Nashik News : वातावरणीय बदल, त्यात तापमान वाढ, अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ अशा प्रकारच्या हवामान बदलांना सामोरे जात आहोत. या सर्वांचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात शेतीमध्ये सुद्धा हवामान बदलामुळे प्रतिकूल परीस्थिती उद्भवत आहे.
अशा लहरी हवामानाशी जुळवून शेती करणे हेच आज शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी हवामान बदलांची तीव्रता कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
हवामान बदलाच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, या उद्देशाने पर्यावरणपूरक जीवन पद्धती अभियान या विषयी २२ ते २८ मे या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक व कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली.
अभियानाचा उद्देश, सेंद्रिय शेती, शून्य मशागत तंत्रज्ञान, याविषयी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी माहिती दिली. तर ‘बीबीएफ’ लागवड पद्धती मूलस्थानी जलसंधारण याविषयी कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ राजाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तर बीजप्रक्रिया याविषयी कृषिविद्या शाखेचे विषय विशेषज्ञ प्रकाश कदम यांनी माहिती दिली. रिसोर्स फार्मर भास्कर मते, ज्ञानेश्वर रेवगडे यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, नाशिक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख नितीन ठोके, मालेगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनीदेखील मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आत्मा प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे यांनी केले.
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. महिला शेतकरी मेळावा, ग्रामस्तरावर क्षेत्रिय भेटी व किसान गोष्टी, प्रात्यक्षिक भेटी आदी कार्यक्रम होऊन समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना हवामान अनुकूल आधारित कृषी तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांना कृषी विभागातील सर्व कर्मचारी व कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.