Land Records Department Maharashtra : पूर्वी शेतजमीन मोजण्यासाठी अत्याधुनीक प्रणाली नसल्याने एखाद्या गटाची शेती मोजण्यासाठी भूमापन अधिकारी आणि शेतकऱ्यांना दिवस जायचा. असे होऊनही अचुक मोजमाप न झाल्याने अनेक वेळा नाराजी होऊन भूमापनचे काम रखडले जायचं. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याती शेत जमीन अवघ्या तासाभरात मोजून होणार आहे. भूमिअभिलेख विभागाने विकसित केलेल्या ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ या संगणक आज्ञावलीद्वारे ही मोजणी केली जात आहे. यासाठी सॅटेलाईटद्वारे रोव्हरचा वापर होत आहे.
सध्या करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये ही ‘ई-मोजणी’ होत आहे. उर्वरित सहा तालुक्यांत येत्या एक ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे. या नवीन प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ आणि मोजणी कार्यालयातील हेलपाटे थांबणार आहेत.
भूमिअभिलेख जिल्हा अधिक्षक शिवाजी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेत जमिनीच्या मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाकडून ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ संगणक आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या माध्यमातून सहा तालुक्यांमध्ये ई-मोजणी सुरू करण्यात आली आहे. येत्या एक ऑगस्टपासून उर्वरित सहा तालुक्यांमध्ये ई-मोजणीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून तयारी सुरू असल्याचे भोसले म्हणाले.
पूर्वी शेत जमिनीच्या मोजणीमध्ये काही त्रुटी राहात होत्या. यामुळे वादावादीचे प्रकार व्हायचे. यासाठी भूमिअभिलेख विभागाने ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ ही संगणक आज्ञावली विकसित केली आहे. यामध्ये सॅटेलाईटद्वारे रोव्हर व लॅपटॉपच्या माध्यमातून ही मोजणी केली जात आहे. पूर्वी मोजणीनंतर नकाशा बनविला एक व हद्दी दाखविल्या वेगळ्या, अशा स्वरूपाच्या तक्रारी खातेदारांकडून यायच्या.
त्याचबरोबर ऊस पिकाची मोजणी करता येत नव्हती. त्यामुळे पीक काढल्यानंतरच मोजणी करण्याशिवाय पर्याय नव्हता; परंतु आता रोव्हरमुळे थेट ऊस पिकातही जमिनीची मोजणी सहज होत आहे. पूर्वीच्या मोजणीला किमान पाच तासाचा वेळ लागायचा. परंतु आता या नवीन प्रणालीमुळे एक तासातच ही मोजणी होत आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे मजुरांचाही खर्च कमी झाला आहे. मोजणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बारा वर्षांपूर्वी ‘करवीर’मध्ये पहिली संगणक आज्ञावली
सन २०१२ मध्ये तत्कालीन करवीर भूमिअभिलेख अधिकारी सुरेश रेड्डी यांनी मोजणीसाठी पहिल्या संगणक आज्ञावलीची निर्मिती केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आता याच्या पुढील टप्प्याचे काम सुरू झाले आहे.
त्यानुसार जमीन मोजणी नकाशांच्या संगणकीकरणासाठी २०१२ च्या ‘ई-मोजणी आज्ञावली’मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार ‘जीआयएस’ व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ई-मोजणी व्हर्जन २.० ही दुसरी संगणक आज्ञावली विकसित करण्यात आली आहे.
ई-मोजणीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ‘115.124.110.33:8069/web/login’ वर करता येणार आहे. यामध्ये पहिल्यांदा शेत जमिनी मोजणीचा अर्ज ऑनलाईन दाखल करणे, त्यानंतर मोजणी शुल्क ऑनलाईन भरणे, त्यानंतर मोजणीसाठी लागणारी पूरक कागदपत्रे ऑनलाईनद्वारे अपलोड करणे अशा स्वरूपाची ही प्रक्रिया आहे. यामध्ये काही अडचणी येत असल्यास जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन संगणक आज्ञावलीचे फायदे
नकाशात प्रत्यक्ष चिन्हे असल्याने अक्षांश, रेखांशद्वारे आपली जमीन कशी, किती, कुठे हे चटकन कळेल.
मोजणीनंतरची ''क'' प्रत घरबसल्या डाऊनलोड करता येणार.
मोजणीच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण, नकाशाचे डिजिटायझेशन आणि भूसंदर्भीकरण होणार.
शेतकऱ्यांना ‘जीआयएस’ मोजणी नकाशे उपलब्ध. ते कोठूनही पाहण्याची सुविधा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.