Farmer Journey : जगाच्या पोशिंद्याचा वेदनादायी प्रवास

Article by Ganga Bakle : १९ मार्च १९८६ साली यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी त्यांच्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. त्यामुळे संवेदनशील शेतकरी १९ मार्च रोजी अन्नत्याग करतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतकऱ्यांप्रति सहवेदना जपण्यासाठी आज एक दिवस उपवास करावा.
Sahebrao Karpe
Sahebrao KarpeAgrowon
Published on
Updated on

गंगा बाकले

gangabakle@gmail.com

Story of Rural Farmer Sahebrao Karpe : मी एका छोट्या गावातील कासारखेडा (ता. जि. लातूर) येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी. माझ्या लहानपणी गावात कुठे जेवणाची पंगत असेल तर, मी आईसोबत जेवायला जायची. आम्ही पंगतीला जेवायला बसायचो. शाळा आणि शेतात बारीकसारीक कामे केल्यामुळे भूक खपाटून लागायची. पानावर वाढलेले पाहून मी घास घ्यायला सुरुवात करायची.

तेव्हा माझी आई माझा हात धरून मला म्हणायची, ‘‘गंगा, थांब आत्ताच सुरू करू नको.’’ मला प्रश्न पडायचा की, ‘‘आपल्याला आई अशी का म्हणायची?’’ आई सांगायची, ‘‘सर्वांच्या पंगतींना वाढणे झाल्यानंतर श्लोक म्हणायचा असतो आणि त्यानंतर जेवायचे असते. ‘‘खाण्याची उत्कट इच्छा असतानाही मी हातात घेतलेला घास खाली ठेवायची आणि श्लोक सुरू होण्याची वाट पाह्यची.

कुणीतरी कारभारी पंगतीला अन्नपदार्थांची वाढ झाल्याची खातरजमा करून श्लोक म्हणण्यासाठी सांगायचे, सर्वजण हात जोडून श्लोक म्हणायचे. आई मला डोळ्यांनी खुणवून ‘हात जोड’ म्हणायची. मी हात जोडून श्लोक म्हणायची; तो असा,"वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’’ इथे आपण सूक्ष्म विचार केला तर लक्षात येते की, माझ्या शेतकरी बापासारख्याच असंख्य शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य तो स्वतः ‘निर्मिक’ असूनही देवाला भजतो. एक कृतज्ञता शेतकरी ठेवतात. पण शेतकरी जगाचा अन्नदाता म्हणून त्याची कृतज्ञता सर्वार्थाने जपली जात नाही.

Sahebrao Karpe
Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे

आईबरोबर जेवण करून मीही रस्त्याने उड्या मारत-मारत घराकडे जाताना परत ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’ म्हणत होते आणि आईला विचारले, ‘‘या ओळीचा अर्थ काय आहे?’’ आई म्हणाली, ‘‘बाळे, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...’’ म्हणजे मुखात घास घेण्याच्या पूर्वी किंवा घास घेताना त्या श्रीहरीचे (देवाचे) नाव घ्यावे, ज्यामुळे आपणास असे हे अन्न मिळालेले आहे.’’ आईने मला सांगितलेला अर्थ कळाला.

मी दररोज शाळा करून आईसोबत शेतात जात असे. त्यावेळी त्या दिवशी मी आईच्या पुढे-पुढेच चालत तिच्याअगोदर शेतात पोहोचले. शेताच्या बांधावर उभे राहून मी समोर पाहत होते की, पांढरे धोतर-बंडी-डोक्यावर पांढरी टोपी आणि धोतराचा घोळ जरासा वर खोचून माझा बाप ज्यांना मी ‘भाऊ’ म्हणते ते काम करत होते. मी त्यांना लांबलचक ‘भाऊऽऽऽ’ म्हणून आवाज दिला.

ते आमच्याकडे वळून पाहताच त्यांच्या कपाळावरील गोपीचंदनाचा टिळा लख्खं चमकला, पांडुरंगाचा वारसदार मला त्यांच्यारुपाने दिसत होता. श्लोकातील ‘श्रीहरी’ आठवला. त्या श्लोकाचा खरा अर्थ मला माझ्या त्या शेतात उन्हात तळत काम करणाऱ्या बापाकडे पाहून कळाला.

जगाला सात्त्विक अन्न देणारा हा आपलाच रियल बाप आहे. मी त्यांच्याकडे भान हरपून बघतच राहिले. माझा शेतकरी बाप प्रत्येक पिकाची तेवढ्याच तळमळीने काळजी घेत होता, जेवढी काळजी तो आम्हा आम्हां चार भावंडांची घ्यायचा. पिकांची काळजी जगासाठी इतर कोण घेतो? कुणीच नाही. सगळे खादाड. कवी इंद्रजित भालेराव यांच्या ओळी तिखट आहेत, पण ख-या आहेत. ते लिहितात, ‘‘माझ्या बापाने नाही केला पेरा/तर जग काय खाईल धत्तुरा?’’ या ओळींचा विचार सर्वांनी गांभीर्याने करावा.

शेतकऱ्यांच्या जीवनावर-कष्टावर अनेक पटीने साहित्य-नाटक-चित्रपट-माहितीपट आणि अहवाल लेखन झालेले आहे. पण तो फक्त दुरून घेतलेला ‘कानोसा’ आहे. खऱ्या शेतकऱ्यांचे कष्ट आणि दुःख सर्वप्रथम शिवरायांना कळलेले होते. ‘‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. योग्य मोबदला देऊनच शेतकऱ्यांच्या वस्तू घेण्यात याव्यात’’, असा राजांचा आदेश सदैव सर्व सरकारांनी जपला पाहिजेच. संतकवी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी स्वतः शेतीत कष्ट उपसले. त्यांचे शेतकऱ्यांचे ‘कष्टाचे अभंग’ हे सत्ताधीशांनी अमलात आणण्याची गरज कालातीत (काळाच्या सदैव सोबत) आहे.

काळीजहीन सरकार शेतकऱ्यांना न्याय कधी देणार? जे शेतकरी आनंदाने शेतात कष्ट उपसतात, त्यांना नाइलाजाने पदरात काही न पडल्यामुळे आत्महत्या कराव्या लागतात. जी झाडे शेतकऱ्यांनी लहानपणापासून वाढवली-जपली; त्याच झाडांच्या फांदीला लेकीला झोका बांधून देण्याऐवजी गळ्याला दोरीचा फास लावून जीवन संपवावे लागत आहे. अशा असंख्य शेतकऱ्यांच्या बापाविनालेकी पोरक्या झालेल्या आहेत, होत आहेत.

Sahebrao Karpe
Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून आत्महत्येचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणारा नाही. मदत कमी अन् जाहिराती जास्त नकोत. शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेल्या धनधान्याला रास्त हमीभाव मिळाल्यावर शेतकरी समाधानाने आणि सन्मानाने जगेल. राशन-अनुदानाची मलमपट्टी किती दिवस राहणार आहे?

पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ हक्काची असल्यावर शेतकरी आबादानी होतो. शेतकरी कष्टाने खाणारा निर्मळ माणूस आहे. शरीरातील रक्त आटवून त्याचा पदर रिकामाच का? त्याच्या लेकरांचे प्रश्न जटिल होत आहेत. शेतकरी सोडून सगळ्यांची संपत्ती वाढते. त्याची समृद्धी कधी होणार? शेतकरी जगाचा अन्नदाता आणि तोच वारंवार उपाशी राहणार, हे अयोग्य आहे.

माझा अन्नत्याग... माझा खरा उपवास...

लहानपणापासून कष्ट केल्यामुळे मी कधी उपवास केला नाही. आताही माझी तब्येत धष्टपुष्ट आहे. व्याख्यानातही मी महिलांना उपवास न करण्याचे आवाहन करते. पण १९ मार्च १९८६ साली यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांच्या पत्नी मालतीताई करपे आणि त्यांच्या चार लेकरांनी म्हणजेच, एका शेतकरी कुटुंबातील सहा जणांनी एकाच दिवशी सामूहिक आत्महत्या केली.

त्यामुळे संवेदनशील शेतकरी १९ मार्च रोजी अन्नत्याग करतात, उपवास धरतात. यावर्षी करपे कुटुंबीयांचा ३८ वा स्मृतिदिन आहे. मीही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे या दिवशी अन्नत्याग करते, उपवास धरते. हाच खरा सहवेदनेचा स्वानुभव आहे. किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब सातत्याने सांगतात की, ‘‘कमाल जमीन धारणा कायदा (सीलिंग), आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणत आहेत.

उपवासाच्या प्रस्तुत दिवशी आपण शेतकऱ्यांनी यावर चिंतन करावे’’, असे त्यांचे म्हणणे अगदी रास्त आहे. चला, शेतकऱ्यांसाठी आपण सजग राहूयात. माझ्या गावातील शेतकऱ्यांच्या पोरांनी इयत्ता ७ वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एक श्लोक सांगितला. तो असा आहे,

‘‘वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे।

सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे।।

कृषिवल कृषिकर्मी राबती दिनरात।

श्रमिक श्रम करूनि वस्तू त्या निर्मितीत।।

स्मरण करूनि तयांचे अन्न सेवा खुशाल।

उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल।।’’

सर्वजण शेतकऱ्यांप्रति आपले चित्त शुद्ध आणि विशाल करतील, यानिमित्ताने एवढीच आशा!

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com