Soybean Disease : सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना

Soybean Crop : काही शेतकऱ्यांची नुकतीच पेरणी झालेली आहे. पेरणी लवकर झालेल्या ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत असल्याची किंवा वाढ कमी होत असलेल्या तक्रारी येत आहे.
Soybean Disease
Soybean Disease Agrowon
Published on
Updated on

राजीव घावडे, मंगेश दांडगे, डॉ. सतीश निचळ

Soybean Disease Management : काही शेतकऱ्यांची नुकतीच पेरणी झालेली आहे. पेरणी लवकर झालेल्या ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत असल्याची किंवा वाढ कमी होत असलेल्या तक्रारी येत आहे. बरेच ठिकाणी सोयाबीन पेरणी पूर्ण होऊन पिके १५ ते २० दिवसांची झाली आहेत.

तिथेही सोयाबीन पिवळे पडण्याची समस्या उद्‍भवते. या दोन्ही काळात पिवळेपणाची समस्या नेमकी कशामुळे होते, हे जाणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्याची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे दिसतात. वाढीच्या सुरुवातीलाच सोयाबीन पीक पिवळे पडत असेल तर ते प्रामुख्याने अन्नद्रव्याची कमतरतेमुळे आणि शेवटच्या अवस्थेत पिवळे पडत असल्यास ते विषाणूजन्य रोगामुळे असा ठोकताळा करता येतो.

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे शोषण होत नसल्यामुळे सोयाबीन पिवळे पडते. चुनखडीयुक्त जमिनीचा पीएच वाढतो. वाढलेल्या पीएच मध्ये काही अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. चुन्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश, मँगेनीज, जस्त, तांबे, मॅग्नेशिअम आणि लोह यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो.

सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने गंधक, जस्त आणि लोह यांची कमतरता असल्याने पीक पिवळे पडते. गंधक हा हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यासाठी गंधकाची आवश्यकता असते. गंधक कमी पडल्यास पानामध्ये हरितद्रव्य १८ टक्क्यांपर्यंत कमी तयार होते. गंधक हे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत भाग घेत असल्यामुळे पिकांच्या अन्न निर्मितीला चालना मिळते.

जमिनीचा सामू वाढला की नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होत नाही. सोडिअम या घटकाचे प्रमाण वाढते. ते अन्य अन्नद्रव्ये सहजासहजी झाडाला उपलब्ध होऊ देत नाहीत. पीक पिवळे पडून वाढ खुंटते.

Soybean Disease
Soybean Sowing : साताऱ्यात ८६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी

जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी असल्यामुळेही पीक पिवळे पडते. त्यामागे शेतामध्ये शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यांचा कमी वापर किंवा अजिबात वापरच न करणे, हे मुख्य कारण असते.

आपल्या जमिनीत अन्नद्रव्ये कमतरता असल्यास पीक पिवळे पडण्याची शक्यता असते. त्यामागे माती परीक्षणाशिवाय खतांचे अयोग्य व्यवस्थापन, योग्य वेळी योग्य खते न वापरणे, व्यवस्थापनामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न करणे इ. कारणे असू शकतात.

उपाययोजना

अन्नद्रव्यांची कमतरता भासण्यामागे प्रामुख्याने जमिनीची पोत कारणीभूत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी किंवा पेरताना सेंद्रिय खतांचा योग्य वापरासह उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र अनेक शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे. त्यांनी पुढील प्रमाणे उपाययोजना केल्यास थोड फार उपयोग होऊ शकतो.

सोयाबीन पिवळे पडत आल्यास खालील विद्राव्य खताची फवारणी घ्यावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

नत्र अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : युरिया २० ग्रॅम.

गंधक अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : सल्फेटयुक्त खत ५ मि.लि.

लोह अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : सूक्ष्म अन्नद्रव्ये २ (मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड-२) ५ मि.लि. किंवा चिलेटेड फेरस ५ ग्रॅम.

जस्त अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : सूक्ष्म अन्नद्रव्ये २ (मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड-२) ५ मि.लि. किंवा चिलेटेड झिंक ५ ग्रॅम.

स्फुरद अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : १२:६१:० किंवा १७:४४:० किंवा ०:५२:३४ खत ५ ग्रॅम.

बोरॉन अन्नद्रव्याची कमतरता असल्यास : सूक्ष्म अन्नद्रव्ये २ (मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड-२) ५ मि.लि.

कमतरता लक्षात येत नसल्यास, १९:१९:१९ खत १०० ग्रॅम किंवा अमोनिअम सल्फेट २०-२५ ग्रॅम किंवा झिंक चिलेटेड २५ ग्रॅम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य २५ मि.लि. अधिक अमिनो ॲसिड यांची फवारणी करावी.

जमिनीतून देण्याची खते

१०:२६:२६ हे खत २० किलो अधिक कमतरतेनुसार झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट ५ किलो. किंवा

सूक्ष्म अन्नद्रव्ये २ (मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड-२) दाणेदार ५ किलो अधिक अमोनिअम सल्फेट १५-२० किलो. ही खते टाकताना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.

Soybean Disease
Soybean Disease : सोयाबीनवरील बांधाकुज, मूळ अन् खोडसड रोगांचे नियंत्रण

तणनाशकांमुळे येणारे स्कॉर्चिंग

अलीकडे मजुरांच्या कमतरतेमुळे तणनाशकांचा वापर वाढत चाललेला आहे. तणनाशकाच्या अयोग्य व चुकीच्या वापरामुळे सोयाबीन जळणे किंवा पिवळे पडणे याही बाबी अनेक ठिकाणी दिसत आहे. तणनाशक फवारणीमुळे स्कॉर्चिग आल्यास किंवा सोयाबीन पिवळे पडल्यास पुढील उपाययोजना कराव्यात.

जास्त प्रमाणात स्कॉर्चिग आले असेल, तर पिकाला कोळप्याची पाळी देणे. त्यानंतर डीएपी + युरिया खत देणे. किंवा

२०:२०:००:१३ सोबत झिंक सल्फेट देणे.

फवारणी करणे शक्य असेल तर १९:१९:१९ हे खत १०० ग्रॅम अधिक अमिनो ॲसिड / सायटोकायनीन २५ ते ३० मि.लि. प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

स्कॉर्चिंग येऊ नये म्हणून तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी

तणनाशक वापरताना कोणतेही एकच एक किंवा शिफारशीत असेल तरच दोन तणनाशकांची एकत्र फवारणी करावी.

तणनाशकासोबत कीटकनाशक, बुरशीनाशक, खते किंवा टॉनिक एकत्र करून फवारणी करू नये.

कोणत्या रसायनाची फवारणी शिफारशींत प्रमाणातच करावी.

पीक तणविरहित ठेवण्यासाठी ३० दिवसांपर्यंत तण नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. ५ ते ३० दिवसांनंतर तणनाशक फवारणी करणे शक्यतो टाळावे.

पिवळा मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव

पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. सामान्यतः २५ ते ३० दिवसानंतरच्या सोयाबीन पिकामध्ये

हंगामात पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा सर्वदूर प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे रोगग्रस्त झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. शेंगाचा आकार लहान राहून यामध्ये दाणेसुद्धा कमी राहतात. हिरवे पिवळी पाने असलेले झाड दुरून ओळखता येते. पानांमधील हरितद्रव्य नाहीसे झाल्याने अन्न निर्मितीमध्ये बाधा येते. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट संभवते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा येण्याआधी झाले असल्यास उत्पादनामध्ये ९० टक्क्यांपर्यंत घट जाणवते. सामान्यतः पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. परंतु ७५ दिवसांनंतर प्रादुर्भाव झाल्यास फारसे नुकसान संभवत नाही.

या रोगाचा प्रसार हा पांढरी माशी या रसशोषक किडीमुळे होतो. त्यामुळे पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे.

सोयाबीनची पेरणी जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान केली पाहिजे. पेरणी योग्यवेळी न केल्यास पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

सोयाबीन पिकास शिफारशी प्रमाणे संतुलित खतमात्रा द्यावी. नत्रयुक्त खतांचा अधिक वापर केल्यास पाने लुसलुशीत राहून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

शेतामधील व बांधावरील तणे व पूरक वनस्पतींचे नियंत्रण करावे.

या तणांवरील विषाणू व त्यांचे वाहक यांच्या जीवनक्रमात अडथळा येतो. परिणामी त्यांची संख्या कमी राहते.

अत्यल्प प्रमाणात असलेली रोगग्रस्त झाडे दिसताच प्रथमावस्थेत उपटून नष्ट करावीत. कारण विषाणू रोगग्रस्त पिकाच्या आश्रयाने जिवंत राहून पुढील प्रसारास कारणीभूत ठरतो.

रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे हेक्टरी २२ ते २३ याप्रमाणे लावावेत.

रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)

उदा. *बीटा सायफ्लूथ्रीन (८.४९%) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मि.लि.

किंवा

थायोमेथोक्झाम अधिक लॅंबडा सायलोथ्रीन ०.२५ मि.लि. किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३० टक्के) अधिक लॅम्बडा सायलोथ्रीन (४.६० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ मिलि. (लेबल क्लेम आहे.)

प्रा. राजीव घावडे, ९४२०८४१४२१

(सहायक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वित सोयाबीन प्रकल्प, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com