Nanded News : नांदेड विभागात ऊस शिल्लक असल्याने उन्हाच्या चटक्यात २९ पैकी अद्याप १८ साखर कारखाने सुरू आहेत. तर ११ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी एक कोटी १६ लाख चार हजार १९४ टन उसाचे गाळप, तर एक कोटी १८ लाख ३९ हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ साठी २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर करण्यांचा समावेश होता.
हा गाळप हंगाम ता. एक नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. आजपर्यंत नांदेड विभागातील कारखान्यांनी एक कोटी १६ लाख चार हजार १९४ टन उसाचे गाळप तर एक कोटी १८ लाख ३९ हजार पाचशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. अद्याप गाळपाअभावी ऊस शिल्लक असल्याने १८ साखर कारखाने सुरू आहेत. तर ११ कारखाने बंद झाले आहेत.
परभणी जिल्ह्यातील सात कारखान्यांपैकी सहा कारखाने बंद झाले आहेत, तर बळीराजा साखर हा खासगी कारखाना सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचपैकी तीन कारखाने बंद झाले आहेत. तर भाऊराव चव्हाण डोंगरकडा व पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत हे दोन कारखाने सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील सहा पैकी पाच कारखाने बंद झाले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव हा कारखाना सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील ११ पैकी चार कारखाने बंद झाले आहेत. तर विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा, ओंकार साखर कारखाना, विलास सहकारी साखर कारखाना निवळी, श्री साईबाबा शुगर, जागृती शुगर, रेणा सहकारी साखर कारखाना, रेणापूर, विलास सहकारी साखर कारखाना, तोंडापूर आदी कारखाने एप्रिल महिना आला तरी अद्याप सुरू आहेत.
परभणीमधील दोन कारखाने गाळपात आघाडीवर
नांदेड विभागातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर ॲन्ड एनर्जी लि. या खासगी साखर कारखान्याने सात लाख ९२ हजार ४७ टन उसाचे गाळप केले आहे. तर परभणी जिल्ह्यातीलच ट्वेन्टीवन शुगर, सोनपेठ या कारखान्याने सात लाख ५५ हजार ७१० टन उसाचे गाळप केले आहे. हे दोन्ही कारखाने सध्या बंद झाले आहेत.
कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन
नांदेड सहा १९,३४,५५२ १९,२२,९३५
लातूर ११ ४८,२७,६६५ ५१,१९,०२५
परभणी सात ३३,२६,२२२ ३२,९२,०४०
हिंगोली पाच १५,१५,७५५ १५,०५,५००
एकूण २९ १,१६,०४,१९४ १,१८,३९,५००
विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.९५ टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.