Girna Valley : गिरणा खोरे तहानलेलेच ठेवणार का?

Goadavari Valley : आधीच गिरणा खोरे अवर्षणग्रस्त असताना या खोऱ्यासाठी केवळ प्रस्तावित असलेल्या वांजूळ पाणी-मांजरपाडा दोनचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची घोषणा बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून कसमादेवासीयांच्या तोंडाला पाने पुसली.
Girna Valley
Girna ValleyAgrowon

Nashik News : अतितुटीच्या गिरणा खोऱ्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि नांदगाव या जिल्ह्यातील तालुक्यांसाठीचे हक्काचे पाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून आधीच गोदावरी खोऱ्यात पळविण्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांचा सिंहाचा वाटा होता.

आधीच गिरणा खोरे अवर्षणग्रस्त असताना या खोऱ्यासाठी केवळ प्रस्तावित असलेल्या वांजूळ पाणी-मांजरपाडा दोनचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची घोषणा बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून कसमादेवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. गिरणा खोरे उपाशीच ठेवणार का, असा प्रश्न वांजूळ पाणी संघर्ष समितीने उपस्थित केला.

Girna Valley
Solapur Rain Update : सोलापूर जिल्ह्यातील ७१ मंडलांत अत्यंत कमी पाऊस

उपमुख्यमंत्री पवार यांच्या विधानाचा निषेध करून, असा प्रयत्न झाल्यास पुन्हा एकदा मांजरपाडा-२ जनआंदोलन उभे राहणार, अशा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. आधी इथली तहान भागवा, मग काय न्यायचे ते पाणी तिकडे न्या, पण घरच्याला उपाशी ठेवून दारच्याचे पोट भरू नका, असा उपरोधिक टोलाही समितीने लगावला.

मांजरपाडा हा गिरणा खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी असलेला सिंचन प्रकल्प तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरील खोऱ्यात रात्रीतून वळवून नेत गिरणा खोऱ्याला तेव्हाही उपाशी ठेवले.

त्या वेळी सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली मांजरपाडा आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाची धग म्हणून तेव्हा कसमादेवासीयांसाठी मांजरपाडा प्रकल्पाच्या बदल्यात वांजूळ पाणी-मांजरपाडा-२ प्रकल्प मंजूर करत व दोन्ही प्रकल्पाचे काम एकाच वेळी सुरू करण्याचे आश्वासन तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी दिले होते.

दशक उलटूनही त्याची पूर्तता झालेली नसतानाच श्री. पवार यांनी नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची घोषणा बीड येथे केली. या घोषणेमुळे गिरणा खोऱ्याला पुन्हा उपाशी ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पवार आपल्या सहकाऱ्यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी कसमादेकरांच्या हक्काचे नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी एक लाख कोटी खर्च आला तरी चालेल नारपारचे पाणी बीडला पोहोचवू, अशी घोषणा त्यांनी केली. श्री. भुजबळ हेदेखील व्यासपीठावर होते.

Girna Valley
Rain Update : अकोला जिल्ह्यात २० मंडलांत पावसाचा खंड

त्यांनी मांजरपाडा देवसाने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. नारपार खोऱ्यातले पाणी गोदावरी खोऱ्यात पळविले. आता हीच रणनीती वापरून पुन्हा कसमादेवर अन्याय करणार का? हे सुरू असताना खानदेशचे मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, भारती पवार शांत कसे? हा प्रश्न आहे. या नेत्यांनी एकत्र येऊन सर्व ताकद पणाला लावून वांजूळ पाणीप्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन खानदेशवासीयांतर्फे करण्यात आले.

ना मंजुरी, ना हालचाली

पालकमंत्री भुसे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येथील विभागीय आढावा बैठकीत मालेगाव जिल्हानिर्मिती, नारपार- वांजूळ पाणी या मागण्या केल्या. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी मांडून लक्ष वेधले.

जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दोन महिन्यांत प्रकल्पाला मान्यता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नऊ महिने उलटूनही मंजुरी मिळाली नाही.

नारपारच्या पाण्यावर गिरणा खोऱ्याचा दावा नैसर्गिक असताना हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. आहिरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, निखिल पवार आदींनी दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com