
कोल्हापूर : जादा दराच्या हव्यासापोटी राज्यातील काही साखर कारखानदारांनी निर्यात करार (Sugar Export Contract) मोडल्याने महाराष्ट्रातील असे कारखाने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यातील काही मोजक्या कारखानदारांनी (Sugar Millers) करार भंग करून निर्यात व्यवहारांमध्ये खोडा घातल्याने आता अशा प्रवृत्तीच्या विरोधात साखर कारखानदारीमधूनच (Sugar Industry) टीका होत आहे.
निर्यातीचा फायदा जास्तीत जास्त महाराष्ट्राला होत असताना निर्यात प्रक्रियेतील घटकांनाच दुखावले जात आहे. परिणामी भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या राज्यातील कारखान्यांशी करार करण्याबाबत पुनर्विचार करतील, अशी भीती साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. प्रचलित व्यवहारानुसार निर्यातदार साखर कारखान्याकडून साखर खरेदी केल्यानंतर लगेचच जागतिक बाजारातील व्यापाऱ्यांना विक्री करतात. साखर कारखान्यांतून दर बदल केला तरी निर्यातदारांना पुढील जागतिक व्यापाऱ्याकडून दर बदल करून घेता येत नाही. त्यांना त्यांनी केलेला करार पाळावा लागतो.
त्यामुळे साखर कारखानदारांनी जर दर बदल केले तर निर्यातदार नुकसान करून घेऊन आपला शब्द पाळतो. कारखान्यातून साखर खरेदी केल्यानंतर कारखाना व निर्यातदार यांच्यामध्ये करार होतो, करारामध्ये बाजारभावात किती बदल होऊ दे दर बदल करायचे नाहीत, असा करार असतो. निर्यातदार साखर खरेदी केल्यानंतर कारखानदाराकडे अनामत रक्कम जमा करत असतो.
एखाद्या कारखान्याने दर बदल करण्यास भाग पाडले तर त्यांना आपले पैसे कारखान्याकडे आहेत तसेच जागतिक बाजारपेठेतील आपल्या पुढील व्यापाऱ्याला साखर देणे आवश्यक आहे. म्हणून नुकसान सहन करून कारखानदारांनी जबरदस्तीने बदललेला दर निर्यातदार सहन करतो. या उलट एकदा साखर खरेदी करार केल्यानंतर बाजारामध्ये साखरेचे भाव कितीही खाली जाऊ देत निर्यातदार कोणत्याही कारखान्याकडे दर कमी करा म्हणून मागणी करत नाहीत. असे असताना जादा दराच्या हव्यासापोटी काही कारखानदार करार भंग करत असल्याने याचा नकारात्मक परिणाम नव्या निर्यात करारावर होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्याची समयसूचकता
राज्यातील काही भागांतील कारखान्यांनी करार भंगाचा उपद्व्याप केला असला, तरी पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कारखान्यांनी मात्र समयसूचकता दाखवून करार कायम ठेवले आहेत. साखरेच्या दरात चढउतार असला तरी झालेला करार कायम ठेवण्याकडे विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कारखान्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नवीन निर्यात करार करताना निर्यातदारांची पसंती या भागातील कारखान्यांना असल्याचे निर्यातदार सूत्रांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.