Nagar News : नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात या वेळी इच्छुकांची संख्या अधिक आहे. शेती, पाण्यासह अनेक मुलभूत प्रश्नांपेक्षा जातीय समीकरणावरच विधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांची गणिते असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.
नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात तसा सातत्याने वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिला आहे. ऊसतोड कामगारांचा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या शेवगाव-पाथर्डीत सध्या भाजपच्या मोनिका राजळे दहा वर्षांपासून आमदार आहेत. या वेळी भाजपमधीलच माजी जिल्हाध्यक्ष, गोकुळ दौंड यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
लोकसभेला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नीलेश लंके निवडून आल्यानंतर येथून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी यापूर्वीच जनसंपर्क अभियानातून लोकसंपर्क कायम ठेवत तयारी केलेली आहे. पाथर्डीसह शेवगावांतही अधिक जनसंपर्क असलेल्या अॅड. ढाकणे यांनी यंदा काही झाले तरी विजय होणारच असा त्यांचा दावा आहे. सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले विधानसभेची तयारी करत आहेत.
उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याचा त्याचा मनोदय आहे. माजी जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे पाच वर्षापासून मतदार संघात संपर्क ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे. नाही मिळाली तर अपक्ष लढणार असल्याचे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात त्यांनी जाहीर केले.
इच्छुकांची मतदार संघात बॅनरबाजी सुरू आहे. या मतदार संघात शेती, विमा योजना, पाणी, दूध आणि सध्या गाजणाऱ्या कोट्यवधी शेअर घोटाळ्याचा प्रश्न आहे. त्यावर बोलण्याऐवजी विधानसभेसाठी इच्छुकांची जातीय समीकरणे, अंतर्गत नातेगोत्यानुसार बांधणी आणि उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
ऊसतोड कामगारांना प्रतिनिधित्व हवे
पाथर्डी-शेवगाव तालुक्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक आहे. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे यापूर्वी एकदा स्व. दगडू पाटील बडे यांच्या माध्यमातून विधानसभेत ऊसतोड कामगारांना प्रतिनिधित्व मिळाले होते.
नगर, बीडसह राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या पाहता ऊसतोड कामगारांना विधानसभेत प्रतिनिधित्व हवे, अशी मागणी करत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार, मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने गहिनीनाथ थोरे पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे.
बीडच्या राजकारणाचा प्रभाव
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील पूर्व भागातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील बहुतांश गावे बीड जिल्ह्याला लागून आहेत. पाथर्डी शेजारच्या आष्टी-पाटोदा-शिरूर कासार आणि शेवगावच्या शेजारील गेवराई मतदार संघात सातत्याने भाजपचे प्राबल्य राहिले आहे. या मतदार संघातील पूर्व भागातील गावांचा बीड जिल्ह्याशी सातत्याने राबता आहे.
त्यामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतही काही प्रमाणात बीडच्या राजकारणाचा प्रभाव आहे. असे असले तरी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे गाव पाथर्डी तालुक्याला लागून आहे. त्यामुळे जरांगे यांचाही पाथर्डी-शेवगावात प्रभाव आहे. येत्या विधानसभेत मनोज जरांगे यांची भूमिकाही शेवगाव पाथर्डीत महत्त्वाची ठरणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.