Sugar Factory : विरोधकांच्या कारखान्यांवर फुली

Sugar Industry Update : राजकीय साथ नाकारलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या दोन आमदारांच्या साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’च्या कर्जाला देण्यात आलेल्या थकहमीवर राज्य सरकारने फुली मारली आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राजकीय साथ नाकारलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या दोन आमदारांच्या साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’च्या कर्जाला देण्यात आलेल्या थकहमीवर राज्य सरकारने फुली मारली आहे. तसेच भाजप आणि अजित पवार समर्थकांच्या चार कारखान्यांचा थकहमीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत सत्ताधाऱ्यांसमवेत आलात तरच मदत अन्यथा कोंडी, असे धोरण अवलंबल्याने साखर उद्योग अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सहकारी प्राधिकरणाने राज्यातील १३ कारखान्यांना १८९८ कोटी रुपये थकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. यास राज्य सरकारने थकहमी दिली होती. मात्र या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मंगळवारी (ता. २३) तातडीने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कारखान्यांना थकहमी नाकारली आहे.

Sugar Factory
Sugar Factory : ‘वसाका’ची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवा

नव्याने समावेश केलेल्या चार कारखान्यांमध्ये पंढरपूरच्या अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना, अभिमन्यू पवार यांचा औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा अशोक सहकारी साखर कारखाना आणि वैभव नायकवडी यांचा पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना आणि मानसिंग नाईक यांचा विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यांचा यादीत समावेश केला आहे. ही यादी करताना प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. या पाच कारखान्यांना ६७४ कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.

मंगळवारी दुपारी अचानक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला थकहमी नाकारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तर कोल्हे यांच्या कारखान्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आग्रह धरल्याचे समजते. भाजपमध्ये असलेले कोल्हे सध्या पक्षांतराच्या भूमिकेत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत विखे पाटील यांच्याविरोधात काम केल्याच्या तक्रारीही काही नेत्यांनी केल्या आहेत. त्यामुळे यादीत आलेल्या त्यांच्या कारखान्याच्या नावावर फुली मारण्यात आली. तर संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली होती. थोपटे आणि शरद पवार यांच्यात सख्य झाल्याने थोपटे यांना कर्ज मिळू नये, अशी व्यवस्था केली आहे.

Sugar Factory
Sugar Factory Award : भीमाशंकर साखर कारखाना देशात सर्वोत्‍कृष्ट

शरद पवार यांच्या आग्रहाकडे दुर्लक्ष

रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार हे शरद पवार गटात आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीही त्यांना कर्ज आणि कर्जाला थकहमी नाकारली होती. त्यामुळे कारखाना बंद ठेवावा लागला होता. यंदाही कर्ज नाकारल्यास कारखाना बंद राहण्याची भीती आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

अभिमन्यू पवार यांना दुसऱ्यांदा थकहमी

देवेंद्र फडणवीस समर्थक आमदार अभिमन्यू पवार यांच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला २०२३ मध्ये ५० कोटींची थकहमी दिली होती. आता पुन्हा २२ कोटी ९७ लाखांची थकहमी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडून भाजपवासी झालेल्या अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ३४७ कोटी ६७ लाख, भानुदास मुरकुटे यांच्या अशोक सहकारी साखर कारखान्याला ९० कोटी ३० लाख, शिराळ्याच्या मानसिंग नाईक यांच्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याला ६५ कोटी तर वैभव नायकवडी यांच्या पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याला १४८ कोटी रुपयांच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com