
डॉ. कैलास दौंड
Effective Teaching Methods: संतोष बाळासाहेब जायभाये यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात सप्टेंबर २००० पासून पुणे मनपा मुलांची शाळा क्र. २१ मधून केली. त्यानंतर त्यांनी बदली झाल्याने मुलांची शाळा क्रमांक ७५ व मुलांची शाळा क्रमांक ९५ मध्ये अध्यापन कार्य केले. आता ते मनपा शाळा क्रमांक १०० (मुलांची) गाडीतळ, हडपसर पुणे येथे सेवारत आहेत. ते पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांना शिकवत असतात. यावर्षी त्यांच्याकडे इयत्ता दुसरीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा वर्ग आहे.
तंत्र भावना हाताळण्याचे!
विद्यार्थ्यांच्या भावनांचा अंदाज घेऊन शिकवणारा शिक्षक म्हणून जायभाये सरांचा उल्लेख करता येईल. ते विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रयोगशील असतात. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वर्गातील विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कौटुंबिक माहितीची ते नोंद करून घेतात. त्यावरून विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक वातावरणाची कल्पना येते. मग त्यांचे भावविश्व थोडेबहू समजायला मदत होते.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावना या भिन्नभिन्न असतात, त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे मित्र बनवून अध्यापन केले की मुले मोकळी बोलू लागतात. आपल्या शंका आणि अडचणीवर शिक्षकांकडून उपाय शोधला की मानसिक आधार आणि आपलेपणा शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. आजच्या आधुनिक जगामध्ये माणूस फक्त यंत्र व पैसा यांच्या मागे लागल्यामुळे भावना हाताळण्याचे तंत्र विसरून गेला आहे.
जणू, आपल्या भावनांचे नियंत्रण करून इतरांच्या भावनांचा आदर करण्याचे व स्वत्वाची जाणीव, आत्मसन्मान निर्माण करण्याचे कौशल्य नकळतपणे सर विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. या प्रयोगांमुळे शाळा व शिक्षकांविषयी गोडी निर्माण होऊन विद्यार्थी आवडीने शिकू लागले
गुणवत्ता भावनिक अन् शैक्षणिक
विद्यार्थ्यांना समाजात वावरताना प्रत्येक गोष्ट मिळेलच असे नाही; त्यामुळे विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करून हार झाल्यावर काय करावे? हे प्रात्यक्षिकातून शिकवले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नकार पचवण्याची ताकद निर्माण झाली. इयत्ता दुसरीसाठी त्यांनी इंग्रजी व्याकरण हा उपक्रम सुरू केला. व्याकरणाची वेगळी वही करून त्यामध्ये उपपदे, वाक्याचे भाग, शब्दयोगी अव्यय, कृतीदर्शक शब्द, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, छोटी छोटी इंग्रजी वाक्ये अनेक उदाहरणे देऊन व सराव घेऊन शिकवले.
हा उपक्रम यशस्वी ठरला. विद्यार्थी इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्नाची उत्तरे देतात. छोटी छोटी वाक्ये बोलतात. व्याकरण हे व्याकरण म्हणून न शिकवता उपयोजित पद्धतीने शिकवले की विद्यार्थ्यांना आनंददायी वाटते. विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता जर वाढवली तर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाढते या जायभाये सरांच्या विश्वासामुळे दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी हातच्याची बेरीज, वजाबाकी, दोन अंकी संख्येचे गुणाकार सहजतेने करतात.
‘कवी-लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रेरीत करतात. दरवर्षी सामाजिक संस्थांकडून व वैयक्तिक स्वरूपात देणगी मिळवून त्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप जायभाये सर करतात. एका सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याची संधीही उपलब्ध करून दिली. जामभाये सर तंत्रस्नेही असल्यामुळे लॅपटॉप, टीव्ही, ई लर्निंग, इंटरनेट आदींचा अध्यापनात वापर करतात. त्यामुळे मुलांना अध्ययनाची गोडी लागली.
संतोष जायभाये यांनी ‘बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र’ या पुस्तकाचे लेखन केले असून ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याख्याने दिली आहेत. प्रसिद्ध साहित्यिक उत्तम बंडू तुपे लिखीत ‘झुलवा’ या नाटकात, झी मराठी वाहिनीवरील ‘अल्टी पल्टी’ या मालिकेत अभिनयही केला. ‘जांभूळ’ या मराठी चित्रपटाची पटकथा लेखन व त्यात भूमिकाही केली आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी काही संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिक्षकांसाठी आयोजित विविध प्रशिक्षणात ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होतात.
- डॉ. कैलास दौंड ९८५०६०८६११
- संतोष जायभाये ७४९८८०४७१४
(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.