
Ahilyanagar News : राज्यात यंदा आतापर्यंत रब्बी पेरणी सरासरीच्या तुलनेत ८५.९० टक्के क्षेत्रांवर झाली आहे. त्यापैकी चार जिल्ह्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली असून, बारा जिल्ह्यांत सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. ९ डिसेंबरपर्यंत झालेल्या पेरणीचा विचार करता यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे ९ लाख १६ हजार २७० हेक्टर क्षेत्रांवर जास्ती पेरणी झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे.
राज्यात रब्बीचे ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. राज्यातील बहुतांश भागांत या वर्षी पाऊस चांगला झाला. त्यामुळे रब्बीत चांगली स्थिती राहील, असा कृषी विभागाचा अंदाज होता. यंदा रब्बी पेरणीला पोषक वातावरण असल्याने पेरण्या वेगात झाल्या आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात ४६ लाख ३५ हजार ८३६ हेक्टर क्षेत्रांवर म्हणजे सरासरीच्या ८५.९० टक्के पेरणी झाली असून गेल्या वर्षी आतापर्यंत ३७ लाख १९ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रांवर म्हणजे ६९ टक्के पेरणी झाली होती.
यंदा गेल्या वर्षीपेक्षा वीस टक्के अधिक म्हणजे ९ लाख १६ हजार २७० हेक्टरवर अधिक पेरा झाला आहे. यंदा लातूर, नांदेड, वासीम, वर्धा या जिल्ह्यांत सरासरीच्या शंभर टक्के, तर धुळे, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली.
अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत रब्बीत ज्वारी हे प्रमुख पीक आहे. मात्र ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होत आहे. गत वर्षीच्या पेरणीचा विचार करता यंदा १ लाख ०६ हजार हेक्टरने ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत ७५.२८ टक्के म्हणजे १३ लाख १९ हजार ६९० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
गेल्या वर्षी १२ लाख १३ हजार ६५४ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदाही ज्वारी सरासरी गाठेल असे वाटत नाही. हरभऱ्याचे क्षेत्र मात्र सरासरी एवढे होत आले असून, यंदा २१लाख ५० हजार ७९९ म्हणजे ९९.९४ टक्के पेरणी झाली. गत वर्षीपेक्षा यंदा आतापर्यंत ४ लाखांच्या जवळपास क्षेत्र वाढले आहे. पेरणीची स्थिती पाहता यंदा सरासरी एवढी रब्बीत पेरणी अपेक्षित आहे.
संकेतस्थळ बंदच
कृषी विभागाची माहिती देणारे तसेच पेरणी अहवाल नोंदीसह अन्य माहितीसाठी कृषी विभागाचे http://krishi.maharashtra.gov.in/ हे अधिकृत संकेतस्थळ सुमारे वीस दिवसांपासून बंद आहे. साधारण महिनाभरापूर्वी तांत्रिक सुधारणा करण्यासाठी पूर्वी त्यात दोष असल्यामुळे जलद माहिती मिळत नव्हती. परंतु गेल्या काही महिन्यांत तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ते बंद असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता हे संकेतस्थळ बंद असल्याने ‘क्रापवॉच’ हेही बंद आहे. त्यामुळे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत.
राज्यातील पेरणी स्थिती (हेक्टर)
पीक ........सरासरी क्षेत्र......यंदाचे पेरणी क्षेत्र ......गत वर्षीचे पेरणी क्षेत्र
ज्वारी.......१७,५३,११८.....१३,१९,६९०..........१२,१३,६५४
गहू..........१०,४८,८०७.....७,३१,९९१............४,७०,५८९
मका........२,५८,३२१...... २,९६,२८३............१,७३,३१३
हरभरा .....२१,५२,०१४.... २१,५०,७९९...........१७,५३११२
तेलबिया....५५,६६०..........४०,२३३...............४०,७३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.