
Nagpur News : बीड जिल्ह्यातील केजमध्ये दिवसाढवळ्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. वारंवार तक्रार करूनसुद्धा या हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराडला अटक केली नसून अद्यापही तो मोकाट आहे. एकूणच बीड जिल्ह्यात प्रचंड गुंडगिरी वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारावे, असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह विरोधकांनी मंगळवारी (ता. १७) केले.
बीड हत्याकांड आणि परभणीतील हिंसाचाराच्या घटनेवर मांडलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारला नसल्याने विरोधी पक्षांनी सभात्याग करत सरकारचा निषेध केला. दरम्यान, औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, की लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला एक अंगरक्षक दिला जातो.
तर कराडसारख्या गुन्हेगारांना दोन- दोन पोलिस अंगरक्षक म्हणून कसे दिले जातात, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांनी वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल केला, पण खुनाचा ३०२ चा गुन्हा दाखल केलेला नाही. प्रत्यक्ष खून करणारे आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड्स जर तपासले तर सत्य आपल्या समोर येईल, असेही क्षीरसागर म्हणाले.
याप्रकरणी भाजपच्या नमिता मुंदडा यांनीही याप्रकरणी चौकशीची मागणी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. परभणीत झालेली संविधान प्रतिकृतीची विटंबना व त्यानंतर झालेला लाठीहल्ला आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला.
या वेळी त्यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारून आजच चर्चा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी नियम १०१ अन्वये चर्चा घेण्यात येईल, असे स्पष्ट करत स्थगन प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केला.
विधानसभेचे कामकाज सुरू असताना माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील घटनेचा मुद्दा उपस्थित केला.
मात्र अध्यक्षांनी हस्तक्षेप करत या संवेदनशील विषयावर बुधवारी चर्चा होईल, असे जाहीर केले. या घटनेवर राज्य सरकारला उत्तर द्यायचे असून सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही चर्चेत सहभागी व्हायचे आहे.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी परभणीत पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीत उमटलेल्या प्रतिक्रियेची माहिती दिली. परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला उशीर केला.
त्यामुळे प्रकरण पेटत राहिले. परभणीतील पोलिस कोंबिग ऑपरेशन हे शासन निर्मित होते काय? परभणीची घटना पेटवत का ठेवली? असे सवाल करत पटोले यांनी या संदर्भात नियम ५७ आणि नियम ९७ अन्वये नोटीस दिल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.