Indrjeet Bhalerao : एका जिद्दी माणसाची गोष्ट सांगणारं पुस्तक: 'ओल अंतरीची'

Indian Agriculture : इतकं सगळं जपून वागताना आपण चुकलोच नाही अशी लेखकाची भावना नाही. आपल्या लेकिनं क्रमांक टाकून आपल्यातले नऊदहा दोष दाखवून दिल्यावर ते समजून घेऊन, आपल्यात सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणा लेखक व्यक्त करतो.
Ol Antarichi
Ol AntarichiAgrowon
Published on: 
Updated on: 

इंद्रजित भालेराव

Rural Story : खान्देशातल्या जळगाव जिल्ह्यातल्या सुनसगाव नावाच्या शंभर दीडशे लोकवस्तीच्या आदीम अवस्थेत जगणाऱ्या खेड्यात ऐंशी वर्षांपूर्वी एका शेतकरी-शेतमजूर कुटुंबात एक मुलगा जन्माला येतो, याच्या त्याच्या पोटात शिरत जागा तयार करून शिक्षण पूर्ण करतो, आधी शिक्षक होतो,

मग प्राध्यापक होतो, अनुष्टुभ् या नामांकित वाङ्मयीन मासिकाचा व्यवस्थापक होतो, पुढं त्या मासिकाचा संपादक होतो, तमाम मराठी प्रतिभावंतांचा लाडका होतो, अशा माणसाच्या जिद्दीची कहाणी म्हणजे 'ओल अंतरीची' हे गो. तु. पाटील यांचं आत्मकथन होय.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तिला कसं अनुकूल करता येतं आणि आपल्या आयुष्याचं शिल्प कसं घडवता येतं याचा एक उत्तम नमुना म्हणजे 'ओल अंतरीची' हे आत्मकथन होय.

या आत्मकथनाचा पूर्वार्ध म्हणजे एक उत्तम ग्रामीण कादंबरीच आहे. सूनसगावच्या शेती केंद्रित जगण्याचं जे चित्रण गो. तु. पाटील या पुस्तकात करतात ते वाचत असताना मराठीतल्या तमाम आत्मकथनात्मक ग्रामीण कादंबऱ्या आपणाला आठवत राहतात. हे लेखन गो. तु. पाटील यांनी अत्यंत जिवंतपणे केलेलं आहे.

हे लेखन करण्याच्या आधी गो. तू. पाटील यांनी थोडंफार समीक्षात्मक लेखन केलेलं होतं. पण ललित लेखन त्यांच्या हातून झालेलं नव्हतं. अनुष्ठुभ् मासिकाच्या व्यवस्थापन आणि संपादनात तीस वर्ष त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. मराठीतल्या तमाम प्रतिभावंत लेखकांचं ललितलेखन तपासून प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.

त्यापायी स्वतःचं लेखन मागं ठेवलं. हे आत्मकथन वाचल्यानंतर मराठीतील थोर कवी वसंत आबाजी डहाके लेखकाला म्हणाले होते की, 'अनुष्टूभ् मासिकासाठी तुम्ही तुमच्यातल्या लेखकाचा बळी दिला' हे अगदी खरं आहे. ठरवलं असतं तर गो. तु. पाटील नक्कीच आपल्या अनुभवावर आठ दहा कादंबऱ्या लिहू शकले असते. तसे ग्रामीण जीवनाचे अनुभव त्यांच्याजवळ होते आणि लेखन शक्तीही होती.

Ol Antarichi
Indrjeet Bhalerao : त्यानं चक्क बैलावरून बसून साधला लग्नाचा मुहूर्त!

या छोट्याशा सुनसगावाचं विश्वदर्शन घडवताना गो. तु. पाटलांनी कुठलाही संकोच ठेवलेला नाही. गावातले छंदी-फांदी, लुंगे-संगे लोक, त्यांचे छंद पुरवणारी गावातली बाई, दारूत झिंगणारी माणसं, बाई-बाटलीची नशा करणारी माणसं, त्याच्या आहारी गेलेले लेखकाचे वडील, दोनदोन बायकांमध्ये त्यांची होणारी कुचंबना,

त्यांच्या बायकांचीही त्यात होणारी कुचंबना आणि त्यापेक्षाही जास्त त्यांच्या लेकराबाळांची होणारी कुचंबना चित्रित करताना लेखकानं आपल्या सर्व आप्तेष्टांचे गुणदोष निःसंकोचपणे सांगून टाकलेले आहेत. ते आपले कुटुंबीय आहेत म्हणून काहीही झाकून ठेवलेलं नाही.

अगदी अजाणत्या वयात आपणही दोन वेळा कसे दारू पिलो आणि त्यानंतर काय घडत गेलं तेही लेखक फार मजेशीरपणे सांगतो. आई, चुलत्यांसोबतचे शेतातल्या कामाचे तपशील, गावातल्या व्यक्तींची व्यक्तीचित्रणं, नात्यागोत्यातल्या माणसांची व्यक्तीचित्रणं, त्यांची स्वभाववैशिष्ट्य वाचताना आपण पूर्णपणे रंगून जातो.

नुकत्याच सुरू झालेल्या गावातल्या शाळेत आलेल्या सातपुते या सोनार मास्तरांनी आपणाला शिक्षणाच्या कसं नादी लावलं, वडिलांचाही आपणाला कसा पाठिंबा होता, आपण त्यांच्या पोटात शिरून त्यांच्या घरातली सगळी कामं करत त्यांच्याच सोबत राहून कसा अभ्यास केला, गुरुजींची बदली झाल्यावर त्यांच्यासोबत बदलीच्या गावात जाऊन त्यांच्या घरातली सगळी काम करत पुढचं शिक्षण कसं घेतलं,

तिथलं शिक्षण संपल्यावर गुरुजींनीच पुढच्या शिक्षणाचे मार्ग कसे मोकळे केले, याचे फार सुंदर तपशील पाटील सरांनी इथं सांगितलेले आहेत. हेच सातपुते सर या आत्मचरित्राच्या उत्तरार्धात मात्र आधी केलेल्या सगळ्या उपकारांची फेड करून घेण्याच्या नादात लेखकाला कसा मानसिक त्रास देतात,

उपकृततेची भावना सांभाळत, त्यांना समजून घेत लेखक त्यांच्या कचाट्यातून स्वतःला वाचवत कसा बाहेर पडतो हे वाचताना आपलंच काळीज पिळवटून येतं. लेखकाच्या आयुष्यात त्याच्यावर उपकार करणाऱ्या माणसांनी नंतर कसे अपकार केले आणि लेखकानं उपकार केलेल्या माणसांनीही उलटून पुन्हा त्यांच्यावर कसे अपकार केले हे खास कृषीजीवनातल्या माणसाचं आडमुठेपण या पुस्तकात वाचताना ही माणसं कधी सुधारणार ? हा अवघड प्रश्न आपल्यासमोर सतत आ वासून उभा असलेला आपणाला दिसतो.

अध्ययन संपवून लेखक अध्यापनात शिरतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महात्मा गांधी शिक्षण संस्थेत अध्यापनाची सुरुवात होते. गांधीवादी नेते भाऊसाहेब हिरे यांनी ध्येयवादानं सुरू केलेली ही शिक्षण संस्था. एकेकाळी पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईसारख्यांनी इथं नोकऱ्या केलेल्या आहेत.

शिक्षक म्हणून काही दिवस तिथं काम करत असतानाच लेखक एमए मराठीचं शिक्षण पूर्ण करतो. पुढं मराठवाड्यात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराईतील महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून वर्षभर काम करतो. नंतर आपल्या मूळ मातृसंस्थेत महात्मा गांधी शिक्षण संस्थेत जागा निघाल्यावर तो परत मालेगावला जातो. शेवटी एक-दोन ठिकाणी बदल्या होऊन येवल्यात स्थिरावतो. नंतर निवृत्तीपर्यंत तिथंच राहतो.

या सर्व काळात अध्ययन आणि अध्यापनात पूर्ण ताकतीनं आणि प्रामाणिकपणे लेखक राबत राहतो. शिक्षक म्हणून आदर्श होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते ते करत राहतो. हे करत असतानाच आपलं कुटुंब पुढं नेण्यासाठी, आपले गावाकडचे नातेवाईक पुढे नेण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते तो करत राहतो.

कर्ज काढत राहतो, नातेवाईकांना मदत करत राहतो, ती कर्ज फेडत राहतो, आणि या दुष्टचक्रात राबत असतानाच प्रामाणिकपणे शिकवण्याचं, शिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाचं, आपण शिकवत असलेल्या विषयात सखोल जाण्यासाठी मराठीच्या अध्यापकांची संघटना बांधण्याचं, त्या संघटनेचे उपक्रम घेण्याचं, अभ्यासक्रमाला असलेले लेखक अशा संघटनांच्या उपक्रमातून अध्यापकांसमोर आणण्याचं काम लेखक करत राहतो.

हा त्याच्या जगण्यातला प्रामाणिकपणा कुणालाही आदर्श वाटावा असाच आहे. हे सगळं करत असताना कुठंही लेखक आपला प्रामाणिकपणा आणि आपली रुजुता सोडत नाही. पण कुणी समोर येऊन गुंडगिरी करू लागला तर मात्र तेवढ्याच धैर्यानं त्याच्यासमोर उभं राहून त्याच्या गुंडगिरीचा सामना करण्याचं धैर्यही लेखकांमध्ये आहे. मग तो महाविद्यालयातला गुंड विद्यार्थी असो, संस्थाचालक असो, का गल्लीतला गुंड भैय्या असो.

इतकं सगळं जपून वागताना आपण चुकलोच नाही अशी लेखकाची भावना नाही. आपल्या लेकिनं क्रमांक टाकून आपल्यातले नऊदहा दोष दाखवून दिल्यावर ते समजून घेऊन, आपल्यात सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणा लेखक व्यक्त करतो. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. हे सगळं सुरू असताना अनुष्टुभ् नावाचं मासिक सुरू होतं.

Ol Antarichi
Indrjeet Bhalerao : गावात जत्रांना महत्त्व का असतं?

त्या मासिकात सुरुवातीला कार्यकर्ता, नंतर व्यवस्थापक, नंतर संपादक, नंतर प्रतिष्ठानचा कार्यकारी अध्यक्ष, नंतर अध्यक्ष अशी पदं सांभाळत सार्वजनिक जीवनामध्ये वांङ्मयीन कार्यात स्वतःला झोकून देतो. सार्वजनिक संस्था कशी निरपेक्षपणे विनावेतन आदर्शपणे चालवावी याचा एक नमुना उभा करतो. या प्रतिष्ठानमध्ये होत असलेल्या छोट्या-मोठ्या मानापमानापासून अलिप्त राहून, सगळ्यांमध्ये समन्वय साधून, हे प्रतिष्ठान पुढं पुढं नेण्याचा लेखक प्रयत्न करतो.

अनुष्ठुभ् या मराठीतल्या एका महत्त्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकाचा समग्र इतिहास या आत्मकथनात आलेला आहे. कारण लेखक सुरुवातीपासून सलग अठ्ठावीस वर्ष वेगवेगळ्या नात्यानं या मासिकाशी संबंधित होता. त्यामुळं अतिशय बारकाईनं आणि तपशीलवार असा या नियतकालिकाचा इतिहास इथं येऊन जातो.

येवल्यासारख्या एका खेडेवजा तालुक्याच्या ठिकाणावरून असं वाङ्मयीन मासिक चालवताना, अडचणींना सामोरं जाताना, लेखक काय करतो त्याचे तपशील मोठे रंजक आणि भयंकरही आहेत. मराठीत एखाद्या नियतकालिकाचा असा स्वातंत्र इतिहास आतापर्यंत तरी कुणी लिहिलेला दिसत नाही. त्यामुळं हे या आत्मकथनाचं एक वेगळं परिमाण आहे.

किंबहुना लेखक ज्यांना पितृस्थानी मानून बाबा असंच म्हणतात त्या मराठीतल्या थोर समीक्षक म. सु. पाटील यांनी अनुष्ठुभ् चा इतिहास लिहायला सांगितल्यावर लेखकाला सगळं आयुष्यच आठवायला लागतं. आणि त्यातूनच या आत्मकथनाची निर्मिती होते. म. सु. पाटील यांनीही स्वतःचं 'लांबा उगवे आगरी' हे आत्मकथन लिहिलेलं आहेच.

तेही मी सात-आठ वर्षांपूर्वी वाचलं होतं. एका प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या दोघांच्या आत्मकथनात येणारा त्या प्रतिष्ठानचा तपशील थोडा वेगवेगळ्या असला तरीही तो समांतर जाणाराच आहे.

हे सगळं सुरू असतानाच आपली मुलं घडवून त्यांची आयुष्यं उभी करणं हेही लेखक विसरत नाही. आपल्या दोन मुली आणि एका मुलाला नीटपणे आयुष्यात उभा करतो. मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बांधकाम क्षेत्रात स्थिरावतो. एक मुलगी इंग्रजीची प्राध्यापक होऊन स्थिरावते. तर एक मुलगी डॉक्टर होऊन स्वतःचा दवाखाना चालवते.

सगळ्याचीच आयुष्य नीटपणे चालू असताना अधूनमधून संकटं येत राहतात. त्यांना खंबीरपणे सगळे जण मिळून सामोपचारानं तोंड देतात. तसंच सार्वजनिक जीवनात येणाऱ्या संकटांनाही लेखक तोंड देत राहतो. संघर्षाशिवाय मजा नसते, संघर्षाशिवाय आयुष्यही नसतं, हे आत्मकथन वाचताना सतत असं जाणवत राहतं.

ज्यांनी संघर्षातून मार्ग काढत आयुष्य उभं केलं त्यांच्याकडंच काहीतरी सांगण्यासारखं असतं. तसं गो. तु. पाटील यांच्याकडं पुष्कळ सांगण्यासारखं होतं. म्हणून त्यांनी हे आत्मकथन लिहिलं. आणि हे आत्मकथन वाचणाराला शिकण्यासारखं खूप असल्यामुळं वाचणारालाही हे आत्मकथन वाचून आपला वेळ वाया गेला असं वाटत नाही.

पुस्तकाची निर्मिती अनुष्ठुभ् प्रतिष्ठाननंच केलेली आहे. आता जवळजवळ पाचशे पानांचं असलेलं हे पुस्तक खूप काटकसरीनं छापलेलं आहे. एका पानावर पस्तीस ओळी घेतलेल्या आहेत. सरासरी तीसच ओळी घेत असतात. अक्षरही खूप बारीक आहे. जर सुटसुटीत आणि मोकळंमोकळं छापलं असतं तर हे पुस्तक साताठशे पानांचं झालं असतं.

पण अतिशय बांधेसुद पद्धतीनं मजकुराची मांडणी करून, प्रकरणाची मांडणी करून, पुस्तकाची निर्मिती, पुस्तकाची हार्ड बाउंड बांधनी, मोजकी छायाचित्रं, असं सगळं करून अतिशय सुंदर पुस्तक निर्मिती करण्यात आलेली आहे.

आदर्श आत्मकथनांची म्हणून जी काही वैशिष्ट्ये असतात ती सगळी आपणाला या पुस्तकात पाहायला मिळतात. लेखक कुठलीही गोष्ट आत्मप्रौढीनं सांगत नाही. स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत नाही. वस्तुस्थिती समोर ठेवतो. त्यातून निष्कर्ष काय काढायचा ते वाचकांवर सोपवतो. त्यामुळं हे आत्मकथन वाचताना पानं उलटण्याची वेळ कधीच येत नाही.

अक्षरन्अक्षर वाचल्याशिवाय पुढच्या पानावर जावं असं वाटत नाही. म्हणून हे एक मराठीतलं प्रामाणिक आणि निर्मळ आत्मकथन आहे याची खात्री देता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.