Nashik News : ‘‘महाराष्ट्रात सरकार फक्त काम करण्याचे ढोंग करतेय. इथे शेतकऱ्यांची थट्टा करण्याचे काम सुरू आहे. सरकारचे धोरण हे शेतकरीविरोधी आहे. राज्यात पाहिले तर नागपूर २९९, अमरावती १२४०, मराठवाडा १०९७, पुणे ३१ तर नाशिक विभागात २५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
अशा एका वर्षात २९३१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केली.
नाशिक येथे झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या भाषणात दानवे बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेतीविषयक घोषणा व धोरणांची चिरफाड केली.
दानवे म्हणाले, ‘‘पीकविमा हा विमा कंपन्यांची खळगी भरण्यासाठी दिला जातो की काय या प्रकारची स्थिती आहे. महाराष्ट्रात ८ हजार कोटी रुपयांचा पीकविमा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पारड्यात फक्त ३.५ हजार कोटी रुपये पडले. त्यामुळे ४.५ हजार कोटी रुपये पीकविमा कंपन्यांच्या पारड्यात पडले आहेत.
सरकारने १ रुपयात दिलेली पीकविमा योजना फसवी आहे. अग्रिम २५ टक्के देण्याचे सांगितले; मात्र तेही शेतकऱ्यांच्या पारड्यात पडले नाही. मागच्यावर्षी सुद्धा ४.५ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले. ‘एक रुपयात पीक विमा’ही फसवी योजना आहे.’’
‘सरकार शेतकऱ्यांचे नुकसान करतेय’
‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ३२ लाख ४० हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. ‘शासन आपल्या दारी’ असे सांगितले जाते; मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना दिला जात नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा देत नाही. कांद्याला अनुदान नाही. कापूस, सोयाबीन पिकाला भाव नाही. सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचे नुकसान करतेय,’’ अशी टीका दानवे यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.