Fruit Crop Success Story : फळबागेतून जपली शेतीची आवड

Fruit Crop Cultivation : फळपिकांची लागवड करत फळबागेतून चांगले उत्पन्न मिळवून स्वतची प्रयोगशील शेतकरी म्हणून सचिन लोखंडे यांनी ओळख तयार केली आहे.
Fruit Crop
Fruit CropAgrowon
Published on
Updated on

गोपाल हागे

सचिन भास्करराव लोखंडे यांनी शिक्षकी पेशासोबत सांगवी जोमदेव (ता. बाळापूर, जि.अकोला) गावशिवारातील शेती योग्य व्यवस्थापनातून चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. पारंपरिक पिकांच्या जोडीला त्यांनी फळपिकांची लागवड केली आहे. फळबागेतूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. प्रयोगशील शेतकरी म्हणून सचिन लोखंडे यांची ओळख तयार होत आहे.

वाडेगाव (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील रहिवासी असलेले सचिन लोखंडे हे अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक आहेत. परंतु शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरीसोबतच वडिलोपार्जित शेतीचे चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. शेतीमध्ये नवनवीन पीक लागवडीचे प्रयोग करीत उत्पादकता वाढ करण्यात त्यांनी यश मिळवले. पातूर तालुक्यात ड्रॅगनफ्रूटसारख्या पिकाची लागवड करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सोबतीला सीताफळाचीही बाग तयार केली आहे.

वाडेगाव येथील सचिन लोखंडे यांचे डीएडपर्यंत शिक्षण झाले असून, सध्या ते अंधार सांगवी (ता. पातूर) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते शिक्षकी पेशामध्ये आहेत. त्यांचा लहान भाऊ इंजिनिअर असून हिमाचल प्रदेशात नोकरीला आहे. त्यामुळे कुटुंबाची १४ एकर शेती सांभाळण्याची जबाबदारी सचिन यांच्याकडे आली. त्यांनीही शेतीची आवड प्रयोगशीलतेमध्ये बदलली. दर शनिवार, रविवार शेतात जाऊन ते फळबागेचे नियोजन करतात. दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी त्यांना चार जणांची साथ लाभली आहे. तसेच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे ते वेळोवेळी मार्गदर्शन घेतात.

सचिन यांचे वडील भास्करराव लोखंडे हे कृषी सहायक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे वडिलांकडून त्यांना शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाले. सचिन यांची पत्नी प्रतीक्षा आणि आई सोनुताई या गृहिणी असून, शेती नियोजनात त्यांना मदत होते. शेती विकासासाठी सचिन यांनी वडिलांचे सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतले. १९९३ मध्ये सचिन यांच्या वडिलांनी लिंबू लागवड केली. या बागेतून २०१७ पर्यंत त्यांनी फळांचे उत्पादन घेतले. सध्या १४ एकरांपैकी एक एकरामध्ये सीताफळ, अर्धा एकरामध्ये ड्रॅगन फ्रूट लागवड आहे. या वर्षात ड्रॅगन फ्रूटचे क्षेत्र आणखी अर्धा एकराने वाढवण्याचे ते नियोजन करीत आहेत. या दोन फळबागांशिवाय इतर क्षेत्रांत सोयाबीन तूर, हरभरा ही पारंपारिक पिके घेतात. सध्या १४ एकरांपैकी नऊ एकर शेती त्यांनी बागायती केली आहे.

Fruit Crop
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचे३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी मिळणार

ड्रॅगन फ्रूट लागवड

ड्रॅगन फ्रूट लागवडीबाबत सचिन लोखंडे म्हणाले, की मी विविध ठिकाणांहून पीक व्यवस्थापनासंदर्भात माहिती घेतली. लागवडीपूर्वी प्रत्यक्ष सांगोला (जि. सोलापूर) येथे जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून पूर्ण नियोजन समजून घेतले. चांगली गुणवत्तापूर्ण रोपांची खरेदी केली. शेतकऱ्यांची केलेल्या चर्चेनुसार ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी सिमेंटचे खांब व रिंग बनविण्याचे काम स्थानिक कारखानदाराकडून करून घेतले. एप्रिल २०२१ मध्ये अर्धा एकराची योग्य मशागत आणि आखणी करून १० फूट बाय ६ फूट अंतराने रोपांची लागवड केली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन चालू ठेवले.

ड्रॅगन फ्रूट पिकांवर किडींचा फारसा प्रादुर्भाव नसला तरी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने फवारणीचे योग्य नियोजन करतो. पीकवाढीच्या गरजेनुसारच खत, पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे केले जाते. या पिकाला माफक प्रमाणातच पाणी द्यावे लागते. साधारणपणे जून २०२३ मध्ये मी पहिला बहर घेतला. आतापर्यंत चार वेळा फळांची तोडणी झाली आहे. चांगल्या व्यवस्थापनातून अर्धा एकरात मला ११ क्विंटल उत्पन्न मिळाले. या फळांची विक्री गाव परिसरात तसेच अमरावती बाजारपेठेत केली आहे. या ठिकाणी सरासरी प्रति किलो ७० ते १५० रुपये दर मिळाला आहे. पहिल्याच बहरात मला अर्धा एकरातील बागेतून एक लाखापर्यंत उत्पन्न मिळाले. आतापर्यंत लागवडीपासून ते विक्रीपर्यंत तीन लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. परंतु यापुढे आता बागेच्या व्यवस्थापनाव्यतिरिक्त इतर फारसा खर्च लागणार नाही. ही बाग कमीत कमी १५ वर्षे उत्पादनक्षम राहील. परिणामी, प्राथमिक लागवडीचा खर्च वसूल होईल.

पारंपरिक शेतीतही चांगली उत्पादकता

लोखंडे हे खरिपात सोयाबीन, तूर तसेच रब्बीत हरभरा लागवड करतात. खरिपात सात एकरात सोयाबीन आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. राहिलेल्या पाच एकरात सोयाबीन लागवड असते. सोयाबीनची काढणी केल्यानंतर याच शेतात रब्बीत हरभरा लागवड केली जाते. दरवर्षी पीक फेरपालटामुळे जमिनीची सुपीकता टिकून ठेवली आहे. सोयाबीनचे एकरी उत्पादन आठ क्विंटल, तुरीचे सात क्विंटल आणि हरभऱ्याचे १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. २०२१ मध्ये फुले विक्रम या हरभरा जातीचे एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले होते. परिसरातील व्यापाऱ्यांना शेतीमालाची विक्री होते.

Fruit Crop
Fruit Crop Insurance : आंबा, काजू बागायतदारांना ८१ कोटी २४ लाखांचा परतावा

लोकांची लाभली साथ...

सचिन लोखंडे यांनी दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी चार जणांना रोजगार दिला आहे. हे सर्व जण स्वतःची शेती समजून पीक व्यवस्थापन काम करतात. शाळेच्या सुट्टीच्या दिवशी सचिन लोखंडे शेतीवर जाऊन मदतनिसांना पुढील आठवड्याचे नियोजन देतात. त्यानुसार मदतनीस पीक व्यवस्थापन करतात. यातून सांगवी मोहाडी शिवारात स्वच्छ, नीटनेटक्या पद्धतीचे शेती व्यवस्थापनाचे मॉडेल उभे राहिले आहे. येत्या काळात लोखंडे हे परिसरातील ड्रॅगन फ्रूट उत्पादकांचा गट तयार करणार आहेत. यातून बागेचे योग्य व्यवस्थापन, फळांची किफायतशीर दराला विक्री आणि पुढील टप्प्यात फळ प्रक्रिया उद्योगाचा त्यांचा विचार आहे. शाळेमधील विविध शैक्षणिक उपक्रमामध्ये सचिन लोखंडे सहभागी असतात. शाळेमध्ये विद्यार्थांसाठी अभ्यासमाला तसेच अवांतर वाचनाचा उपक्रम राबविला जातो. याचा विद्यार्थांच्या प्रगतीसाठी चांगला फायदा होत आहे.

बांधावर मिलिया डुबिया लागवड

प्लायवूड, माचिस काड्या बनविण्यासाठी मिलिया डुबिया या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत याला चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन लोखंडे यांनी शेती बांधावर सुमारे ८०० झाडे लावली आहेत. या झाडाची योग्य वाढ होताच याचा वापर शेती कुंपणासाठी खांब म्हणून होणार आहे. त्यामुळे कुंपण उभारण्यासाठी सिमेंट किंवा लोखंडाचे खांब वापरण्याची गरज भासणार नाही. परिणामी, हा खर्च वाचणार आहे. याशिवाय भविष्यात लाकडापासून मिळकतही होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com