
Pune News : शेतकरी प्रयोगशील व कष्टाळू असला तरी शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीची कमतरता आहे. त्यामुळे पोकराच्या धर्तीवर पाच वर्षांसाठी २५ हजार कोटी रुपयांची नवी कृषी योजना लागू केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी 'अॅग्रोवन'च्या शाश्वत शेती परिषदेत दिली.
‘अॅग्रोवन’च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने काल (ता. २०) पुण्यातील 'यशदा'मध्ये राज्यभरातील प्रय़ोगशील शेतकरी, कृषी व संलग्न क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर होते. शाश्वत शेती करणारे शेतकरी सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी गौरविण्यात आले.
द्विदशकपूर्ती निमित्ताने 'अॅग्रोवन'वर परिषदेत शुभेच्छांचा वर्षाव झाला. दोन्ही मंत्र्यांनी कृषी क्षेत्रावर दिलखुलास व्यक्त केलेली मते, अभ्यासपूर्ण चर्चासत्रे आणि शाश्वत शेतीच्या ध्यासाने राज्यभरातून जमा झालेल्या शेतकऱ्यांनी मनापासून दिलेली दाद, असे भारावलेले वातावरण या परिषदेचे होते.
सरकारी धोरणातही बदल हवा : अॅड.कोकाटे
कृषिमंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, "परवडत नसलेली शेती, त्यातून तयार होणारी उदासिनता, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या, दुसऱ्या बाजूला कृषी खात्यात नसलेली कार्यक्षमता अशा अनेक बाबी शेतीमधील समस्यांना जबाबदार आहेत. राज्यातील शेतकरी मेहनती आहेत. परंतु, त्याला उत्पन्नाची हमीच नाही.
शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक नसल्यामुळे शेतकऱ्याला शेतीमध्ये साधनसुविधांसाठी कर्ज काढावी लागते. त्यातून तो कर्जबाजारी होतो आहे. शेतकऱ्याला गरजेनुरुप फायदा देणारे व सुलभ ठरणारे सरकारी धोरण हवे आहे. त्यामुळेच मी पोकराच्या धर्तीवर दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली नवी योजना आणण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतो आहे.”
'एआय'च्या माध्यमातून शेतीला बदलवू
शेतीमध्ये विविध संकटे येत असले तरी थांबून चालणार नाही. शेतीला कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) तंत्राच्या माध्यमातून बदलू, असा संकल्प अॅड.कोकाटे यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मला बारामतीमधील एआय तंत्राचे प्रयोग दाखविले आहेत. शेतीला गरजेनुसार पाणी, निविष्ठा देणारे हे तंत्र आहे. या तंत्राच्या वापरातून उत्पादनखर्च कमी करून गुणवत्तेसह उत्पादकता वाढ शक्य आहे.”
शेती, ग्रामीण अर्थकारण मजबूत व्हावे : मोहोळ
केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री.मोहोळ म्हणाले, “ शेती व ग्रामीण भागाचे अर्थकारण मजबूत झाल्यास भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. देशात जवळपास ५० टक्के लोकसंख्या शेतीशी जोडली गेली आहे. त्यामुळे शेतकरी समृध्द झाला नाही तर देश म्हणून आपण नेमके कुठे आहोत, याचे आत्मपरीक्षण करावे लागेल.
शहरीकरण, हवामान बदल, निविष्ठांचा अतिरेकी वापर, त्यातून पशू व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशा शेतीमधील समस्या चिंताजनक आहेत. आता इथून पुढच्या काळात सेंद्रिय, शाश्वत शेती पध्दतीला महत्त्व द्यावे लागेल. राज्य सरकार विविध पातळीवर शेतीसाठी काम करते आहे. मात्र, केंद्र सरकारदेखील कृषी व सहकारासाठी वेगाने धोरणात्मक निर्णय घेते आहे."
दोन लाख नव्या सोसायट्या काढणार
२०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आधी ग्रामीण भारत व शेती समृध्द झाली पाहिजे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामुळेच केंद्रीय सहकार मंत्रालयाने शेती व गाव समृध्दीसाठी देशातील विविध कार्यकारी सोसायट्या मजबूत करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करताना श्री.मोहोळ म्हणाले की, देशात गावपातळीवर एक लाख सोसायट्या असून दोन लाख नव्याने तयार होणार आहेत.
कर्जवाटपाशिवाय २५ प्रकारचे नवे व्यवसाय करण्यास सोसायट्यांना मान्यता दिली गेली आहे. सोसायट्यांच्या कामात सुलभता व पारदर्शकता संगणकीकरणाला प्राधान्य दिले आहे. देशाच्या सहकाराला पुढील पाच वर्षात १७ लाख नवे मनुष्यबळ लागेल. त्यासाठी केंद्रीय सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सुविधा उभारण्यात येईल.
एआयची गंगा दारात आणली : पवार
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष श्री.पवार म्हणाले, "समाजाला उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आमच्या समूहाचा आहे. शेती, पाण्यासारख्या विषयावर राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकोप्याने काम केले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, लोकांनी काय करावे यापेक्षा आम्ही काय करायला हवे, याचा विचार मी सतत करतो. त्यातूनच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्र आणण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला.
त्यासाठी बारामतीच्या अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने स्वतःचा पैसा, परिश्रम गुंतवून एआय तंत्र यशस्वीपणे राज्यात आणले आहे. त्याला मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ यासारख्या जगद्विख्यात संस्थांची साथ मिळाली. एआय तंत्रज्ञान सर्व पिकांमध्ये देशभर नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एआयच्या रुपाने समृध्दीची गंगा आम्ही दाराशी आणली असून त्याचा वापर झाल्यास मला समाधान मिळेल."
माध्यमांमध्ये आणली नवी परिभाषा : चव्हाण
अॅग्रोवनचे संपादक संचालक श्री.चव्हाण यांनी माध्यम क्षेत्रात दोन दशकाची यशस्वी वाटचाल केलेल्या 'अॅग्रोवन'ने शेतकरी हिताची वेगळी परिभाषा तयार केल्याचे स्पष्ट केले. "शेती ही शोषणावर आधारित व्यवस्था आहे. शेतात राबणाऱ्या उत्पादकाला मूल्य मिळण्यापेक्षा राजकीय धोरणं नेहमीच ग्राहकाच्या स्वस्ताईचा दृष्टिकोन ठेवतात. 'अॅग्रोवन'ने मात्र हा दृष्टिकोन बदलविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यासाठी सातत्याने नवतंत्र, यशोगाथा मांडल्या. यातून हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती झाली. शेतकरी अॅग्रोवनला देव मानतात. अॅग्रोवनला हे देवत्व राज्यातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांनीच दिले असून यापुढेही फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत अॅग्रोवन काम करेल," अशी ग्वाही श्री.चव्हाण यांनी दिली.
'अॅग्रोवन' मार्गदर्शन घेण्यास सरकार सरसावले
गेल्या २० वर्षांपासून गावशिवारातील प्रयोग व जागतिक तंत्रज्ञान विषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतीला नवी दिशा देणाऱ्या 'अॅग्रोवन'चे शाश्वत शेती परिषदेत प्रमुख पाहुण्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले,"अॅग्रोवनच्या माध्यमातून शेतीसाठी पुढे आलेल्या कोणत्याही विषयावर काम करण्यास आमची तयारी आहे. तुमचे मार्गदर्शन स्वीकारण्यास आम्ही तत्पर आहोत." तर कृषिमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी," आम्ही सरकार चालवतो म्हणजे आम्हालाच सर्व कळते असे अजिबात नाही. 'अॅग्रोवन'ने सरकारला जरुर सूचना सांगाव्यात. आम्हाला सतत चर्चेसाठी बोलवावे. शेती क्षेत्रात बदल व नवतंत्र आणण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी अॅग्रोवनने आम्हाला हक्काने काम सांगावे,"असे आवाहन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.