काल सकाळी भामा निवांत उठली. हातपाय ताणत मोठ्यानं आळस दिला. घरातनं बाहेर आली. पाणी तापलं असलं तर न्हाणीत बादली आणून द्या म्हणाली. भामाचे नवरोबा, साहेबराव तिथंच दात घासत होते. आपण त्यांना साहेबरावच म्हणू. तर रोज सकाळी लवकर उठून, बंब पेटवून सगळ्यांना पाणी काढून देणा-या भामाला आज काय झालंय म्हणून साहेबराव, त्यांचा पोरगा पिंट्या आणि सून मंगल तिच्याकडं बघत होते. ती दात घासत न्हाणीत गेली.
पाणी आणलं का म्हणून परत हाक मारली. आईचं काहीतरी दुखत असेल असं समजून पिंट्याने गरम पाण्याची बादली नेऊन दिली. भामानं आंघोळ केली. नीटनीटकं आवरलं. केस विंचरले. स्वयंपाक घरात एक खुर्ची होती. त्या खुर्चीवर येऊन बसली. चहा झालाय का विचारलं. मंगलला काही कळेना, आज आत्याबाईंना काय झालंय ? पण आपण लगेच कशाला काय विचारा म्हणून काही न बोलता तिनं चहा केला. आणून दिला. भामा आडीवर तिढी टाकून बसली होती. फूरफूर करत तिनं चहा संपवला. बशी खुर्चीच्या पायापाशी सरकवली. उठून बाहेर गेली. पायात चपला सरकवून सरळ रानाचा रस्ता धरला.
मागं हात टांगून मोकळं चालताना तिला मजा वाटत होती. हिच का ती रोजची वाट असंही तिला वाटलं. वर्षानुवर्षे रोज सकाळच्या प्रहरी स्वयंपाकघरात उठाबशी करून करून कुरकुरणा-या तिच्या पायांना आज कित्ती बरं वाटत होतं. किती दिवसांपासून, नव्हे किती वर्षांपासून भामाला कोवळ्या उन्हात मोकळं चालायला जायचं होतं. रोज कामं उरकायची म्हणून फक्त नाकापुढं चालणाऱ्या तिच्या नजरेत अख्खं शिवार भिरभिरत होतं. ती रानात पोचली.
भामा घरून निघताना मंगलला वाटलं, कालच्या खुरपणीच्या पाता काढायला आत्याबाई लवकर रानात गेल्या. पण कालच्या अर्ध्या पाता ओलांडून भामा पुढं आली. पेंडवलता पाऊस पडून गेला होता. हिरवीगार पीकं धुवून निघाली होती. सूर्यफुलांच्या ओळीतून हजारो सूर्य उगवलेले दिसत होते. पानापानांवर दवाचे थेंब मोत्यांसारखे चमकत होते. पाखरांची लगबग दिसत होती. उन्हाच्या किरणांची तकाकी पसरली होती. शिवार ताजंतवानं दिसत होतं. भामा या कडेपासून त्या कडेपर्यंत रानाला येढा घालून, कुणी दिसलं तर इकडचंतिकडचं बोलून घरी आली.
तोपर्यंत उन बरंच वर आलं होतं. स्वयपाक झाला का, जेवायला वाढा म्हणत हात धुवून चुळ भरून, खाकरून खोकरून गुळणा करून भामा जेवायला बसली. असं याआधी कधीच झालं नव्हतं. मंगल अवाक होऊन बघत होती. रोज सकाळी चहापाणी, चपात्या, भाकरी करणा-या आत्याबाई आज असं का करायला लागल्यात ते तिला कळेना. तिनं वाटण वाटून दोडक्याचं कालवण टाकलं होतं. डब्याला केलेल्या चपात्या होत्या. ते वाढायला लागली. भामा म्हणाली, भाकर भाजली नाय का अजून ? भाकर झाल्यावर मला हाक मार. भामा बाहेर गेली. मंगलनं हळूच बघितलं तर आत्याबाई बाहेरच्या खाटंवर मस्त पाय हलवत बसल्या होत्या.
भाकरी थापता थापता मंगल विचार करत होती, आत्याबाईंना बरं वाटत नाही म्हणावं तर मग झोपून राहिल्या असत्या. रूसल्या म्हणावं तर तोंडावरनं समजलं असतं, तोंड वंगाळ केलं असतं. तडातडा रानातपण जाऊन आल्या खरं. रोज सकाळ सकाळ घरात कुणी कामं उरकली नाहीत तर घर डोक्यावर घेणाऱ्या आत्याबाई आज स्वतःच इतक्या निवांत कशाकाय ? मंगलला कशाचा कशाला मेळ बसंना. भाकर भाजल्यावर मंगलनं हाक मारली. भामानं टोपल्यातली भाकरसुद्धा मोडून घेतली नाही. मंगलनं ताट वाढून दिलं तेव्हा तिनं खायला सुरुवात केली. मंगल बघत होती, आत्याबाई मामंजींसारखी मांडी घालून बसल्या होत्या. त्यांच्यासारखंच चुरून खात होत्या. अगदी तसंच तांब्याभर पाणी पिवून हात धुतला. ताटाच्या पाया पडल्या. ताट बाजूला सरकवलं. मग आत्याबाई बाहेर गेल्या.
आतल्या खोलीत बारक्या उठला होता. त्यानं आंथरुणातनंच भोंगा पसरला होता. आत्याबाईंनी ते ऐकून न ऐकल्यागत केलं. बाहेर आल्या. बारक्याचा भोंगा चालूच होता. आता भाकरी कराव्या का बारक्याला घ्यावं ? मंगलनं त्याला तसंच रडू दिलं. शेवटी साहेबरावांनी बारक्याला उचलून घेतलं. बाहेर आणलं. समजवलं. भामा बारक्याला घेईल, त्याला खाऊपिऊ, आंघोळ घालेल असं साहेबरांना वाटलं. म्हणून भामा कुठंय ते बघत होते तर तिनं दारापुढच्या लिंबाच्या बेचक्यात ठेवलेली साहेबरावांची रोजची चटई खाली काढली. अगदी त्यांच्यासारखी अंथरली. दात टोकरत इकडं तिकडं बघत जरा बसल्यागत करून भामा आडवी झाली. आता मात्र कमाल झाली. साहेबरावांचा अजून खाण्यापिण्याचा पत्ता नाही तोपर्यंत भामा दुपारच्या आरामाला गेलीसुद्धा.
पडल्या पडल्या भामाबाई विचार करत होती, या घरात येऊन इतकी वर्षे लोटली. रोज उगवलेल्या दिवसानं कामं करून घेतली. करायलाच पाहिजे म्हणून करत राहिले. मर मर मेले. काटकसर केली. बायांचा रोजगार वाचावा म्हणून स्वतः मरणामातीची कामं केली. दर पिकाला आपलं कष्ट ओवाळून टाकलं, तेव्हा काळं रान हिरवं झालं. रास बघून कष्टाचं पांग फिटलं. माचोळीवर पोत्याची थप्पी बघून मन भरून आलं. एक झालं की दुसऱ्या पिकाच्या तयारीला लागले. पिकापाण्याचा आधार झाले.
कामाच्या ओझ्यानं सरळ तरतरीत शरीर वाकलं. दुखणीभाणी मागं सारून कष्टत राहिले. लेकरंबाळं, संसार संसार करून थकले. ओढ ओढ केली. असं किती काय काय तिला समोर दिसायला लागलं. साहेबरावांनी ऐटीत मालाची पट्टी आणायला जावं. साहेबासारखं थाटात उठावं, खावं प्यावं. मग ढेकर देत इथं लिंबाखाली आराम करायचा. एखाद्या कामाला हात लावावा वाटला तर लावायचा नाहीतर पायात चपला सरकवून सरळ गाव गाठायचं. जसं काय गावात त्यांचं मोठ्ठं गठूडं पुरलंय आणि ते आणायला रोज गेलंच पाहिजे. नाही गेलं तर अख्खं गाव साहेबरावांच्या नावानं दोसरा काढेल अशी त-हा. आपल्या संसाराचं एक चाक कायम गावात रूतलेलं. गावात जायचं आठवलं तसं भामा उठली. चपला घातल्या.
साहेबराव बारक्याला कडेवर घेऊन कोंबड्या, भू भू दाखवत होते. कसंतरी त्याला नादवत होते. पण त्याचं भुणकं अधूनमधून चालूच होतं. ते बघ आज्जी आज्जी, जा जा आज्जीकडं... असं ते भामाकडं बोट दाखवणार तोपर्यंत भामानं गावाचा रस्ता धरला होता. न सांगता सवरता ही गावात कशाला चालली असेल, साहेबरावांना प्रश्न पडला. बरं जाईना का गेली तर पण निदान सांगायचं तरी. इतक्या वर्षात ती न सांगता कधीच कुठंसुद्धा गेली नव्हती. कधी तिला गावात जायचं निघालं तरी म्हणायची, गावात गेल्यावर आपली इथली कामं मनानं होतील का काय ? इथं कामं करायला माझा नाना येईल होय, म्हणत कामाला लागायची. आपण उगंच गावात जातो याचा तिला किती राग यायचा. गावातनं आल्यावर आपला रागराग करणारी भामा आज स्वतःच सरळ गावात निघून गेली, अशा एक ना अनेक विचारांनी साहेबरावांना कसंतरी झालं. न रहावून शेवटी ते मंगलला म्हणाले, ती काय सांगून गेली का जाताना ? नाही. काय बोलल्या नाहीत.
भामाबाई गावात गेल्यावर तिनं काय काय केलं ते बघायला आपण काही तिच्याबरोबर गेलोलो नाही. म्हणजे ती पारावर गप्पा मारत बसली, टपरीवर चहा घेतला की अजून काही केलं ते आपल्याला माहीत नाही. पण उन कमी झाल्यावर ती घराकडं येताना दिसली. मंगल रानात गेली होती. बारक्याला सांभाळून सांभाळून साहेबराव दमले होते. त्याला झोळीत टाकून झोका देऊन देऊन नुकतंच झोपवलं होतं. आता चहाची तल्लफ झाली होती. चहा करायला भामा नाही म्हणल्यावर त्यांनी स्वतःच चहा ठेवला. तेवढ्यात भामा घरी पोचली, मलापण चहा द्या म्हणाली.
साहेबरावांनी रागानं भामाकडं बघितलं. भामा आरामात खाटंवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद, मोकळेपणा होता. आता पुढाकार घेऊन साहेबरावांनी भांडण काढावं, निदान गावात कशाला गेली होतीस ते खडसावून विचारावं असं वातावरण असतानाही ते भांडत नाहीत. ते अजून एक कप चहा वाढवतात. भामाला देतात. चहा पिवून कपबशी सरकवून भामा पुन्हा लिंबाखाली जाऊन बसते. काकवीसारखा गोडझ्यार चहा पिवून तिचं तोंड गोडमिट्टूक झालेलं असतं. साहेबरावांना अस्सा चहा करायला येतो तर ! ती मनाशी हसत होती. साहेबराव लिंबाखाली आले, मी गावात जाऊन येतो, बारक्याकडं लक्ष ठेव म्हणाले.
नाही, नाही मला रानात जायचंय म्हणत भामानं रानाची वाट धरली. पुन्हा साहेबराव घरी अडकले. कितीपण गावात जावंसं वाटलं तरी बारक्याला एकटं सोडून कसं जाणार ? घेऊन तरी कसं जाणार ? हिला काय झालंय कळंना. असं का येड्यागत करायला लागली ?तिचं डोकंबिकं फिरलं का काय ? साहेबराव विचार करत होते.
इतक्यात बारक्या झोळीतनं केकला. झोका देऊन देऊन पण तो काही झोपेना. मग त्यांनी झोळीतनं काढून त्याला बाहेर आणलं. त्याचा भोंगा काही बंद व्हायचं नाव घेईना. मग साहेबरावांच्या लक्षात आलं, त्याला भूक लागली असेल. त्यांनी गडूत दूध आणलं. बारक्यानं तोडातल्या दुधाचा जोरात फवारा मारला. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे दुधात साखर टाकायला पाहिजे होती. त्यांनी साखर टाकली. हलवली. तर पुन्हा तसाच दुसरा फवारा. आता काय करायचं ? तो गार दूध पीत नाही, असं कधीतरी भामा बोललेली त्यांना आठवलं. मग ते दूध जरा गरम करून घेऊन आले.
तेव्हा कुठं चार घोट बारक्याच्या घशाखाली गेले. हूश्श. आता तो खेळेल निवांत असं वाटत असतानाच, बारक्याला शी आली. तो मोठा कार्यक्रम उरकता उरकता साहेबराव वैतागले. भामाच्या नावानं खडे फोडायला लागले. तिकडे भामा रानात पोचली होती. जित्राबांच्या वैरणीचं मात्र आपण बघायचं असं तिनं ठरवलं होतं. काल कडवाळ कापून ठेवलेला विळा घेऊन कणाकणा दोनतीन पेंड्या कडवाळ कापून ठेवलं. फराफरा बांधाचं कवळाभर गवत काढलं. लांबक्या किलतानात बांधलं. मग बायांच्या खुरपणीकडं येढा टाकायला गेली. किती राहिलंय, किती नाही ते बघून घरी आली. पिंट्या कामावरून घरी आलेला होता. बापलेक कधी नाही ते एकामेरीशी बोलत होते. भामाला बरं वाटलं पण ती आल्याचं बघून ते गप्प झाले. पिंट्या रानात गेला. कडवाळ आणि गवताचं ओझं गाडीवर मागं बांधून घेऊन आला. मागून मंगल आली.
आता संध्याकाळी भामा काय करतेय बघूया. मंगलनं केलेला चहा पिवून भामा तिच्या जोडीदारणींबरोबर देवळाच्या पारावर गेली. इकडं हे तिघं नुसतंच एकमेकांकडे बघत बसले होते. नंतर भामाच्या आजच्या वागण्याबद्दल बोलायला लागले. इतका संसाराला जीव लावणारी बाई. अचानक काय झालं तिला ? कुणाला काही कळेना. आपल्या माणसांशी नीट वागावं, बोलावं म्हणणा-या आत्याबाईंचा आजचा पवित्रा मंगल पहिल्यांदाच बघत होती. जग इकडचं तिकडं झालं तरी आपल्यावरच्या आईच्या मायेत कणभरही फरक पडणार नाही, अशी आई आज आपल्याशी एक चकार शब्द बोलली नाही, याचं पिंट्याला वाईट वाटत होतं. एकवेळ आपलं जाऊ द्या, पण बारक्याला अजिबात न विसरणारी आई त्याला रडताना बघूनसुद्धा साधं उचलून घेत नाही म्हणजे काय ? कमाल झाली आता.
दिवसभर शिणून आलेल्या मंगलनं आदळआपट करत पिठलं भाकरी केल्या. पिंट्या भामाला जेवायला बोलवायला गेला. ती येऊन मस्तपैकी जेवण करून झोपायलाही गेली. मानंखाली हात घेऊन पडल्या पडल्या तिला मनाशीच हसू येत होतं. किती दिवसांपासून असा एक दिवस आपल्या मनासारखा जगावा असं तिला वाटत होतं. वाटलं तर एखादं काम करावं. नाहीतर कुठल्याच कामाला हात लावू नये. बारक्याला सांभाळणं हे काय कामय का, असं म्हणणा-या साहेबरावांना तिनं कितीही सांगितलं तरी तेही काम आहे हे कळणार नव्हतं. ती मनानं सगळं जिथल्या तिथं करते म्हणजे हे तिचं कामच आहे, असं समजण्याला हे उत्तर होतं. रोज उठसूट गावात जाणाऱ्या साहेबरावांना, ती कितीदा मोडा घालत होती. पण ते कधीच ऐकत नव्हते.
आपणही कधीतरी असंच रिकाम्यारानी गावात जाऊन यावं, असंही भामाला वाटत होतं. मंगलला लेकीसारखा जीव लावला तरी अधूनमधून भांड्याला भांडी लागत होती. पिंट्या बायकोची कड घेत होता. भामामधली सासू जागी होत होती. बारक्याचं जरा कमीजास्त झालं की, तुला कळत नाही का असा भामाचा पाणउतारा होत होता. याचं तिला वाईट वाटत होतं. मग निदान एखाद्या दिवशी आपल्या असण्याची जाणीव करून द्यावी, असं भामाला वाटलं होतं. तिला एखादा दिवस असा स्वच्छ निर्मळ जगायचा होता. ती लिचीपिची अजिबात नव्हती. आयुष्यभर कष्टाशी झगडत तिनं संसार उभा केला होता. नावारूपाला आणला होता. कितीही वैतागली तरी ती जगण्याला जीवच लावत होती. तिला थोडं मनासारखं जगायचं होतं, पण तिचं जगणं या सगळ्यांपेक्षा वेगळं नव्हतं. बारीकसारीक सुखाचं तिचं विश्व होतं.
दमलेल्या जिवाच्या असंख्य आयाबायांपैकी भामा एक. कामं सांगणारे अनेक पण राहू दे, बस निवांत म्हणणारं कुणी नाही. कधीतरी तिला आयत्या पाण्यानं आंघोळ करावीशी वाटत असेल. कधी नवं काही नेसावसं वाटत असेल. कधी गरम भाकर खावीशी वाटत असेल. कधी निवांत लिंबाखाली झोपावंसं वाटत असेल. कधी वेगळं काही खावंसं वाटत असेल. कधी नवीन काही घ्यायचं असेल. असं किती काय मनात असेल. आयुष्याची हाड्याहाड्या झाल्यावर कुणी मायेचं माणूस हवं असेल.
कुणीतरी साहेबरावही असेल, ज्याला भामासारखं जगायचं असेल. कधीतरी मंगलला आत्याबाईसारखा एक दिवस हवा असेल. आपल्यालाही कधीतरी कुणासारखं किंवा स्वतःच्या मनासारखं जगायचं असतंच ना ? लेखक म्हणून मला भामाचा एक दिवस दिसला. तुम्ही म्हणाल, भामाला मधेच कसं सुचलं हे ? तर झालं असं की, परवा रेडिओवर तिनं एका प्रसिद्ध व्यक्तिची मुलाखत ऐकली होती. तिचं विश्व आणि भामाचं विश्व यात काही म्हणता काही साम्य नव्हतं. पण त्यातून भामाला तिचा स्वतःचा एक दिवस जगण्याची प्रेरणा मिळाली होती. ती कुणी सेलीब्रेटी नाही. तिच्या अपेक्षाही फार मोठ्या नाहीत. उलट काहींना तर हे अगदीच शुल्लक वाटेल. आपल्याला माहित नाही की कालच्या दिवसाने भामाचा उद्या सुंदर होईल की कालच्या वागण्याने तिला वाईट वाटेल की अजून काही.
मु.पो. बोरीभडक ता. दौंड जि. पुणे ४१२२०२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.