Book Review : कुमार ते ‘गंधर्व’ घडण्याची कथा!

Atul Deulgaonkar : संगीताचे ज्ञान, भाषांचे ज्ञान, काव्याची जाण, रसिकता आणि लोकाभिरुचीची ओळख या पाच गुणांवर प्रभुत्व असणाऱ्या गायकास ‘वाग्गेयकार’ म्हणून संबोधले जाते.
Book Review
Book Review Agrowon

बेळगावजवळ सुळेभावी या खेड्यातील कोमकाळी कुटुंबाकडे संगीत ऐकण्याचा कान आणि गाण्याचा गळा हे दोन्ही होते. सिद्धरामय्या यांच्या सहा मुलांमधील तिसरा शिवपुत्र केवळ शांतपणे ऐकता ऐकता एक दिवस अचानक गाऊ लागला.

ते होते शास्त्रीय संगीतातील अवघड मानल्या जाणाऱ्या टप्पा या प्रकारावरील ‘तात करी दुहिता विनाशा’ हे नाट्यगीत. मग थोरल्या भावांनी शिवपुत्रला थेट दोन तंबोऱ्यामध्ये बसवले. पाहता पाहता सात वर्षांचा मुलगा मोठमोठ्या गायकांची हुबेहूब नक्कल करत असल्याची बातमी आजूबाजूच्या गावांपर्यंत पोहोचली.

त्यातूनच त्याला मिळाली ‘कुमार गंधर्व’ ही पदवी. आता यात दैवी, गतजन्मीचे संचित वा चमत्कार असल्याचे कुणालाही वाटेल, पण माधुरी पुरंदरे अगदी स्पष्टपणे त्यामागील कारणमीमांसा सांगतात. वयाच्या सात वर्षापर्यंत त्या मुलाने खूप लक्षपूर्वक ऐकलेले, ते मनात साठवलेले गाणे त्याच्या गळ्यामधून बाहेर पडले.

पण या प्रसिद्धीसोबत त्याचे देशभर कार्यक्रम सुरू झाले, अन् त्यात त्याचे बालपण खऱ्या अर्थाने उपभोगता येत नव्हते. बाराव्या वर्षी मुंबईतील आधुनिक विचारांच्या प्रो. बाळकृष्ण देवधर यांच्याकडून संगीत शिक्षण सुरू झाले. मग मोठ्या गायकांच्या नकलेपासून दूर जात स्वतःची वाट धुंडाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

Book Review
Book Review : हवामानाची तोंडओळख

१९४८ च्या सुमारास गाणे ऐन बहरात असताना कुमारजींना क्षयाची बाधा झाल्याने गाण्यावरच नाही तर बोलण्यावरही बंदी आली. या आजारपणामध्ये कुणीही सामान्य माणूस खचून गेला असता, पण त्यांचा आत्मविश्‍वास दुर्दम्य होता. कानावर पडणाऱ्या प्रत्येक लोकसंगीताच्या धून, त्याचे शब्द यांचे मनातल्या मनात गुणगुणणे सुरू झाले. या संशोधक वृत्तीतून अकरा नवे राग निर्माण झाले. कुठल्याही शाळेत न गेलेले कुमारजी निसर्गाच्याच प्रेरणेतून शिकत गेले.

त्यांनी दिवसाच्या विविध प्रहरांत व सहा ऋतूंत निसर्गामध्ये होत जाणारे बदल टिपून ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’ व ‘गीत वसंत’ अशा कार्यक्रमांतून ऋतुचक्र सादर केले. क्षयामुळे मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीमध्येही आपले संगीत व कलांविषयक सखोल चिंतन सुरूच ठेवले.

त्यामुळे कुमारजींना ‘संगीतसूर्य’, ‘कबीर’, ‘संगीतातील नेहरू’ अशी असंख्य विशेषणे मिळाली. ज्यांच्यावर सर्वाधिक लिहिले गेले असते भारतीय संगीतसृष्टीतील गायक असले तरी त्यांना किंवा त्यांच्या गाण्याला पूर्णपणे समजून घेता आलेले दिसत नाही. मात्र प्रस्तुत पुस्तकातून त्यातील अनेक अलक्षित पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Book Review
Book Review : पतंगामागे पळताना आयुष्याचा पाठपुरावा

कलावंतही माणूसच असतो, त्यामुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सारखेच असू शकतात. पण कलावंतांना आपल्यापेक्षा ‘वेगळे काही’ दिसत असते. प्रवासात भेटणारा हमाल आणि त्याला सामान उचलण्याच्या विनवणीतून कुमारजींना बंदिश सुचते. त्यांनी बहरलेला, रुसलेला वा संतापलेला निसर्ग, तसेच बळी देण्यास नेत असलेल्या बकरीचा आकांत ऐकून त्यावर बंदिशी केल्या आहेत. अशा माणसाच्या जीवनाचा विशाल पट असतो. हाच विशाल कॅनव्हास पुरंदरे आपल्यासमोर त्यांच्या लयबद्ध प्रवाही शब्दशैलीतून मांडतात.

त्यामुळे या प्रतिभावान कलावंताचे आयुष्य समजून देणारे हे पुस्तक वाचकांच्या विशेषतः मुलांवर कोणतेही दडपण आणत नाही. माधुरी पुरंदरे यांच्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील क्यूआर कोड. हे स्कॅन केल्यानंतर कुमारजींनी गायलेल्या अनेक बंदिशी ऐकता येतात. मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचे असून, पुस्तकाच्या प्रत्येक पानावर शब्द व चित्र एकमेकांत सहजगत्या गुंफले आहेत. त्यामुळे कुमार गंधर्वांचे जीवनचरित्र दृक्, श्राव्य व शब्द या तिन्ही मार्गांनी खुलत जाते.

हे पुस्तक केवळ संगीतामध्ये रुची असलेल्या बालकांसाठीच नाही, तर त्यांचे पालक, शिक्षक किंवा कोणत्याही वाचकांसाठी अद्‍भुत अनुभव ठरते. या पुस्तकामध्ये घरालाच नव्हे, मनामनाला पालटून टाकण्याची किमया आहे, असे वाटते.

संपर्क ः atul.deulgaonkar@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com