
Kharif Crop Insurance : राज्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २५ टक्के अग्रिम पीकविमा मिळविण्याचे आव्हान कृषी आणि महसूल विभागापुढे आहे. ८०० हून अधिक महसूल मंडलांमध्ये पावसाचा खंड आहे. तशी आकडेवारी असली तरी किरकोळ पाऊस पडल्याचा आधार घेऊन पीकविमा नाकारण्याकडे पीकविमा कंपन्यांचा कल आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती केली आहे.
दरम्यान, पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. २५) संभाजीनगर येथे विभागीय आढावा बैठक होईल.
राज्यात सध्या २६९ मंडलांत २१ दिवस, तर ४९८ मंडलांमध्ये १८ ते २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला आहे. तर ५२८ मंडलांमध्ये १५ दिवसांहून अधिक काळ खंड पडला आहे. पीक विम्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पादनामध्ये मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पन्नात ५० टक्के घट अपेक्षित असेल तर २५ टक्के अग्रीम दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत विमा कंपन्यांनी या नियमातून पळ काढत विमा नाकारल्याच्या तक्रारी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे आल्या आहेत.
सध्या राज्यात पावसाचा खंड पडल्याने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी पत्राद्वारे नजर पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. ज्या महसूल मंडलांमध्ये पावसाने ओढ दिली, तेथे पर्जन्यमापक यंत्रांद्वारे पावसाची ऑनलाइन नोंद होते. त्यामुळे किरकोळ पावसाचीही नोंद होते. या नोंदीचा फायदा घेऊन पीकविमा कंपन्या विमा रक्कम नाकारतात. परिणामी अग्रीम मिळण्याबाबत राज्य सरकारला कसरत करावी लागेल.
राज्यातील १५ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. यात नाशिकमधील सिन्नर, चांदवड, नांदगाव, नंदूरबार, नगरमधील श्रीरामपूर, राहुरी, पुण्यातील बारामती, पुरंदर, हवेली, साताऱ्यातील कोरेगाव, फलटण, सांगलीतील कडेगाव, खानापूर, विटा, कोल्हापुरातील राधानगरी, अमरावतीतील दर्यापूर या तालुक्यांचा समावेश आहे.
भात ः ४० ते ५१ हजार ७३०
ज्वारी : २० ते ३२ हजार ५००
बाजरी : १८ ते ३३ हजार ९१३
नाचणी : १३ हजार ७५० ते २० हजार
मका : ६ ते ३५ हजार ५९८
तूर : २५ ते ३६ हजार ८०२
उडीद : २० ते २६ हजार २५
भुईमूग : २९ ते ४२ हजार ९७१
सोयाबीन : ३१ हजार १५० ते ५७ हजार २६७
तीळ : २२ ते २५ हजार
कारळे : १३ हजार ७५०
कापूस : २३ ते ५९ हजार ९८३
कांदा : ४६ ते ८१ हजार ४२२
पीकविम्यात सहभागी शेतकरी : १ कोटी ७० लाख ४९ हजार ६३
विमा संरक्षित क्षेत्र : ११२. ४३ लाख हेक्टर
विमा संरक्षित रक्कम : ५४४३८ कोटी
राज्य विमा हप्ता अनुदान : ४७५५ कोटी
केंद्र विमा हप्ता अनुदान : ३२१६ कोटी
एकूण विमा हप्ता अनुदान : ७९७३ कोटी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.