Farmer Death
Farmer DeathAgrowon

Farmer Death : पांगरीत शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Issue : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील गोरख कचरू शिरसाट या ४८ वर्षांच्या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Nashik News : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील गोरख कचरू शिरसाट या ४८ वर्षांच्या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये सिन्नर व्यापारी बँक व बहुउद्देशीय बँकेने थकित कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने मानसिक नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

पांगरी-सुरेगाव रस्त्यावर असलेल्या शेतात गोरख शिरसाट यांचा पोल्ट्री फार्म आहे. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची पत्नी पोल्ट्री फार्ममध्ये गेल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत शिरसाट यांचा मृतदेह आढळला. पत्नीने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली.

Farmer Death
Farmer Death : राज्यात १० महिन्यांत २३६६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मृतदेह खाली उतरवण्यात आला मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. वावी पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता शिरसाट यांच्या खिशात पत्र आढळून आले. सिन्नर व्यापारी बँकेचे दीड लाख रुपये कर्ज घेतले होते.

त्यापैकी एक लाख रुपये कर्ज देणे आहे. तर बहुउद्देशीय बँकेचे दोन लाखांचे कर्ज आहे. त्या कर्जापोटी एक लाख वीस हजार रुपये भरावेत म्हणून तगादा सुरू असल्याने होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत आहे, असे पत्रात लिहिले आहे.

वावीचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, हवालदार सतीश बैरागी यांनी पत्र ताब्यात घेतले. शिरसाट यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगा सिन्नरला खासगी कंपनीत आहे, तर दुसरा घरची पोल्ट्री सांभाळतो.

शिरसाट यांच्यावरील कर्जाचा आकडा ३५ लाखांच्या घरात असल्याचे मित्र व नातेवाईकांचे म्हणणे आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून या कर्जाची योग्य सेटलमेंट व्हावी यासाठी स्वतः शिरसाट यांच्यासह त्यांचे मित्र व नातेवाईक प्रयत्नशील होते.

Farmer Death
Farmer Death : शेतकरी आत्महत्यांप्रकरणी न्यायालयाने घ्यावी दखल
दुष्काळ व सरकारने सिन्नरच्या शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. दुष्काळी तालुक्याच्या यादीत सिन्नरचा समावेश आहे. मग त्या ठिकाणी बँका शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा का करत आहेत. बँकेच्या प्रशासकावर शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.
संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
पांगरी येथील शेतकरी गोरख शिरसाट यांच्या आत्महत्येसंदर्भात वरिष्ठ स्तरावर कळवण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली याबाबत महसूल विभागामार्फत तातडीने पडताळणी करण्यात येईल. संबंधित गावचे तलाठी, मंडल अधिकारी व पोलिसांना त्या संदर्भात तपास करण्याची सूचना दिली आहे.
सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर

देवपूरलाही शेतकऱ्याची आत्महत्या

सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोपट सुभाष कोकाटे (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कोकाटे यांनी आपल्या राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले.

नातेवाइकांनी त्यांना तत्काळ खाली उतरविले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार बागुल तपास करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com