
Mumbai News : बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. १०) अचानक भेट घेतली. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कुणाचे मंत्रिपद काढून मला नको, अशी भूमिका घेतली होती. तसेच मुंडे यांची पाठराखणही केली होती.
मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वाल्मीक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. कराड हा मुंडे यांचा नीकटवर्तीय आणि व्यवसायातील भागीदार आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा त्याच्यावर संशय आहे. मात्र कराड याच्यावर खुनाच्या गुन्ह्याऐवजी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येत असून कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मुंडे यांच्या राजीमान्याची मागणी केली होती.
संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुंडे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या नेत्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती.
प्रकरण तापले असतानाच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन, केवळ संशयावरून कुणाचा राजीनामा घेऊ नये. आपण गृहमंत्री असताना तेलगीला अटक केली आणि आरोप झाल्यानंतर माझा राजीनामा घेतला. मात्र पुढे चौकशीत काहीच नसल्याचे निष्पन्न झाले. तसे या प्रकरणात होऊ नये, असे सांगत मुंडे यांची पाठराखण केली होती.
मुंडे यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळाबाहेर ठेवलेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कुणाचे मंत्रिपद काढून घेऊन मला ते नको, अशीही भूमिका भूजबळ यांनी मांडली होती. त्यामुळे मुंडे यांना बळ मिळाले. एकीकडे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना भुजबळ यांनी पाठराखण केल्यानंतर शुक्रवारी मुंडे यांनी भुजबळ यांची बांद्रा येथील एमएटी या संस्थेत जाऊन भेट घेतली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.