
नगर ः नगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात यंदा पहिल्यांदाच सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ (Yellow Mosaic Outbreak On Soybean) विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील साधारपणे पंधरा टक्के म्हणजे सुमारे पावणे सात लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्याचा सोयाबीन उत्पादनावर (Soybean Production) परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण महत्त्वाचे आहे.
राज्यात अलीकडच्या दोन वर्षांत बाजरीसारख्या पिकांचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन क्षेत्र वाढत आहे. यंदा सुमारे ४४ हजार हेक्टरच्या जवळपास पेरणी झाली आहे. नगर, सोलापूर, नाशिक, विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, सातारा, सांगली भागांत सोयाबीन लागवड केली जाते. पुणे जिल्ह्याच्या काही भागातही सोयाबीन दिसून येत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. यंदा बाजारात सोयाबीनला दरही चांगला आहे.
यावर्षी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. मात्र मराठवाडा, विदर्भातील काही भाग, नगर जिल्ह्याचा काही भाग, सोलापूर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे सोयाबीन सुकत आहे. त्यात यंदा पहिल्यांदाच सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ विषाणूंचा प्रादुर्भाव दिसत आहे.
कृषी अभ्यासकांच्या मते, आतापर्यंत राज्यात १५ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे पावणे सात लाख हेक्टर क्षेत्राच्या जवळपास सोयाबीन क्षेत्र ‘येलो मोझॅक’ने ग्रासले आहे. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढले असले तरी सोयाबीनवर व्हायरसचे संकट घोंघावत आहे. ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण महत्त्वाचे असल्याचे सांगत कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाने उपाययोजना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. मात्र असे असले तरी उत्पादनावर नक्कीच परिणाम होणार असल्याची शेतकऱ्यांना भीती आहे.
पाऊस नसल्याचा परिणाम
राज्यात साधारणपणे दीड महिना सलग पाऊस पडल्यानंतर आता आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. घाटमाथ्यावर, धरणांच्या पाणलोटात पाऊस झाला असला तरी अजूनही मराठवाडा, नगर, विदर्भातील काही भागांत पुरेसा पाऊस नाही. हलक्या व रिपरिप पावसाने पिकांना जीवदान मिळाले. मात्र आठ दिवसांपासून उघडीप असल्याने सोयाबीन सुकू लागले आहे. चार-पाच दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर सोयाबीनला फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
‘पांढऱ्या माशीचे नियंत्रण महत्त्वाचे
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद देशमुख म्हणाले, ‘‘सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ विषाणूंचा प्रादुर्भाव होण्यास पांढरी माशी कारणीभूत आहे. या माशीचे नियंत्रण करण्यासाठी पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव दिसून येत आहे, ती झाडे उपटून टाकावीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीआधी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केली, त्यांच्या सोयाबीनवर या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला नाही. आपल्याकडे कधीही सोयाबीनवर हा विषाणू पाहायला मिळत नव्हता. आता मात्र बहुतांश भागात हा विषाणू दिसत आहे. बदलत्या वातावरणाचाही हा परिणाम आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.