
Maharashtra Agriculture Department : खरीप हंगामातील पिकांची काढणी करून शेतीमाल विक्रीचा हा काळ आहे. राज्यातील रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याही सध्या अंतिम टप्प्यात आहेत. अशावेळी खरिपातील शेतीमाल उत्पादन-विक्री तसेच रब्बीत कोणत्या पिकांची किती क्षेत्रावर लागवड झाली, याची अद्ययावत, अचूक माहिती शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार, नियोजनकर्ते अशा सर्वांना मिळायला हवी. कृषीच्या बहुतांश योजनांची अंमलबजावणी आता ऑनलाइन होत आहे.
योजनांसह इतरही बऱ्याच सेवा ऑनलाइन आणल्याची फुशारकी कृषी विभाग मारतो. मात्र त्याच वेळी मागील आठवडाभरापासून कृषी विभागाचे http://krishi.maharashtra.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ बंद आहे. या संकेतस्थळातील तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी ऐन हंगामात आठवड्यापासून संगणकीय प्रणाली ठप्प आहे.
शासन-प्रशासनाचे मागील दोन-तीन महिने विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या निकालात गेले. सध्याच्या काळजीवाहू सरकारच्या काळात बहुतांश कामे बंदच आहेत. संकेतस्थळ बंद पडण्यामागे कंत्राटदार संस्थेचे अडकलेले बिल कारणीभूत असल्याचा संशय एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाच आहे तर मलिद्याच्या खात्यात घुसण्याच्या प्रयत्नांमध्ये संगणक शाखेमध्ये काम करण्यास कोणी तयार होत नाही.
त्यामुळे देखील तांत्रिक बिघाड सुधारण्यास विलंब लागत असल्याचे बोलले जात आहे. ह्या सर्व बाबी अतिगंभीर म्हणाव्या लागतील. जगभरातील संकेतस्थळे नियमित सुरळीत सुरू राहत असताना कृषी विभागाची संकेतस्थळे वारंवार बंद का पडतात, हा खरा प्रश्न आहे.
एकविसावे शतक हे संगणकीय युग आहे. संगणक व त्यावर आधारित इंटरनेट सेवेने उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्रात क्रांती केली आहे. ई-मेलद्वारे तत्काळ संदेश पोहोचविला जात असल्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रक्रिया अतिशय गतिमान झाली आहे.
संगणक युगात संकेतस्थळावर (वेबसाइट) केवळ एका क्लिकवर अनेक विषयांतील अद्ययावत माहिती मिळू लागली आहे. त्याचा फायदा या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या असंख्य ग्राहकांना होऊ लागला आहे. आता तर मोबाइल फोनद्वारे इंटरनेट सुविधा वापरता येऊ लागल्याने संकेतस्थळावरील हे ज्ञानभांडार प्रत्येकाच्या खिशात आले आहे. चोवीस तास उघड असलेल्या या ज्ञानभांडाराचा ग्राहक हवा तेव्हा उपयोग करून घेऊ शकतो.
कृषी क्षेत्रातीलही माहिती विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. देशातील तरुण शेतकरी या माहितीचा वापर करून हायटेक शेती करू लागला आहे. देशविदेशांतील शेतीत होत असलेले नवनवीन बदल त्यास माहीत करून घ्यायचे आहेत. ‘ई-गर्व्हनन्स’च्या दृष्टीने अद्ययावत माहितीबरोबर मार्गदर्शक सूचना, कृषिविषयक शासन आदेश मिळविण्यासाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ महत्त्वाचे मानले जाते.
कृषी विभागांच्या संकेतस्थळाकडे शेतकरी विश्वासाने पाहतो. त्यामुळे काळाबरोबर चालत कृषी विभागाच्या संकेतस्थळांनी अद्ययावत तसेच नेहमी चालू राहणे गरजेचे आहे. परंतु राज्याच्या कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाची संकेतस्थळे काळाच्या मागेच असल्याचे चित्र अनेकदा दिसते. मागे ऐन पावसाळ्यात महारेन संकेतस्थळ बंद पडले होते. त्यातील मंडलनिहाय पावसाच्या नोंदी अचानक गायब करण्यात आल्या होत्या.
जुनी, अर्धवट माहिती, अनेकदा बंद या मुख्य समस्या कृषी विभागाच्या संकेतस्थळांना भेटी दिल्यावर नजरेत भरतात. कारणे काहीही असोत कृषी विभागाचे संकेतस्थळ तत्काळ सुरू करून हे ज्ञानभांडार सर्वांना खुले करायला हवे. संगणक शाखेत परिपूर्ण संगणकीय ज्ञान असलेले पुरेसे कर्मचारी-अधिकारी नेमायला हवेत. तंत्रज्ञानाचा वापर होत असलेल्या ठिकाणी तांत्रिक बिघाड होतात. परंतु तो बिघाड ठरावीक वेळेत दूरही झाला पाहिजेत. असे झाले तरच या आधुनिक, अद्ययावत माहितीचा फायदा शेतकऱ्यांसह सर्वांनाच होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.