Sugarcane Water Management : ऊस पिकातही वाचवता येते ६० टक्के पाणी

Sugarcane Farming : उसासाठी वापरले जाणारे बेसुमार पाणी बहुसंख्य गावातील भूजल संपविण्यासही कारणीभूत ठरले आहे. अशा स्थितीमध्ये ऊस पिकातही कशा प्रकारे पाणी वाचवता येईल, याची माहिती घेऊ.
Sugarcane Water Management
Sugarcane Water ManagementAgrowon

सतीश खाडे

Sugarcane Farming Management : ऊस शेती आणि साखर कारखानदारी ही केवळ साखरेचे उत्पादन करते असे नाही, तर त्यातून अल्कोहोल, इथेनॉल आणि वीज ही अन्य उप-उत्पादनेही तितकीच महत्त्वाची असतात. नजीकच्या भविष्यकाळात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादनही क्रांतिकारी ठरणार आहे.

या उप-उत्पादनातून कारखाना, शेतकरी, सरकार या सर्वांच्याच उत्पन्नात भर पडणार आहे. परिणामी ऊस मागणी मोठ्या प्रमाणात वाढतच राहणार आहे. उसाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी सगळेच साखर कारखाने धडपडत असतात, त्यात आणखी वाढ होणार.

ऊस पिकासाठी वापरले जाणारे पाणी हीच एकूण समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची समस्या ठरणार आहे. खरेतर या पिकासाठी अन्य पिकाच्या तुलनेमध्ये आधीच पाणी जास्त लागते. मात्र पीक शास्त्र, सिंचन शास्त्रामध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे ऊस पिकात वापरले जाणारे पाणी कमी करणे शक्य असल्याचे पुढे येत आहे. या ज्ञानाचा अवलंब करून ऊस शेतीत ६५ ते ७० टक्के पाणी वाचविणारे अनेक शेतकरी आपल्याकडे आहेत.

ही पाणी बचत कशी शक्य होते?

ठिबक सिंचनाचा वापर.

लागवडीसाठी नर्सरी रोपांचा वापर.

मातीवर सेंद्रिय घटकांचे वा पाचटाचे आच्छादन.

पिकाला ताण सहन करण्यास मदत करणाऱ्या उत्पादनाची फवारणी. उदा. वसंत ऊर्जा इ.

Sugarcane Water Management
Sugarcane Farming : ऊसशेतीत सेंद्रिय शेतीपद्धती फायद्याची

ठिबक सिंचन

कोणत्याही पिकाच्या उत्तम वाढीसाठी मुळांना वाफसा स्थिती आवश्यक असते, भरपूर पाणी नव्हे! जमिनीत पिकांच्या मुळाभोवती ५० टक्के माती, २५ टक्के पाणी आणि २५ टक्के हवा असणे म्हणजेच वाफसा अवस्था.

आज बहुतांश शेतकरी ऊस पिकाला पाटपाणी पद्धतीने भरपूर पाणी देतात. त्यामागे उपलब्ध कालव्याचे आवर्तन, एकत्रित विहिरीतून मिळणारी पाण्याची पाळी, भारनियमन आणि विजेची उपलब्धता अशी अनेक कारणे असतात. मात्र या पाटपाणी पद्धतीमध्ये सुरुवातीला मातीतील सर्व पोकळ्या पाण्याने भरून

जातात. पाण्याचे बाष्पीभवन आणि निचरा होऊन वाफसा स्थिती येण्यास काही काळ लागतो. वाफसा आल्यानंतरच पिके पाणी व मातीतील अन्नद्रव्ये घेऊ शकतात. ही जमिनीची वाफसा अवस्था अगदीच अल्प काळ राहते. पुढे ओलावा कमी होत २५ टक्क्यांपेक्षा खाली जातो.

पाणी पाटाने पिकापर्यंत येईपर्यंतच्या वितरण पाटामध्येही पाणी निचरा होऊन बऱ्याच प्रमाणात वाया जाते. या दोन्ही समस्यांना उत्तर म्हणून सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये वितरणातील वाया जाणारे पाणी वाचते. वाफसा अवस्था दीर्घकाळ राहण्यास मदत होते. परिणामी उसाची वाढ होते, भरपूर फुटवे फुटतात.

सूक्ष्म सिंचनामुळे पाणी वाचते, हा खरेतर दुय्यम फायदा असल्याचे सर्व सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपन्या सांगतात. सूक्ष्म सिंचनामुळे पिकाच्या गरजेनुसार पाणी व अन्नद्रव्ये देता येतात, हा खरा फायदा आहे. केवळ लॅटरल शेतात अंथरून शेत पूर्ण ओले होईपर्यंत पाणी देणे म्हणजे ठिबक सिंचन नव्हे! पिकाच्या वाढीची अवस्था, त्या त्या दिवशीचे हवामान (तापमान, वाऱ्याचा वेग, हवेतील आर्द्रता इ.) यावर सिंचन चालू ठेवण्याचा कालावधी अवलंबून असतो.

याविषयी ऊस तज्ज्ञ अरुण देशमुख यांनी ऊस पिकाला पाणी देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारा लेख यापूर्वीच ॲग्रोवनमध्ये लिहिला होता. तक्ता खाली देत आहे. शेतकऱ्यांनी या तक्त्याचा वापर केल्यास पाटपाण्याच्या तुलनेमध्ये ५५ टक्के पाणी नक्कीच वाचू शकते.

अलीकडे भूमिगत ठिबक सिंचन (सबसरफेस ड्रीप) हे नवे तंत्रज्ञान पुढे आले आहे. त्यामध्ये जमिनीच्या खाली साधारणतः एक ते दीड फूट अंतरावर, पण मुळांच्या कक्षेमध्ये ठिबकच्या लॅटरल अंथरल्या जातात.

त्याद्वारे थेट उसाच्या मुळांपाशी पाणी दिले जाते. यात ७० ते ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी वाचते. तितकीच खतांचीही बचत होते. वर अजिबात ओलावा नसल्याने तणांची फारशी वाढ होत नाही. तणनिर्मूलनासाठीचा खर्चही कमी येतो. जमिनीत क्षारही अत्यल्प राहतात.

आच्छादन (मल्चिंग)

उसाची लागवड सुरू असो की आडसाली, परिसरात उपलब्ध पिकांच्या अवशेषाने ऊस पिकाभोवती आच्छादन केलेच पाहिजे. उदा. भात, गहू यांचे तूस किंवा भुस्सा, तुराटी, कपाशीची पऱ्हाटी, सोयाबीनचे अवशेष, फळबागेतील छाटलेल्या काड्या किंवा फांद्या इ. काही शेतकरी खोडव्यामध्ये पाचटाचे आच्छादन करतात, पण सुरू व आडसालीच्या पहिल्या पिकालाही आच्छादन करायलाच हवे.

फायदे

जमिनीतील ओलाव्याच्या बाष्पीभवनाचा वेग बराच कमी होतो. पाण्याची मोठी बचत होते.

हेच सेंद्रिय पदार्थ काही काळात कुजतात. त्यातील सेंद्रिय कर्ब व अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात. जमिनीची सुपीकता वाढते.

या सेंद्रिय खतामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात. जलधारणक्षमता पूर्वीपेक्षा सहापट वाढते. यामुळे ही पिकाला पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या कमी द्याव्या लागतात. पाणीटंचाईमध्ये दोन पाळ्यांतील अंतर वाढले तरी पीक चांगले तग धरू शकते. सातव्या महिन्यापासून उभ्या उसाचेच पाचट काढून शेतात अंथरावे. असे पाचट काढल्याने उसाभोवती हवा खेळती राहून पीक वाढीवर चांगला परिणाम होतो. मल्चिंगमुळे आठ ते दहा टक्के पाणी वाचते.

Sugarcane Water Management
Sugarcane Water Management : पूर्वहंगामी उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र

उसाची रोपवाटिका महत्त्वाची...

रोपवाटिकेमध्ये एक डोळा पद्धतीने रोपांची वाढ केल्यास बेणे कमी लागते. तसेच रोपवाटिकेच्या कमी क्षेत्रात ३० ते ३५ दिवस रोपाची वाढ होते. इथे कमी क्षेत्रात पाणीही कमी लागते. संपूर्ण क्षेत्रातील पाण्याच्या दोन ते तीन पाळ्याही वाचतात. यामुळे दोन ते तीन टक्के पाणी वाचते.

वरील तीन उपाययोजना अत्यंत काटेकोर व काळजीपूर्वक राबविल्या तर ६० ते ६५ टक्के पाणी वाचू शकते. भूजल अबाधित राहून पाणी टंचाईच्या काळात संरक्षित सिंचनासाठी वापरता येईल.

ठिबक सिंचन का करायचे? (अपसमजांना उत्तरे)

१) आमच्या पाटाचे पाणी असताना ठिबकचा खर्च का करावा?

उत्तर : पाणी बचत हा एक मुद्दा आहे. पण पिकाच्या वाढीच्या अवस्था, वातावरण यानुसार ठरणाऱ्या गरजेप्रमाणे योग्य तितके पाणी आणि अन्नद्रव्ये देण्यासाठी ठिबक केले पाहिजे. चांगल्या दर्जाचे ठिबकसाठी एकरी चाळीस हजारांपर्यंत खर्च येतो, असे गृहीत धरले तर ते उत्तम देखभालीनंतर दहा वर्षे टिकते.

म्हणजे वर्षाला चार हजार रुपये इतकीच गुंतवणूक येते. खते, खूरपण यांचा वाचलेला खर्च अनेक वेळा चार हजारांपेक्षा जास्त येतो. ठिबकचा खर्च एक किंवा दोन पिकांच्या वाढलेल्या उत्पादनातूनच निघून जाईल, यात शंका नाही.

२) आम्ही वाफे किंवा वरंब्याच्या पूर्ण उंचीपर्यंत भरून पाटपाणी देतो. म्हणजे पाणी जमिनीत जिरून विहीर व बोअरवेलचे पाणी वाढते.

उत्तर : मिळालेले पाटपाणी वाळू किंवा दगडाच्या साह्याने तयार केलेल्या गाळणयंत्रणेतून विहीर व बोअरवेल पुनर्भरणासाठी वापरावे. वर आपण उल्लेखलेल्या पद्धतीने शेतात भरलेल्या पाण्यापैकी जमिनीच्या प्रकारानुसार चार ते सहा टक्केच पाणी जमिनीत जिरते. पुनर्भरण केल्यास ८० टक्के पाणी जमिनीत मुरेल.

३) जास्त पाण्यामुळे ऊस चांगला येतो. ठिबकने पाणी कमी पडून ऊस वाढत नाही.

उत्तर : ही खूप मोठी अंधश्रद्धा आहे. कोणत्याही पिकाची पाण्याची निश्‍चित गरज असते. तेवढेच पाणी पीक उचलत असते. बाकीचे सर्व पाण्याचे बाष्पीभवन होऊन किंवा निचरा होऊन वाया जाते. सतत अधिक पाणी राहिल्यास अन्नद्रव्याचे शोषण होत नाही. ती वाया जातात. मर्यादित पाणी, वाफसा अवस्था आणि पिकाची सुदृढ वाढ हे एकमेकाशी जोडलेले आहे, हे कायम लक्षात ठेवावे.

...असे वाचते पाणी

ऊस पिकाला लागणारे प्रत्यक्ष पाणी (१८ महिने) : १ कोटी ८० लाख लिटर.

पाट पद्धतीने वाफे तुडुंब भरेपर्यंत दिले जाणारे पाणी : २ कोटी ४० लाख लिटर वा त्याहून अधिक.

ठिबक सिंचनामुळे लागणारे पाणी ः ९८ लाख लिटर.

रोपे लागवड + ठिबक + मल्चिंग या एकत्रित उपाययोजनांमुळे लागणारे पाणी = ६३ लाख लिटर.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com