
नंदुरबार : आदिवासींच्या शिक्षण (Education For Tribal), आरोग्य व उपजीविका या तीन महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आदिवासींच्या स्थलांतराचा (Tribal Migration) प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार (Employment For Tribal) उपलब्ध करून देणार, असे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी सांगितले.
मुंबई येथे आज (ता. १९) आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय संकुल विकास क्षेत्रातील आदिवासी विकास योजनांचा आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार समीर उराव, योजक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे, खासदार अशोक नेते, खासदार डॉ. हीना गावित, आमदार अशोक उईके, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. आदी या बैठकीस उपस्थित होते.
नंदुरबार व धुळे लोकसभा क्षेत्रातील नटावद संकुल, दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील भोरमाळ संकुल, गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील चातगाव या संकुलांचा आढावा व आदिवासी क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. मंत्री डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी औद्योगिक समूहांतर्गत आदिवासी उद्योजकांना एकाच छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडवून आणणे, हा आमचा उद्देश आहे.
राज्यातील अनेक आदिवासी बांधव रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यांना राहत्या ठिकाणी काही छोटे मोठे व्यवसाय उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. यासाठी राज्यातील सर्वच आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करणे सुरू आहे., असेही डॉ. गावित यांनी सांगितले.
आदिवासी युवक -युवतींना शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षणासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू आहे. आदिवासीबहुल गावांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजना एक चांगली संकल्पना महाराष्ट्रातील आदिवासीबहुल गावामध्ये राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर याबाबत बैठका घेण्यात येत आहेत. आदिवासींच्या मूलभूत समस्या व प्रश्न जाणून ते सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे डॉ. गावित यांनी सांगितले.
कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू
नेट शेड वितरित करणे तसेच आदिवासी हस्तकला, कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतीमालाची स्वच्छता, वर्गीकरण आणि पॅकिंग सुविधा, तसेच निर्यातीस चालना देण्याकरिता साह्य आणि प्रशिक्षण आदिवासी बांधवांना देण्यात येईल. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रमाचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, त्याची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.