Team Agrowon
जागतिक महिला दिन आधुनिक शहरांमध्ये तो विविधांगी साजरा होतो. पण, या संकल्पनेपासून दऱ्याखोऱ्यातील स्त्रीविश्व अज्ञात आहे.
सह्याद्रीचं सारं जग महिलाशक्तीनं व्यापून टाकलेलं आहे. मुळात दऱ्याखोऱ्यातील शेती, दुग्ध व्यवसाय, जनावरांचा सांभाळ, मुलांचं पालनपोषण, डोंगरातील झऱ्यांमधून डोक्यावर हंडाभर पाणी आणण्यापर्यंत ती व्यस्त असते.
दऱ्याखोऱ्यातील स्त्रियांच्या आयुष्यात कसला आला महिला दिन? चूल, जंगल, गायीगुरे, गोठा, शेत, विहीर यापैकी कुठेतरी श्रम करण्यात आजही ती गुंतलेली आहे.
दऱ्याखोऱ्यात आज महिला दिन साजरा होत नसला तरी महिलांचे कष्ट, त्याग, दातृत्व याशिवाय सह्याद्रीतील दिवस उगवत नाही आणि मावळतही नाही.
भटकंतीत गडकोट, डोंगरधारा, जंगलं अशा सर्व ठिकाणी या मायमाउल्या भेटतात.
या मायमाउल्या कधी मायेने जेवण देतात. कधी पाणी पाजतात. कधी रस्ता दाखवतात. कधी भटकंतीचं कौतुक करतात तर कधी असं एकटंदुकटं जंगलात न फिरण्याचा सल्लाही देतात.
शहरात रस्ता असतो. तो पुरुषवचनी आहे. रस्ता रुक्ष असतो. पर्वतात आमची पाऊलवाट आहे. ती मात्र स्त्रीवचनी आहे. वाट जिवंत असते. त्यामुळे सर्व वाटा आम्हा भटक्यांसाठी देवताच.