Fruit Crop Insurance : आंबा, काजू बागायतदारांना ८१ कोटी २४ लाखांचा परतावा

Cop Insurance Scheme : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा ८१ कोटी २४ लाख १८ हजार ३४ रुपयांचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला आहे.
Mango Cashew
Mango CashewAgrowon

Ratnagiri News : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा ८१ कोटी २४ लाख १८ हजार ३४ रुपयांचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर परतावा मंजूर झाल्यामुळे बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गतवर्षी तापमान आणि पाऊस हे ट्रीगर कार्यान्वित झाले होते. त्यामुळे नुकसान झाले आहे. यंदा १८ महसुली मंडले वाढल्यामुळे या परताव्यात आणखीन भर पडण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील २६ हजार २८२ आंबा व ५,८३५ काजू उत्पादकांनी मिळून एकूण ३२ हजार ११७ बागायतदारांनी एकूण १७ हजार ६२२.४३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता.

Mango Cashew
Drought Condition : पर्जन्यमापक यंत्रांअभावी दुष्काळ असूनही फटका

त्यापैकी काजू उत्पादक ४ हजार ५२ बागायतदारांना सात कोटी ४४ लाख ७५ हजार ९५४ रुपये तर आंबा उत्पादक २४ हजार ६१३ बागायतदारांना ७३ कोटी ७९ लाख ५२ हजार ८० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील २४ हजार ६१३ बागायतदारांना ८१ कोटी २४ लाख १८ हजार ३४ रुपयांचा परतावा जाहीर करण्यात आला होता.

वास्तविक विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र परतावा चार महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. परतावा जाहीर होऊन एक महिन्यानंतर परताव्याची रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झाली असल्याने बागायतदारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Mango Cashew
Drought Crisis : सोलापुरातील आणखी ६ मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश

हवामानातील बदलामुळे एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प होते. उत्पादनासाठी केलेला खर्चही बागायतदारांचा न निघाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बागायतदारांना विमा परतावा रक्कम लवकर मिळण्याची अपेक्षा होती.

दरवर्षी ऑगस्टमध्ये परतावा जाहीर होतो व गणेशोत्सवापूर्वीच परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. यावर्षी परतावा जाहीर करण्यासह बागायतदारांच्या खात्यावर जमा करण्यास विलंब झाला आहे.

पात्र शेतकरी

जिल्ह्यातील काजू उत्पादक कर्जदार ४८८५ व ९५० विनाकर्जदार मिळून ५८३५ काजू उत्पादक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. यापैकी चार हजार ५२ काजू उत्पादक विमा योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आंबा उत्पादकांपैकी २३,२२९ कर्जदार व ३०५३ बिगरकर्जदार मिळून २६,२८२ आंबा बागायतदारांपैकी २० हजार ५६१ बागायतदार विमा परताव्यासाठी पात्र ठरले आहेत.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे काही ठिकाणी आंबा कलमांना मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे बागांची साफसफाई, कीटकनाशक फवारणीसाठी लागणारा पैसा उभारणे बागायदारांसाठी अवघड बनले होते. पाच महिन्यानंतर काही होईना परताव्याची रक्कम जमा केली आहे.
- राजेंद्र कदम, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com