Nagpur News : सलग तीन दिवस बरसल्यानंतर पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता. २२) पावसाने उघडीप दिली. मात्र त्यानंतरही नदी, नाले आणि प्रकल्पांतील पाणीपातळी वाढलेली असल्याने गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्गावर वाहतूक बंद होती. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात तब्बल २७ मार्ग बंद आहेत. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याने प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. २२) अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पवनी १३०.८, आसगाव २८०, आमगाव १२६, सावरला १९२, विरली १५२.३, लाखांदूर १६३.१, बारव्हा २२६, मासळ १७०, भागडी १३३ मिलिमीटर याप्रमाणे मंडलनिहाय पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आसगाव (ता. पवनी) येथे घरामध्ये पाणी शिरले. या गावात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. विरली (ता. लाखांदूर) या गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. परिणामी प्रशासनाकडून या ठिकाणी देखील बचाव कार्य राबविण्यात आले. आठ ते दहा नागरिकांना या ठिकाणावरून रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
राजनी गावातही १५ ते २० नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले असून त्यामध्ये दोन गरोदर महिलांचा देखील समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात सहा तालुके व १३ मंडलांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे.
त्यासोबतच पाच मंडलांमध्ये अतिवृष्टीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. त्यामध्ये पुराडा मंडळात १६३, कुरखेडा १५०.५, संकारपूर १४७, आरमोरी १४४, कढोळी १२०.२ मिमी याप्रमाणे पाऊस पडला.
गडचिरोली जिल्ह्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल २७ मार्गावरील वाहतूक बंद होती. दुपारी तीन वाजेनंतर पाच मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र २२ मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने त्यांचा शहरांशी संपर्क तुटला होता.
दिना धरणही ओव्हरफ्लो झाले होते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने प्रशासनाकडून ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गावातील नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी पावसाने उघडीप दिली असली तरी पूरामुळे अनेक मार्ग बंद होते.
प्रशासनाकडून शाळांना सुट्टी
भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या तीन जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुरात तिघांचा मृत्यू
पावसाचा शेतीला सर्वाधीक फटका बसला आहे. प्रशासनाकडून नुकसान सर्व्हेक्षणाचे देखील आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पुराच्या पाण्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.