदा कमी भावातच विकावा लागत आहे. सरकारच्या अशा धरसोडीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत व हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जासाठी जप्त करून लिलाव केला जात आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी असून शासनाने हा निर्णय मागे घ्यावा व कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमचा थांबवावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सत्ताधारी पक्षाने जर शेतकरीविरोधी धोरणे बदलली नाही तर येत्या निवडणुकीत सत्ताधरी पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करून शेतकरीहिताची धोरणे असणाऱ्या पक्षाला निवडून देण्याचे आवाहन अनिल घनवट यांनी केले.
ललित बहाळे म्हणाले, की सरकार कांद्याला भाव मिळू देत नसेल तर काही वर्ष कांदा पिकवणे बंद करा, असे सांगितले. शेतकरी महिलांनी या अन्यायावरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरायचे तयारी ठेवा असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी आणि शेतकरी संघटना मुंजवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
तीन-चार वर्षांपासून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागल्यानंतर केंद्र सरकार शेतकरीविरोधी निर्णय घेऊन अंमलबजावणीसाठी तत्पर असते. तरी त्या विरोधात आक्रोशाची वेळ आली आहे, अशी भूमिका घेत बागलाण तालुका शेतकरी संघटनेने एकत्र येऊन सरकारविरोधात उभे ठाकण्याची तयारी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.