
New Delhi News : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना तांत्रिक गुणवत्ता ,वित्तीय व्यवस्थापन, कमाल ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित व गुणवत्ता पारितोषिकांचा वितरण समारंभ येत्या गुरुवारी (ता. ३ जुलै )रोजी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
ही पारितोषिके केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. यावेळी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री निमूबेन बांभनिया आणि हरियानातील ऋषीहूड विद्यापीठाचे कुलपती सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
हरियानाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, कर्नाटकचे ऊस मंत्री शिवानंद पाटील,महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच तांत्रिक परिसंवाद व साखर उत्पादनाशी संबंधित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तांत्रिक परिसंवाद दोन जुलै रोजी तर प्रदर्शन दोन दिवस खुले राहील.
परिसंवादाचे आयोजन
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा उस शेतीमधील वापर’ या विषयावरील परिसंवाद आणि चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ प्रशांत कुमार दास, असिस्टंट डायरेक्टर जनरल (क्रॉप सायन्स) राहतील. या विषयावर बोलण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून बारामती येथील कृषी विज्ञान ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या विषयावरील गट चर्चेचे प्रमुख म्हणून कृषी मंत्रालयातील सल्लागार अनिंद्य बॅनर्जी, कोईमतूर येथील आयसीएआर- शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. पी. गोविंदराज आणि नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरिजचे चीफ केन अॅडवायझर डॉ. डी. बी. डौले यांची उपस्थिती असणार आहे.
पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र अव्वल
यंदाच्या (२०२३-२४) गुणवत्ता पारितोषिकासाठी १०३ सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. २५ पारितोषिकांत महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूला पाच पारितोषिके मिळाली आहेत. गुजरात, उत्तर प्रदेशाने चार पारितोषिकांसह तिसरा क्रमांक पटकाविला असून पंजाब,हरियाना, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले.
महासंघातर्फे तज्ज्ञांमार्फत कारखान्यांचे मूल्यांकन केल्यानंतर केंद्रीय सह सचिव (सहकार) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निश्चित केलेली २५ पारितोषिके कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी यापूर्वीच जाहीर केली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.