Solapur News : यंदाचा ऊस गाळप हंगाम संपून आता दोन ते तीन महिने उलटत आले, पण जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे एप्रिलअखेर २५७.४८ कोटी रुपये एफआरपी अद्यापही थकित आहे, पण या ‘एफआरपी’बाबत कारखानदार मात्र बोलायला तयार नाहीत.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ३७ साखर कारखान्यांनी गाळप केले. या कारखान्यांनी जवळपास १ कोटी ८१ लाख ६१ हजार ६१३ टन उसाचे गाळप करून १ कोटी ६२ लाख ६१ हजार ५१२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जिल्ह्यातील काही कारखान्यांचा हंगाम संपून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे.
कारखान्यात ऊस गाळप झाल्यावर १४ दिवसांत पूर्ण एफआरपी देणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यानंतर १५ टक्के व्याजासह एफआरपी देण्याची कायद्यात तरतूद आहे. तरीही जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी मोठ्या प्रमाणावर थकविल्याचे दिसून येत आहे. आता ती व्याजासह मिळणार का हा खरा प्रश्न आहे.
शेतकरी दुष्काळाने ग्रासले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. अशातच तोंडावर आलेला खरीप हंगाम, पाणीटंचाई, चारा, शेतातील करायची मशागतीची कामे, लग्नकार्ये, मुलाबाळांचे शिक्षण, उसनवारी आदी खर्च भागवायचा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक कारखान्यांनी ऊस मिळवण्याच्या स्पर्धेत गाजावाजा करत पहिला हप्ता दिला. तथापि, आता काही कारखान्यांनी तर शेवटच्या दोन महिन्यात गाळप झालेल्या उसाचे प्रतिटन दीड ते दोन हजार रुपये हातात टेकवून शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे.
कारखानानिहाय ३० एप्रिलअखेर थकीत एफआरपी (आकडे कोटींत)
कारखाना थकीत बिल
सिद्धेश्वर १६.६५
संत कुर्मदास २.११
लोकनेते २०.४७
सासवड माळी १४.८६
लोकमंगल, बिबीदारफळ ५.४६
लोकमंगल, भंडारकवठे ५.१६
विठ्ठल कार्पोरेशन ३६.०२
सिद्धनाथ ९.०८
जकराया ५.६२
भैरवनाथ, विहाळ १०.१३
भैरवनाथ, लवंगी ४.७०
मातोश्री २२.५६
भैरवनाथ, आलेगाव ८.५१
बबनरावजी शिंदे १०
जयहिंद १५.८८
विठ्ठल रिफाईंड १७.६६
भीमा ४.९३
सहकार शिरोमणी ८.६५
धाराशिव, सांगोला ८.३६
विठ्ठल, पंढरपूर २४.८१
आदिनाथ ०.८१
येडेश्वरी ५.०५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.