Kharif Season : पावसाची मोठी दडी; पिकांची वाढ खुंटली..!

Marathwada Farming News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात अद्याप हवा तसा पाऊस झालेला नाही. ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Kharif Crop
Kharif CropAgrowon
Published on
Updated on

Marathwada Rain Update : पेरलेलं उगवलं एवढाच पाऊस झाला, नंतर नाहीच. अडीच एकराला आजवर दोन, सव्वा महिन्यात खत, मशागत, फवारण्यावर खर्च करून बसलोय. जमीन न सोडलेली कपाशी कमरेपेक्षा जास्त वाढली असती. पण पाऊस आलाच नाही, हप्ताभर पीक दम काढल, नाही तर काय खरं नाय... गोलटगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील जगदीशराव साळुंके यंदाच्या खरिपाची दैना मांडत होते..!

Kharif Crop
Jayakwadi Dam : मराठवाड्यावर पाणीबाणीची शक्यता ! जायकवाडीत अवघा ३४ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ९३ टक्के म्हणजे सहा लाख ४३ हजार १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दमदार पावसानंतर अनेक भागांत पेरण्या झाल्या, आता मात्र पिके वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारलीय. शेतकरी खत, कीडनाशक आणि मशागतींवर खर्च करून बसलेत.

मात्र पाऊसच नाही. १५ दिवसांत केवळ २० टक्के पाऊस झालाय आणि तोही समांतर नाही. पिकांची तहान वाढली आहे, चार-पाच दिवसांत पाऊन न झाल्यास वाढ खुंटून पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील खरिपाचा हंगाम संकटात सापडला आहे. विहीर, शेततळे, बोअरवेल, धरणावरून पाइपलाइन काहीच उपयोगाला येत नाहीय.

Kharif Crop
Kharif Sowing : पुणे विभागात खरिपात ७१ टक्के पेरण्या उरकल्या

शेतकरी साळुंके यांची प्रतिक्रिया ही प्रातिनिधिक आहे, जगदीशराव म्हणाले, ‘‘आमच्या दोन भावांची पाच एकर कपाशी. आजवर सात पाळ्या घातल्यात. पाळ्याचा एकरी किमान दीड हजार खर्च धरून चला. पाच फवारण्या आजवर झाल्या, पण मवा काही जाईना.

एका फवारणीला किमान अडीच हजार खर्च धरा. तीन वेळा खुरपणी केली. एकराला चार दिवस चार महिला मजूर धरल्या, तरी ४८०० रुपये एकरी खुरपणीला लागले. एवढा खर्च होऊन बसलाय. पावसाची लय गरज हाय.’’

यंदाच्या खरिपातील कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, तूर आदी पिकांसह द्राक्ष, मोसंबी, डाळिंब आदी फळ बागा वाचविण्याची धडपड शेतकऱ्यांची सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वरुडकाजी, कुंबेफळ, टोनगाव, लाडगाव, कोनेवाडी, फेरण जळगाव गोलटगाव, गाढेजळगाव, कारोळ, आडगाव ठोंबरे, पैठण तालुक्यातील एकतुनी, पाचोड, मुरमा आदी गावशिवारांतील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपाची मांडलेली आजवरची दैन चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास आणखी चिंता वाढविणारी अशीच आहे. अशीच काहीशी स्थिती अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील बहुतांश भागात आहे.

कपाशी, बाजरी, सोयाबीन, मक्यासह मूग-उडीद पिके प्रचंड ताणावर आहेत. शिवाय काडी काढलेल्या द्राक्ष वेली पाण्याविना कासावीस असून, प्रतिकूल स्थितीमुळे मोसंबीचीही मोठ्या प्रमाणात गळ होते आहे. अति हलक्या जमिनीतील पिकांचा तर आताच धुराळा झाल्याची स्थिती आहे.

Kharif Crop
Maharashtra Rain : राज्यात १८ ऑगस्टपासून पाऊस वाढणार; मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरु होणार

ऊस बनला चारा

पाऊस चांगला असता तर आताच्या घडीला जनावरांसाठी मुबलक वैरण उपलब्ध झाली असती. परंतु पावसाने दैन मांडल्याने आणि पावसाळ्यात ऊस त्यांचा चारा बनला आहे. नाचनवेल परिसरात अत्यंत कमी पाऊस झाल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची व वैरणीची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

गोपालक पिशोर-पळशी परिसरातून ऊस विकत आणून जनावरांना खाऊ घालत आहेत. आधीच गेल्या वर्षीचा पीकविमा नाही, अनुदान नाही, त्यातच अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. आजही पावसावाचून पीक व्याकुळ झाले आहे. त्याचबरोबर शेजारील मोहरा गावात टँकरने पाणी आणून जनावरांची तहान भागविली जात असल्याची माहिती नाचनवेलचे उपसरपंच रावसाहेब शिंदे यांनी दिली.

५ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी खरीप पीकविमा विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. या शेतकऱ्यांनी पाच लाख ५३ हजार ३ ६८ हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षित केले आहे. गतवेळी विमा उतरवलेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीकविमा परतावा मिळाला नसल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय नुकसान भरपाई अजून अनेकांच्या पदरात पडली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com