Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील लातूर, धाराशिवमध्ये शुक्रवारी (ता. ७)सकाळपर्यंतच्या २४ तासात काही मंडलांमध्ये झालेला तुरळक, हलका, पाऊस वगळता पावसाने उसंत घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड येथील काही मंडळांमध्ये तुरळक हलका तर काही मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला.
पावसाचा लहरीपणा यंदा सुरवातीपासूनच अनुभवला मिळतो आहे. काही मंडलांमध्ये धो धो बरसणारा पाऊस काही मंडलात तुरळक, हलक्या स्वरूपाचाच बरसतो आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील ८३ मंडळात हजेरी लावणारा पाऊस १८ मंडळात २० ते ५८ मिलिमीटर दरम्यान बरसला.
जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सरासरी २५ मिलिमीटर तर सोयगाव तालुक्यात सरासरी ३२ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ मंडलांपैकी ४४ मंडळात पाऊस झाला. त्यापैकी दहा मंडळात २० ते ६१ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील अंबड, जालना तालुक्यात पावसाचा जोर इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक होता.
बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २४ मंडळात तुरळक, हलका, पाऊस झाला. तर ३९ मंडळात पावसाचा टिपूसही बरसला नाही. गुरुवारी व शुक्रवारच्या सकाळच्या सत्रात पावसाने दिलेल्या उसंतीमुळे कपाशी लागवडीसह इतर पिकांच्या पेरणीला गती मिळाली होती.
लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४६ मंडळात पावसाचा टिपूसही बरसला नाही. दुसरीकडे १४ मंडळात पावसाची तुरळक, हजेरी लागली.
लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर या तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. धाराशिव जिल्ह्यातील ४२ मंडळापैकी ३४ मंडळात पावसाचा टिपूसही बरसला नाही. केवळ आठ मंडळात पावसाची हजेरी तुरळक स्वरूपाची राहिली. पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरी गत दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनी गती पकडली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.