टीम ॲग्रोवन
कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर भरीव कार्य केले जात आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविले जात असून, त्यासाठी महिलांचाही प्रतिसाद मिळत आहे.
महिलांसमोर सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा विचार करून महिलांसाठी विविध कार्यांमध्ये नियोजन करणे गरजेचे आहे.
ग्रामीण महिला पारंपरिक तंत्रज्ञानामध्ये अडकल्याने त्यांना नवीन तंत्रज्ञान तसेच नवीन उद्योगाचा अवलंब करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होत नाही. त्यांचा बाहेरच्या जगाबरोबर कमी संपर्क येत असल्यामुळे बाहेर होणारे बदल याबाबत त्वरित माहिती मिळत नाही.
महिलांना एखादा उद्योग करावयाचा किंवा एखादे तंत्रज्ञान वापरावयाचे वाटले तरी त्यासाठी त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी असते. त्यांना शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये आणि स्वयंरोजगाराबाबतच्या तंत्रज्ञानाचीही माहिती असते. तांत्रिक मार्गदर्शन घेण्यासाठी महिला लांब अंतरावर जाण्यास उत्सुक नसतात.
महिलांना आहार आणि आरोग्यावर विशेष भर देण्याची गरज आहे. आहाराच्या दृष्टीने भाजीपाला, फळझाडांची लागवड करून त्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले, तर चांगला आहार घरच्या घरी मिळू शकतो.
ग्रामीण भागातील तरुणी अनेक व्यवसाय करू शकतील. वेशभूषा, केशभूषा, फॅशन डिझायनिंग, ड्रेस डिझायनिंग, ब्युटी पार्लर, आरोमा थेरपी सेंटर, बेकरी युनिट, ग्रामीण हस्तकला, स्वेटर तयार करणे, सॉप्ट टॉइज तयार करणे यांसारखे अनेक व्यवसाय ग्रामीण युवती सुरू करू शकतात.
ग्रामीण कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्याचे काम शेळ्या-कोंबड्यांच्या विक्रीतून होते. स्थानिक कोंबड्या-शेळ्यांच्या प्रतीमध्ये सुधारणा करून त्यांचे पालनपोषण केल्यास महिलांना यापासून चांगले उत्पन्न मिळू शकते.
ग्रामीण महिलांचा भाजीपाला उत्पादनामध्ये मोलाचा वाटा आहे. अनेक व्यवसायाद्वारे महिला चांगले अर्थार्जन करू शकतात. अर्थात, यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
दुग्ध व्यवसायामध्येही महिलांचा मोलाचा वाटा आहे. दुधाचे शितकरण करणे आणि पिशवीमध्ये पॅक करून विकणे किंवा दुग्धजन्य पदार्थ बनविणे यासारखे व्यवसायही महिला संघटित होऊन करू शकतात.
या सर्व बाबींचा व्यवस्थित विचार करून चांगला कार्यक्रम तयार केला तर बचत गटांद्वारे महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक विकास होऊन कुटुंब आणि गावाचा विकास होईल.