Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे

Intensive cotton cultivation : मालवाडा (जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी आठ वर्षांपूर्वी सघन तंत्रज्ञान पद्धतीने कापूस लागवड प्रयोग सुरू केले. शास्त्रीय सखोल अभ्यास व अनुभवाच्या जोरावर या पद्धतीवर त्यांनी हुकूमत मिळवली आहे.
Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे

Akola News : मालवाडा (जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी आठ वर्षांपूर्वी सघन तंत्रज्ञान पद्धतीने कापूस लागवड प्रयोग सुरू केले. शास्त्रीय सखोल अभ्यास व अनुभवाच्या जोरावर या पद्धतीवर त्यांनी हुकूमत मिळवली आहे. दरवर्षी ५० एकरांत ते या तंत्राद्वारे कापूस घेत असून, एकरी १२ पासून ते कमाल १८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यासह या पद्धतीचे विविध फायदेही त्यांना मिळू लागले आहेत.

हवामान बदल, पाऊस, दुष्काळ तसेच अन्य कारणांमुळे अलीकडील काळात कापूस पिकातील समस्या वाढल्या आहेत. गुलाबी बोंड अळीचे संकट आहे. अनके वेळा एकरी उत्पादन ६ ते ८ क्विंटलच्या जेमतेम मिळत आहे. अशावेळी सघन किंवा अतिसघन लागवड पद्धतीच्या प्रयोगांना राज्यात चालना मिळत आहे. यात संशोधन संस्थांचेही योगदानही लाभत आहे. कोरडवाहू पट्ट्यात या पद्धतीतून कापूस उत्पादकतेत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे समोर आले आहे

ठाकरेंचा २०१६ पासून आदर्श

मालवाडा (जि. अकोला) येथील दिलीप ठाकरे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांची शेती खारपाणपट्ट्यात येते. त्यामुळे शेती व उत्पादनाला मर्यादा येतात. ठाकरे यांनी २०१६ पासून कापूस शेतीत सघन लागवड पद्धतीचे प्रयोग सुरू केले. यात ८० बाय २० सेंमी, ९० बाय २० सेंमी,
१०० बाय १० सेमी अशा पद्धतींचा वापर केला. मात्र अलीकडील काळात त्यांनी ९० बाय १५ सेंमी.
ही पद्धत निश्‍चित केली आहे.

सघन लागवड तंत्र पद्धतीतील ठळक बाबी

-एकरी साडेपाच ते सहा पाकिटे (२७०० ग्रॅम) बियाणे वापर. प्रति पाकिटात ४५० ग्रॅम बियाणे.
-१३० ते १४० दिवसांत तयार होणाऱ्या बीटी संकरित वाणाचा वापर.
-या लागवड पद्धतीत एकरी झाडांची संख्या २९ हजारांपर्यंत.

उत्पादनाचे गणित

प्रति झाड साधारणपणे १५ बोंडे अपेक्षित राहतात. प्रत्येक बोंडाचे वजन ४ ते ६ ग्रॅम राहते. यातील
चार ग्रॅम वजन गृहीत धरल्यास १५ बोंडांतून ६० ग्रॅम कापूस मिळतो. एकरी २५ हजारांपर्यंत झाडांची संख्या शिल्लक राहिली तरी या एकरी १५ क्विंटल कापूस मिळू शकतो. ठाकरे यांनी सघन पद्धतीतून एकरी १२, १४ पासून ते कमाल १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवले आहे. सन २०१८ मध्ये
या पद्धतीतून एकरी १६ क्विंटलपर्यंत कापूस मिळाला. विशेष म्हणजे या वर्षात पाऊस कमी असल्याने अन्य शेतकऱ्यांना कमी उत्पादन मिळाले होते. पेरणीपूर्व मशागतीपासून ते पेरणी, बियाणे, रासायनिक खते, फवारणी, तणनाशक, आंतरमशागत, निंदणी, वाढ नियंत्रक, वेचणी मजुरी असा एकरी एकूण ३२, ३०० रुपयांपर्यंत खर्च येतो. अलीकडील काळात क्विंटलला आठ हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत दर मिळाला आहे.


Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे
Cotton Cultivation : सघन पद्धतीने कापूस लागवड करावी : अनुप धोत्रे

सघन लागवडीचे झालेले फायदे

-एकरी अधिक उत्पादकता मिळते.

-कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड करता येते.
-पीक लवकर येत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
-नोव्हेंबर अखेरपर्यंत पीक निघून रब्बीत दुसरे पीक घेण्याची संधी
- किमान तीन वेचण्या होतात. पहिल्या वेचणीत ६० टक्के, दुसऱ्या वेचणीत २० टक्क्यांपर्यंत कापूस हाती येतो.


Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे
Cotton Cultivation : कापूस पिकातील सघन लागवड फायद्याची

पाण्याची शाश्‍वत सोय

ठाकरे यांची बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षी ५० एकर कापूस क्षेत्र
असते. त्यातील ३५ गुंठ्यांत तलाव आहे. सिंचनाची शाश्‍वत सोय करताना तीन किलोमीटरवरील
पूर्णा नदीवरून चार इंची पाइपलाइन केली आहे. तेथे दोन एकरांतील जागेत बोअरही घेतले आहे.
सिंचनातील ओलाव्यावर रब्बीचे पीक धेणे सोयीचे होते.

शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा

ठाकरे सांगतात, की सघन पद्धतीत ज्यावेळी एकरी साडेपाच ते सहा बियाणे पाकिटांचा वापर करू लागलो तेव्हा अन्य शेतकरी दोन ते तीन पाकिटे एवढाच वापर करायचे. मला जसससे या पध्दतीचा फायदा दिसू लागला त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचाही त्यावर विश्‍वास बसून तेही त्या पद्धतीने बियाणे वापर करू लागले आहेत. या पद्धतीने व्यवस्थापन करून तेही एकरी उत्पादन वृद्धीचा अनुभव घेऊ लागले आहेत. यंदा देशातील आठ राज्यांत १० हजार हेक्टरवर सघन पद्धतीने कापूस लागवड झाली..
महाराष्ट्रात २३०० हेक्टरवर हा प्रयोग होता. यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचाही सहभाग होता. अकोला जिल्ह्यात सुमारे ४०० शेतकरी या प्रयोगात सहभागी झाले. दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १६ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान त्यांना या वर्षी देण्यात आले.

अभ्यासू शेतकरी

ठाकरे यांचे सघन कापूस लागवड पद्धतीतील शास्त्रीय ज्ञान, अभ्यास व अनुभव लक्षात घेऊन शासनातर्फे त्यांना राज्य व देशस्तरावरील कार्यशाळांमध्ये मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात येते.
नवी दिल्ली येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीतही त्यांना बोलावण्यात आले होते.
यात वस्त्रोद्योग मंत्री, आयसीएआर व कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ प्रतिनिधीही सहभागी होते.
याच वेळी सघन पद्धतीची उपयुक्तता ठाकरे यांनी सविस्तर विषय केली होती. ‘एमसीएक्स’ (वायदे बाजार) समितीवरही शेतकरी प्रतिनिधी म्हणून ठाकरे कार्यरत आहेत. यांत्रिक पद्धतीने कापूस लागवड व काढणीची प्रात्यक्षिकेदेखील त्यांच्या शेतावर घेण्यात आली आहेत.

दिलीप ठाकरे, ९९२३५८४५०७, ८२७५४११७९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com