Akola News : बाजारपेठेत मागणी असलेल्या एका कंपनीच्या नामांकित सोयाबीन वाणासोबत इतर दुसरे वाण शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आल्यानंतर त्यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी झाल्या होत्या. हा प्रकार अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच कंपनीने बाजारपेठेतून संबंधित बियाणे परत घेतले आहे. सुमारे १०० टन बियाणे परत नेल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कपाशी बियाण्यावरून गदारोळाची परिस्थिती बनली होती. त्याच काळात मध्य प्रदेशातील एका कंपनीच्या नामांकित वाणासोबत दुसरे वाण घेतले तरच बियाणे देऊ अशी सक्ती शेतकऱ्यांना केली जात होती. याबाबत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील गणेश कंडारकर यांनी कृषी विभागाकडे लिंकिंग रोखण्याची लेखी तक्रार केली होती.
त्याशिवाय विक्रेत्यांनीही कंपनीकडून बियाणे विक्रीसाठी कसा दबाव आहे, या बाबत कृषी अधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्टपणे भूमिका मांडली होती. हा प्रकार अकोला जिल्ह्यात कंपनीच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच त्या नामांकित वाणासोबत विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवलेले इतर वाणांचे सुमारे १०० टन बियाणे तातडीने परत बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, याला अनुसरून अकोल्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीला कारणे दाखवा देत उत्तर मागितलेले आहे. कंपनीकडून सादर केलेल्या खुलाशामध्ये अशा प्रकारच्या लिंकिंगबाबत स्पष्टपणे हात झटकण्याचा प्रकार करण्यात आला. तसेच हे शोकॉज प्रकरण बंद करण्याची विनंतीही जिल्हा अधीक्षकांना करण्यात आल्याचे समजते. आता या प्रकरणात पुढील कारवाई काय होते, याकडे विक्रेत्यांसह सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
इतर जिल्ह्यांत बियाणे तसेच
अकोल्यात संबंधित कंपनीने इतर वाणांचे बियाणे परत नेल्याचे वृत्त समोर आलेले आहे. दुसरीकडे लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही विक्रेत्यांकडे शेतकऱ्यांची मागणी नसलेल्या वाणांचे बियाणे पडून आले. तेथे नामांकित वाणासोबत आलेले दुसऱ्या वाणांचे बियाणे शिल्लक असल्याचे एका विक्रेत्याकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातही शेगाव येथे सोयाबीन बियाणे लिंकिंगबाबत लेखी तक्रार झालेली आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी त्याबाबत फारसे गांभीर्य दाखवलेले नाही. ठोस कारवाई ऐवजी संबंधितांवर दाखवलेली ‘कृपादृष्टी’चर्चेचा विषय झालेला आहे.
कारवाईबाबतचा दुटप्पीपणा उघड
बियाणे, रासायनिक खते, कीडनाशकांची जादा दराने कुठे विक्री, लिंकिंग होत असेल तर तातडीने लेखी तक्रारी द्याव्यात, या बाबत मोठमोठी आवाहने वारंवार कृषी विभाग करीत असतो. दुसरीकडे तक्रारी होऊनही केवळ देखाव्याखातर कृषी विक्रेत्यांकडे चौकशी झाली. मात्र बियाणे कंपनीविरुद्ध ठोस कारवाई केल्या जात नसल्याने प्रशासनाचा दुटप्पीपणाही उघड झालेला आहे.
दुसरीकडे आता नामांकित सोयाबीन वाण मिळत नसून काहींनी त्याची साठेबाजी केल्याचा संशय शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे व्यक्त करीत बियाणे पुरवठा व प्रत्यक्ष झालेल्या विक्रीचा तपशील जनतेसाठी खुला करण्याची तोंडी मागणी शेगावमध्ये केली आहे. त्यावर काहीही झालेले नसल्याचे तक्रारदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.