
The True Meaning of Friendship: सहा एकर कोरडवाहू शेती कसणाऱ्या वारकरी शेतकऱ्याची ती गुणी मुलगी आहे. तिचे आई-वडील राबराब राबत असतात आजही शेतामध्ये. तिने लहानपणापासून त्यांचे कष्ट बघितलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर स्वतः कष्ट केलेले आहेत. भर उन्हाळ्यात ती आणि आई शेतात जायच्या. वडील उन्हाळी औतपाळ्या घ्यायचे. वडिलांच्या घामाने डबडबलेल्या देहाला त्या बघायच्या आणि ही बारकी पोरगी कोरडा घसा पडलेल्या बापाला पाण्याचा तांब्या नेऊन द्यायची. ढेकळाच्या रानात पोरगी तुरुतुरु पळत येते आणि आपल्या जिवाला थंडगार करते, हे अनुभवल्यामुळे बापाला खूप आनंद व्हायचा.
दुपारी लिंबाच्या झाडाखाली बसून हे तिघेही गुण्यागोविंदाने भाकरतुकडा खायचे. आपण करत असलेल्या कष्टाचे चीज आपली लेक चांगले शिक्षण घेऊन करेल याचा बापाला पूर्ण विश्वास होता. लेकीला बाप म्हणायचा, ‘‘पोरी, काय शिकायचे ते शिक आणि जीवनात समृद्धी पेर.’’ बापाचे हे बोलणे लेक मनावर घ्यायची आणि ती मन लावून शिकायची. चांगली शिकून ती शिक्षिका झाली. सगळ्या घरादाराला खूप आनंद झाला. बापाचे शब्द खरे केल्यामुळे बापाला आणि तिला समाधान लाभले.
कष्टाची जाणीव
लहानपणापासूनच तिला कष्टाची जाणीव होती. माय-बापाबरोबर ती स्वतः रानात राबली होती. बाप रानात पेरणी करताना तिच्या आईने आणि तिने खत आणि बी पेरले होते. तसेच बापाने वांगे लागवडीसाठी रान तयार केलेले असायचे. या दोघी मायलेकीने वाफा तयार करून वांग्याचे हिरवेगार- तरतरीत रोपे तयार केलेले असायचे. नंतर या दोघी वांग्याची लागवड करायच्या. दोघी मायलेकी आणि बाप नदीचे पाणी हंड्याने डोक्यावर आणून वांग्याला घालायचे. बाप शेणखत टाकून वांग्याचे पीक बहारदार करायचा. नंतर घरच्या घरी वांगे तोडणी व्हायची. त्या वेळी डाव्या हाताने झोपाळलेले वांग्याचे रोप वर करून उजव्या हाताने वांगे तोडताना काटे टाळून ती वांगे तोडायची. त्यामुळे तिने तरुणपणातच काटे टाळून आयुष्य यशस्वी करण्याचे धडे गिरवले होते.
बापाबरोबर ज्वारी राखताना तिने मचाणावर जाऊन गोफण भिरकावली होती. त्यामुळे पुढे आपल्या आयुष्यात वाईट गोष्टींसाठी विचारांची गोफण फिरवून त्या दूर करण्याचा इरादा तिने पक्का केलेला होता. रानात तुरीचे धसकटे वेचताना, ज्वारीची कापणी करताना, कधी कधी खुरपणी करताना हाताला किंवा पायाला धसकटे लागून- जिभाळी लागून रक्त सांडल्यावर तिने पुढे आयुष्यात कधीही कुणाची आणि भांडणाची धसकटे लागू नये म्हणून स्वतःला जपण्याचे कौशल्ये अंगीकारले होते.
उसाचे तुरे पाहून तिने आपले यशाचे तुरे असेच उंचावण्याचे ठरवले आणि यश मिळवून यशाचे तुरे उंच केलेले आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा असतो, हे तिला तिच्या शेतकरी बापामुळे रक्तातच भिनलेले आहे. सहकारी मैत्रिणींना गावरान आंबट-गोड बोरं खायला दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू तिला निरागसपणाचे वाटते. शाळेतल्या पोरांना निसर्गामध्ये भटकायला नेल्यानंतर तिला पाखरांसारखे उडून आल्याचा दिव्यानंद होतो.
एक ना अनेक गोष्टी अशा तिच्या जिवाभावाच्या आहेत. ती हसत असायची कधीही बोलताना या अगोदर. लोकांना वाटायचे, की किती आनंदी आहे ही. ती कधी कधी इतरांबरोबर कडक वागताना, लोकांना वाटायचे जपून राहा हिच्यापासून. तिच्या चेहऱ्याची तजेलदार कांती पाहून बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटायचे. तिच्या टपोऱ्या आणि वेधक डोळ्यांचा सगळ्यांनाच धाक असायचा. तिचे मर्यादाशील बोलणे सर्वांना आवडायचे.
दुःखाचा दुखवटा
सासूरवाडीच्या माणसांना सुखदुःखात स्वतः खपून सांभाळल्यामुळे त्यांनाही तिची माया येते. बाई असूनही धाडसाने वागते याचे जगाला कौतुक वाटते. ती विज्ञाननिष्ठ जगते. कर्मकांडे आणि वाईट प्रथांची तिला भलतीच तिडीक असते. त्यामुळे त्यापासून ती स्वतः स्वतःला जपते. पण त्यामुळे बायांपासूनच फटकूनही वागते. पुस्तके वाचण्याचा तिला चांगलाच नाद आहे. स्वतःवर स्वतः प्रेम करून समाजमाध्यमावर झळकण्याची तिची हौस ती करायची.
स्वतःच्या दोन लेकरांना सांभाळून त्यांना चांगले शिक्षण देत असताना ती त्यांच्यावर उत्तम संस्कारही करते. त्यामुळे सगळ्यांना असे वाटायचे, की ही बाई किती मस्त आणि मजेत जीवन जगते. पण हा सगळा बाह्य स्वरूपाचा दिखावा होता. तिचा दुःखाचा दुखवटा तिलाच माहीत आहे. तिचा आयुष्याचा साथीदार सगळा पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी जगणारा आहे. अमानवी जगणारा साथीदार तिने सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कशाचेच सोयरसुतक नाही. त्यामुळे तिचे प्रयत्न म्हणजे ‘पालथ्या घड्यावर पाणी.’ त्यामुळे ती मनाने एकटीच जगायची.
पण ती इतरांना आनंददायी वाटायची. मुळात ती आनंदाचा झरा आहे. पण जीवनसाथीचा चिखल असल्यामुळे तिच्या आनंदाचा झरा गढुळला. यावर उपाय म्हणून तिने साथीदाराच्या अनेक गोष्टी झुगारून दिल्या. पुस्तकांचे वाचन करून लेखन केले. स्वतः केलेल्या चिंतनाने विचारांचा मळा बहरविला. भाषणाचे फडही गाजवले. स्वतःला समृद्ध करण्यासाठी चांगल्यांशी संवाद केला. माहेरच्या माणसांना सोबत घेऊन स्वतःला आणखी बळकट केले आणि तिने चांगुलपणावर प्रेम केले. स्वतःच्या कर्मावर आणि विचारांवर जिवापाड प्रेम करताना ती आता प्रचंड आनंदी आहे.
दोरीवरच्या उड्या
काल -परवा तर शाळेतल्या मुलींच्या दोरीवरच्या उड्या खेळ घेताना ती भलतीच उधाणून गेली. तिने तिची अकाली वैधव्य आलेली मैत्रीण सोबत घेतली आणि दोघींनी एका दोरीमध्ये सोबतीने उंच उड्या घेत दोरीवरच्या उड्या खेळल्या. यावेळी दोघींनीही आपल्या आयुष्यावर प्रेम करत आनंदाच्या उड्या आभाळभर घेतल्या. ‘जगण्याचा आनंद आणि आनंदाचे जगणे’ त्यांनी प्रेमाच्या मैत्रीतून सिद्ध केलेले आहे.
त्यांच्या मनाच्या मंचकावर कोणी गुलाबाची फुले सोडून काटे अंथरले तरी त्यांनी वाईट वेळेला मागे सारून पुढे जाण्याच्या जीवनप्रवासाला प्रेमाने स्वीकारलेले आहे. त्या दोघींच्या दोरीवरच्या अकरा उड्यांमध्ये नवीन अपेक्षा आणि आणखी ध्येये गाठण्याची हिंमत आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक उडी मारताना तोल सांभाळून त्यांनी त्यांच्या मैत्रीला ‘अमर’ केलेले आहे. त्या दोघींच्या उड्या पाहत असताना शाळकरी मुलींना स्वतःवर प्रेम करण्याची शिकवण मिळाली.
अभावग्रस्ततेत स्वतःवर प्रेम करून आयाबायांनी स्वतःला समृद्ध करावे, हा संदेश या शेतकरी बाईने दिला. स्वतःबरोबर मैत्रिणीचा आनंद द्विगुणित करताना खऱ्या मैत्रीला न्याय दिला. १४ फेब्रुवारी ‘प्रेमाचा दिवस’ जगभर वेगळ्या पद्धतीने साजरा होताना शेतकरी मुलीने शिक्षिका होऊन शिक्षिका मैत्रिणीला आणि शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना खेळातून आणि स्वतःच्या चांगल्या गोष्टींतून प्रेमाने जगण्याचा दिलेला अनुभव सर्वोत्तम आहे.
- ७७७५८४१४२४
(लेखक रानमेवा शेती साहित्य मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.