Fertilizer Adulteration : जैविक, सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ

Chemical Fertilizers : शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत रब्बी हंगामाला सामोरे जात असताना कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. जैविक व सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ करणाऱ्या चार कंपन्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Adulteration of Fertilizers
Adulteration of FertilizersAgrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत रब्बी हंगामाला सामोरे जात असताना कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. जैविक व सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ करणाऱ्या चार कंपन्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३६ टन साठा जप्त केला असून त्याची किंमत ८ लाख ७० हजार आहे.

नाशिक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून ही कारवाई पारोळा (जि. जळगाव) व नंदुरबार येथे करण्यात आली आहे. जैविक व सेंद्रिय खतांच्या नावाखाली दुय्यम आणि स्वस्तातील रासायनिक खतांची भेसळ करून डीएपी व पोटॅश या महागड्या खतांच्या नावाने विक्री करण्याचा हा प्रकार असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Adulteration of Fertilizers
Soil Fertility : जमिनीची सुपीकता का कमी होते ?

खत निरीक्षक तथा गुण नियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. पारोळा येथील कृषी सेवा केंद्र चालकाने कंपनीविरुद्ध दिलेल्या माहितीवरून काही कंपन्यांची जैविक खते बायो फर्टीलायझर, नायट्रोजन व फास्फेट सोल्युबिलायझिंग, पोटॅश मोबीलायझिंग, बायो फर्टिलायझर (KMB) बॅक्टेरिया आणि सिटी कंपोस्ट सेंद्रिय खते ही खते बायो एनपीके, बायो पोटॅश, बायो डीएपी अशा दिशाभूल करणाऱ्या नावाने या विक्रेत्याकडे प्राप्त झाली होती.

तसेच नंदुरबार येथील कृषी सेवा केंद्रात बायो डीएपी या नावाने कॉन्सरशिया हे जैविक खत प्राप्त झाले होते. या खतांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यानंतर तंत्र अधिकारी ठाकूर यांनी यांनी या खतांचे नमुने काढून नाशिक येथील प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते.

त्यात खत चाचणी प्रयोगशाळेने या खतांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि जिप्सम सारख्या दुय्यम व निकृष्ट दर्जाच्या खतांचे भेसळ असल्याचे निष्पन्न झाले. ही रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर या जैविक व सेंद्रिय खतांमध्ये आढळून आली.

सुप्रीम कामधेनु फर्टिलायझर (वडोदरा), रामिकर ॲग्रो इंडस्ट्री (सुरत), किसान भारती फर्टिलायझर सचिन (सुरत) आणि बायोफॅक इनपुट प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) या खत उत्पादक कंपन्यांवर पारोळा (जि. जळगाव) व नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

Adulteration of Fertilizers
Fertilizer Sale : आता ६०० सोसायट्यांत बियाणे, खतांची विक्री

या चार कंपन्यांची एकत्रित भेसळीची खते जप्त करण्यात आली. या कारवाईसाठी गुणवत्ता नियंत्रण संचालक विकास पाटील व विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खत निरीक्षक तथा गुण नियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांनी सहकार्य केले.

राज्यात कोणत्याही खतांची किंवा कीटकनाशकांच्या उत्पादनांमध्ये भेसळ असल्यास अशा सर्व कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी भेसळ निदर्शनास आल्यास किंवा शंका आल्यास कृषी सेवा केंद्र चालकांनीही माहिती कृषी विभागात द्यावी.

शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे सेंद्रिय, जैविक खते संशयास्पद वाटल्यास नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांची संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अशी खते खरेदी करण्यापूर्वी कृषी अधिकाऱ्यांची संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा व काही अनुचित प्रकार वाटल्यास ९८२२४४६६५५ या व्हॉट्सअप नंबरवर कळविण्यात यावा, असे आवाहन गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com