Akola News : पश्चिम विदर्भात या महिन्याच्या सुरुवातीलाच अतिपावसाचा पिकांना फटका बसला आहे. या आपत्तीमुळे अकोल्यात सुमारे ४२ हजार, तर बुलडाणा जिल्ह्यात ११ हजार हेक्टर, तर वाशीम जिल्ह्यातही मोठे नुकसान झालेले असून, प्राथमिक आकडेवारीनुसार साडेनऊ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या तीन जिल्ह्यांतील नुकसान ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. अंतिम पंचनामे झाल्यावर यात मोठी वाढ होऊ शकते.
अकोला जिल्ह्यात २ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान केले. यात जिल्ह्यातील २९४ गावांमध्ये ४१ हजार ८८६ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद या पिकांचे हे नुकसान आहे. जिल्ह्यात सर्वाधिक अकोला तालुक्यात ५२ गावात १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे.
याशिवाय बार्शीटाकळीमध्ये ५४ गावांत ८४८ हेक्टर, मूर्तिजापूरमध्ये ६० गावांत दोन हजार हेक्टर, अकोट तालुक्यात ६२ गावांत १७ हजार ४०२ हेक्टर, बाळापूर तालुका ५५ गावांत २१०० हेक्टर व पातूर तालुक्यात ११ गावात १५३६ हेक्टरवर पिके बाधित झालेले आहेत. २ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आले होते. यामुळे पातूर तालुक्यातील चान्नी येथे रुख्माबाई दशरथ पवार (वय ४०) यांचा विश्वामित्र नदीला आलेल्या पुरात वाहून मृत्यू झाला. अकोला तालुक्यातील सुकोडा येथील दशरथ नारायण गायकवाड (वय ५५) यांचा नदीत पाय घसरून वाहून गेल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात ८२ घरांचे अंशत: नुकसान झाले असून, २१ जनावरेही दगावल्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांनी दिला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ११६०९ हेक्टर बाधित
सततच्या पावसाने जिल्ह्यात सुमारे ११,६०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याचा साडेसोळा हजार शेतकऱ्यांना फटका बसला. सर्वाधिक ४६२० हेक्टरवर मोताळा तालुक्यात नुकसान झाले आहे. याशिवाय चिखली २१५०, खामगाव १७००, नांदुरा १२००, शेगाव ९५०, बुलडाणा ३५०, मेहकर ३७९, लोणार २६० हेक्टरला फटका बसलेला आहे. खामगाव व मोताळा तालुक्यांत सुमारे सव्वाशेपेक्षा अधिक जनावरेही दगावली आहेत. तर २६ घरांचे नुकसानही झाले.
वाशीम जिल्ह्यात ९५२६ हेक्टरचे नुकसान
पाऊस व पुरांमुळे जिल्ह्यात साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात १ ते ३ सप्टेंबर या काळात २० महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसला. ९५२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ५२ हेक्टर जमीन खरडून जाणे व १५६ घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.