Crop Damage : राज्यात ८८ हजार हेक्‍टर पिकांची धूळधाण

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांतर्गत ३५ तालुक्‍यांना फटका बसला आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Nagpur News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा तब्बल ८८ हजार हेक्‍टरवरील पिके, फळबागा, भाजीपाला क्षेत्राला बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ७६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान एकट्या विदर्भात झाले आहे. त्यातील ४३ हजार हेक्‍टर नुकसान हे केवळ संत्रा उत्पादकांचे आहे. हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असून, काही जिल्ह्यांत पाऊस सुरूच असल्याने नुकसान क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, ‘‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून प्रशासनाच्या माध्यमातून भरपाई दिली जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथे बोलताना दिली. सोमवारपासून (ता. ८) झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांतर्गत ३५ तालुक्‍यांना फटका बसला आहे. सुमारे १४२६ गावांतील ७५ हजार ७९९ हेक्‍टर क्षेत्रातील रब्बी पिकांची हानी झाली आहे. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, १७ मोठे व १२ लहान पशू मृत पावले आहेत.

Crop Damage
Crop Damage : अमरावती जिल्ह्यात नुकसान पोचले ५३ हजार हेक्‍टरवर

रब्बी हंगामातील गहू, चणा, ज्वारी, तीळ, कांदा, मका, बाजरी, भुईमूग, भाजीपाला यासह फळपिकांना जबर फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले आहे. ११ तालुक्यांतील ७२६ गावांतील ५३ हजार ४०२ हेक्‍टर क्षेत्रातील रब्बी पिके उध्वस्त झाली आहेत. यामध्ये संत्रा फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्याखालोखाल अकोला जिल्ह्यातील ११ हजार १५७ हेक्‍टर, यवतमाळमधील २३९४ , बुलडाणा ५२७७ व वाशीम जिल्ह्यातील ३५६८ हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल महसूल विभागाने दिला आहे. या पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. १७ मोठ्या व १२ लहान पशूंचा मृत्यू झाला आहे. २४१६ घरांची अंशतः तर ४३ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : उमरगा तालुक्यात वादळवाऱ्यासह गारपीट

विदर्भासोबतच खानदेशात ९ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यात ६ हजार, धुळे दोन हजार तर नंदूरबारमध्ये एक हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. मराठवाड्यात तीन दिवसांत २७१६ हेक्‍टर पिकाला दणका बसला. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात नोंदविण्यात आले.

त्या पाठोपाठ नांदेड, धाराशिव, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, परभणी हे जिल्हेही बाधित झाले. तीन व्यक्‍ती तसेच ८४ जनावरांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातही ५३ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. तसेच नगर जिल्ह्यात नेवासे, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांतही अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. निवडणुका सुरू असल्या तरी नुकसानीवर माझे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामे करून भरपाई देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

अमरावती ५३४०२

अकोला ११,१५७

यवतमाळ २३९४

बुलडाणा ५२७७

वाशीम ३५६८

नागपूर ८०.४

वर्धा ९५.४

गडचिरोली ०.६

खानदेश ९०००

मराठवाडा २७१६

सोलापूर ५३

एकूण ८७,७४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com