Biochar Production Technique : पऱ्हाटी अवशेषातून बायोचार निर्मितीचे नवे तंत्र

Cotton Crop Residue : या तंत्रज्ञानाने तयार झालेला बायोचार अन्य सेंद्रिय खतांसोबत शेतात वापरल्यास अवघ्या आठ वर्षात ०.२ टक्के असलेला सेंद्रिय कर्ब ०.७५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा दावा संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. मणिकंदन यांनी केला आहे.
Biochar Production
Biochar ProductionAgrowon

Nagpur News : कपाशीचे अवशेष विशेषतः पऱ्हाटी जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी जमिनीवरील शंकू आकाराच्या खड्ड्यात भट्टी तंत्रज्ञानाने बायोचार निर्मितीचे तंत्रज्ञान केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने तयार केले आहे.

या तंत्रज्ञानाने तयार झालेला बायोचार अन्य सेंद्रिय खतांसोबत शेतात वापरल्यास अवघ्या आठ वर्षात ०.२ टक्के असलेला सेंद्रिय कर्ब ०.७५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा दावा संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. मणिकंदन यांनी केला आहे.

सामान्यतः कापूस वेचणीनंतर उभ्या झाडांची (पऱ्हाटी) मजुरांकडून तोडणी करून इंधनासाठी वापरल्या जाता. काही शेतकरी ते शेतात पेटवून देतात. परिणामी कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून प्रदूषणात भर पडते. हे टाळण्यासाठी त्यापासून बायोचार निर्मितीचा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे. एक टन पऱ्हाटीपासून ३०० किलो बायोचार मिळतो.

Biochar Production
Residue Free Produce : ‘रेसिड्यू फ्री’ शेतीमाल क्षेत्रातील ‘भुदरगड’

अशी आहे पद्धती ः

२००८ मध्ये जोशिया हंट यांनी सुचविलेल्या पद्धतीमध्ये बदल करून शंकू आकाराच्या खड्ड्यामध्ये भट्टी लावण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रामध्ये ऑक्सिजनविरहित आणि ऑक्सिजनसह ज्वलनाचे पायरॉलिसिस तंत्रज्ञान एकत्रित केले आहे. या तंत्रामध्ये २ मीटर रुंद व १.५ मीटर खोली असलेला शंकू (इंग्रजी व्ही ) आकाराचा खड्डा केला जातो. त्या खड्ड्याभोवती आगीचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी दगडाचा घेर घ्यावा. खड्ड्यामध्ये प्रथम २ सेंमीपेक्षा जास्त जाडीच्या फांद्या लावाव्यात.

त्यात आग वरून चिमणीच्या बाजूने लावावी. धूर कमी करण्यासाठी पऱ्हाटीच्या ढिगामध्ये पुरेशी हवा जाऊ द्यावी. पऱ्हाटी लवकर जळावी याकरिता खनिज इंधनाचा (उदा. डिझेल) वापर करता येतो. वरील फांद्या राखेच्या थराने लाल होतात. यानंतर खड्ड्याच्या परिघाकडे हळूहळू फांद्याचा दुसरा थर लावण्यास सुरुवात करावी. हा दुसरा थर पहिल्या थराला पूर्णपणे झाकेल असे पाहा.

Biochar Production
Crop Residue Management : शेतातील पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी हरियाणातील शेतकऱ्यांना एकरी अनुदान

आता खालून ऑक्सिजन आत शिरणे कमी झाल्याने धूर कमी झाल्याचे दिसून येईल. हा थर जळून लाल झाला की पुढील थर रचण्यास सुरुवात करावी. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने पऱ्हाटी टाकून ज्वलनाची प्रक्रिया करावी. या टप्प्यावर आग विझविण्यासाठी पाणी किंवा मातीचा वापर करावा. बायोचार थंड झाल्यानंतर त्यात आग नसल्याची खात्री करून काळजीपूर्वक बाहेर काढावा.

एक एकर कपाशी क्षेत्रात एक टन पऱ्हाटी मिळते. ते जाळल्यानंतर मिळालेल्या बायोचार (पावडर) मध्ये गांडूळ खत, शेणखत (५० किलो शेणखतामध्ये ५० किलो बायोचार) मिसळता येते. संस्थेमध्ये २००८ पासून यावर संशोधन सुरू असून, बायोचारच्या वापरामुळे जमिनीचा कर्ब ०.२ टक्क्यांवरून ०.७५ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. जाळण्याच्या या शास्त्रीय पद्धतीमुळे वातावरणातील प्रदूषण कमी राहते.
- डॉ. ए. मणिकंदन, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे हे तंत्रज्ञान जमिनीचा कर्ब वाढविण्यास पूरक आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात बायोचार निर्मिती आणि त्याच्या वापराविषयीची मोहीम यंदाच्या खरिपात हाती घेतली आहे. गावस्तरावर कृषी सहायकांमार्फत अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले जात आहे.
- रवींद्र मनोहरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com