Agriculture News Sangli : जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये ४ हजार ४३५ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ५७ टक्के पाणीसाठा (Water Stock) शिल्लक आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ४ हजार ८८४ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक होता.
गतवर्षीच्या तुलनेत सध्या ४४९ दशलक्ष घनफूटने पाणीसाठा कमी आहे. तर एक तलाव कोरडा असून, सध्या जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई (Water Shortage) नसली तरी, येत्या महिन्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पाच मध्यम आणि ७९ लघू प्रकल्पांमध्ये ९ हजार ४४० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठवण क्षमता आहे. सर्वाधिक प्रकल्प जत तालुक्यात आहेत. जिल्ह्यात यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यानंतर परतीचाही पाऊस चांगला झाला.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातही परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील भूजल पातळीही वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला नाही.
त्यातच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई भासली नाही.
ऑक्टोबर महिन्यात ७० टक्केसाठा शिल्लक होता. गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी कमी होत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील एक तलाव कोरडा आहे, तर जत तालुक्यातील एका तलावात मृत पाणीसाठा शिल्लक आहे.
चार तलावांत २५ टक्के, २९ तलावांत २५ ते ५० टक्के, तर ५० ते ७५ टक्के ३२ तलावांत आणि १६ तलावांत ७५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यांतील प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने या भागात पाणीटंचाई भासली नाही. परंतु येत्या काळात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.