
Sangli News : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद बोर्डाची स्थापना केली आहे. सांगलीतही हळद बोर्डाची मजबूत शाखा सुरू करू,’’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (ता. ८) दिले. सांगलीतील आशिया खंडातील सर्वांत मोठा वसंतदादा साखर कारखाना विकण्याचा प्रयत्न शरद पवार आणि काँग्रेसने केला, अशी टीका श्री. शहा यांनी या वेळी केली.
महायुतीचे सांगली विधानसभेचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, मिरज विधानसभेचे उमेदवार सुरेश खाडे, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेचे उमेदवार संजय पाटील, यांच्या प्रचार सभेत सांगली येथे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. या वेळी प्रदेशउपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर यांसह महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले, ‘‘शरद पवार आणि काँग्रेसचे सरकार असताना, ते दहा वर्षे मंत्री होते. २००४ ते २०१४ या दहा वर्षांत महाराष्ट्रासाठी १ लाख ९१ हजार कोटी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत १० लाख १५ हजार ९०० कोटी रुपये दिले. राज्याच्या विकासासाठी खूप मोठे काम केले आहे. सांगलीत लवकर विमानतळ उभारू. दिल्ली, बेंगलुरू, चेन्नई, मुंबई येथे विमानसेवा सुरू होईल. राज्यात २०० साखर कारखाने होते, त्यापैकी १०१ सहकारी साखर कारखाने राहिले. अन्य कारखान्यांची मृत्युघंटा शरद पवार यांच्या काळात वाजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर विक्रीवरील कर रद्द करून १५ हजार कोटी वाचवले.’’
शिवाजी स्टेडियम, सिव्हिल हॉस्पिटलचा प्रोजेक्टच्या कामात काँग्रेसने भ्रष्टाचार केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, त्या वेळी गुंतवणूक कमी झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर गुंतवणुकीत भारतात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सांगलीत सर्वांत मोठा प्रकल्प आणणार आहे. महायुतीच्या सरकारने निश्चित केले आहे, की राज्यातील सिंचन योजनेतून शेतीला पाणी पोहोचविण्याचे काम करणार आहे, असेही अमित शहा म्हणाले.
वाकुर्डे सिंचनसाठी नवा प्रकल्प : शहा
शिराळा तालुक्याच्या उत्तरेकडील वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजना पू्र्ण झाली आहे. याच योजनेच्या पश्चिम भागासाठी नवीन प्रकल्प तयार करणार आहे. यातून १५ हजार हेक्टर शेती ओलिताखाली येण्यास मदत होईल. महाविकास आघाडीने शिराळ्यातील नागांचे पारंपरिक पूजन बंद केले. नाग पूजन धार्मिक पद्धतीने व परंपरेनुसार सुरू करणार आहे. शिराळ्यातील एमआयडीसीचा विस्तार करून नवीन उद्योग आणू, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिराळा येथील सभेत दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.