Climate Change : विदेशी मदतीवर चाललेला अडखळता देश

मुळात वाढती लोकसंख्या, तिचे खेड्याकडून, शहराकडे स्थलांतर, त्याला अस्थिर शासनाची जोड आणि रासायनिक खतांच्या भडिमारामुळे होणारा नद्यांवरील अत्याचार, या चार अडखळत्या चाकांवर चाललेला वातावरण बदलाचा रथ पाकिस्तानात सध्या धावतो आहे
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

शुभ्र, स्वच्छ खळाळत वाहणाऱ्या नद्या परिसर नेहमीच सुजलाम् सुफलाम् करतात. मात्र दक्षिण आशियातील बांगलादेश (Bangladesh)आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे याबाबतही दुर्दैवी ठरत आहेत. फाळणीनंतर पाकिस्तानच्या वाट्यास सिंधू नदी (Sindhu River) आणि तिच्या काठावरील पाच हजारांपेक्षा अधिक इतिहास असलेली संस्कृती आली.

याच सिंधू नदीने १९७० पर्यंत पाकिस्तानचे पोषण केले. वातावरण बदलामुळे (Climate Change) हीच नदी पाकिस्तानच्या मुळावर उठल्याचे चित्र दिसत आहे. मागील महिन्यात या नदीला प्रचंड महापूर आल्याने लक्षावधी एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली. हजारो मृत्युमुखी पडले, लाखो विस्थापित झाले.

Climate Change
Sugar Export : नव्या निर्यात करारावर नकारात्मक परिणाम शक्य

सर्व जगभरातून अन्न, पाणी, रोग नियंत्रण घटकांची मदत आली. पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात, ‘‘जागतिक तापमानवाढीचा एवढा भयंकर परिणाम पाकिस्तानच्या नशिबी यावा, हे आमचे दुर्दैव आहे.’’ पाकिस्तानच्या भेटीवर आलेले संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टोनियो गुटेरेस सुद्धा म्हणाले, ‘‘मी आजपर्यंत असे अनेक महापूर पाहिले आहेत, पण पाकिस्तानमधील नद्यांचा हा प्रलय म्हणजे ‘ना भूतो ना भविष्यति’. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सिंधू काठची ४५०० वर्षे जुनी मोहंजोदारो संस्कृतीचेही अनेक अवशेष या पुरात नष्ट झाले.

Climate Change
Climate Change : हवामान बदलाने संपूर्ण जग जेरीस

जगामध्ये लोकसंख्येमध्ये ५ व्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान या दक्षिण आशियामधील देशाच्या सीमा भारत, इराण आणि अफगाणिस्तानशी जोडलेल्या आहेत. तब्बल १ हजार ५० किमीचा अरबी समुद्र आणि गल्फ ऑफ ओमानचा समुद्र किनारा आहे. सिंध प्रांत, बलुचिस्तान, पंजाब, नॉर्थ इस्ट फ्रन्टियर आणि भारताचा सध्या पाकच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग अशा पाचही भागातील हवामान वेगवेगळे आहे.

सिंधू नदीच्या प्राचीन समृद्ध खोऱ्यासोबतच जगातील सर्वांत जुने असे थरचे वाळवंट येथेच आहे. सिंधू, झेलम, चिनाब, रावी आणि सतलज अशा नद्यांमुळे पंजाब हा पाकिस्तानचा सर्वाधिक सुपीक कृषी समृद्ध भाग समजला जातो. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर भागात खैबर खिंड अफगाणिस्तानशी जोडलेली आहे. याच भागात दूर उत्तरेच्या भागामध्ये बर्फ आहे. येथेच ‘के २’ हे जगामधील दुसऱ्या क्रमांकाचे २५ हजार फूट उंचीचे शिखर आहे. नंगा पर्वत याच भागात असून, येथील बर्फ वेगाने वितळत आहे.

Climate Change
Farmer : मोठे शेतकरी खरेच धनदांडगे आहेत का?

पाकिस्तानच्या ७८ टक्के भूभागावर शेती होते. त्यात भात, गहू, ऊस, मका, हळद, कापूस ही मुख्य पिके घेतात. पाकिस्तानवर मॉन्सूनची फारशी कृपा नसल्याने ६० टक्के कृषी क्षेत्रावर जेमतेम २५० मिमी पाऊस पडतो, तर उरलेल्या भागावर २५० ते ५०० मिमी एवढाच. उष्ण समजल्या जाणाऱ्या या राष्ट्राची भूजलाचा सर्वाधिक उपसा करणारे म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाते. पाऊस, नद्यांचे पाणी आणि भूजलाचा उपसा यातून सुमारे ६० टक्के शेती सिंचनाखाली येते.

पाकिस्तानातील बहुतेक सर्व नद्या हिमालय आणि काराकोरम पर्वतातून उगम पावतात. पाच मुख्य नद्या पंजाबमधून वाहत पुढे अरबी समुद्रास मिळतात. त्यातील महत्त्वाची म्हणते सिंधू नदी (तिला इंग्रजीत इंडस -Indus म्हणतात.) मानस सरोवरातून उगम पावून लडाखमार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. तिला अॅस्टर, बलराम, गिलगीट, काबूल, तनूबला आणि झंकार अशा उपनद्या असल्यामुळे परिसर समृद्ध करते. तिला पाकिस्तानची जीवन वाहिनी म्हणतात. मात्र सिंधूसह या सर्व नद्या आता हाहाकार माजवत आहेत.

२०१० मध्ये आलेल्या महापुरामुळे राष्ट्राचे दहा अब्ज डॉलर एवढे नुकसान झाले. त्यानंतर प्रतिवर्षी येणारे मोठे महापुरामुळे २५ अब्ज डॉलर इतके नुकसान झाले. आता दीड महिन्यापूर्वी झालेल्या आणखी एका महापुराने हे राष्ट्र पूर्णपणे कोसळले आहे. नुकसानीचा अंदाज काढण्याचे काम सुरू आहे. मुख्य पीक असलेले कापूस क्षेत्र पुराखाली गेल्यामुळे, त्यावर आधारित उद्योग ठप्प आहेत. वातावरण बदलामुळे महापूर, उष्णता वाढ अशा वाढत्या समस्यांना तोंड देताना हा प्रचंड लोकसंख्येचा देश मेटाकुटीला आला आहे.

तरी या राष्ट्रात वातावरण बदलासंदर्भातील कामामध्ये UNDP, FAO आणि जागतिक बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यातील UNDP तर २०१८ पासून पाकिस्तान बरोबर ३७ दशलक्ष डॉलरचा पाच वर्षांचा ‘‘Green Climate Fund’’ हा मोठा प्रकल्प उद्‍ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. यामध्ये अर्थात पाण्याचे नियोजन, मिथेन, कर्बवायू उत्सर्जन कमी करणे यांचा अंतर्भाव आहे.

जागतिक कृषी संघटनेसोबत वातावरण बदलाशी निगडित ५७३ प्रकल्प राबवले आहेत, तर जागतिक बँकेने २०० दशलक्ष डॉलर खर्चाचे तब्बल ६० प्रकल्प Transform of Agriculture by adopting Climate Smart Technology या अंतर्गत राबवले आहेत. यात प्रामुख्याने वातावरण बदलाचा प्रभाव कमी करण्यावर भर आहे. त्यात भूगर्भामधील पाणी उपसा मर्यादित ठेवणे, ठिबक सिंचन, आधुनिक तंत्रज्ञान, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान यावर भर दिला जातो.

Climate Change
Farmer Life : एक दिवस बळीराजासोबत...

धोका वाढतच चालला आहे...

२३.४ दशलक्ष कृषी क्षेत्रापैकी १८.६३ दशलक्ष क्षेत्र भूजलावर अवलंबून असणे, हे धोकादायक ठरत आहे. जल उपशामुळे जमिनीची क्षारता वाढत आहे. पशुधन विपुल असले तरी योग्य नियोजनाअभावी तेही मिथेन या हरितगृह वायूच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरत आहे.

पाकिस्तान कौन्सिल ऑफ रिसर्च ऑन वॉटर रिसोर्सेस यांच्या २०१६ च्या अहवालानुसार, हा देश २०२५ पर्यंत पाण्यावाचून कोरडा पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम अन्न सुरक्षेवर होईल.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०९० पर्यंत देशाचे तापमान ४.९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यातून देशामध्ये दुष्काळाची स्थिती असेल. २०३५ ते ४४ पर्यंत नद्यांच्या परिसरातील ५० लाख लोक महापुरामुळे कायमचे विस्थापित होतील, तर समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे दहा लाख लोक विस्थापित होतील.

Climate Change
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

जागतिक अन्न प्रकल्पाच्या अहवालानुसार, २०५० पर्यंत पाकिस्तानमधील २० टक्के लोकसंख्या भूक आणि कुपोषणाच्या कवेत असेल. शहरामधील १७.५ % लोक दारिद्र्यरेषेखाली जगत असतील.

पाकिस्तानची आजची शोकांतिका हिमालय आणि काराकोरम पर्वत रांगामधील बर्फ वितळण्यामुळे येणाऱ्या महापुराने झाली आहे. बर्फ वितळल्यामुळे सूर्य किरणे परावर्तनाचे प्रमाण कमी होत आहे. उष्णता वाढून उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. १९९७ ते २०१५ या काळात देशात तब्बल १२५ उष्णतेच्या प्रखर लाटा आल्या. यात सुमारे १२०० लोक मृत्युमुखी पावले.

पाण्याचा उपसा वाढल्यामुळे जमिनीचे वेगाने वाळवंटीकरण होत आहे. ठिबक सिंचन अगदी तुरळक आहे. वाढत्या क्षारतेमुळे कृषी क्षेत्र नापीक होत आहे. स्वतःहून वातावरण बदलाबरोबर लढण्याची कुणाचीही इच्छा नाही, ना सरकारची ना शेतकऱ्यांची!

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com