
Kolhapur Snake Bite News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या वाकरे गावातील एका शेतकऱ्याचा शेतातील फुले तोडत असताना सर्पदंश होऊन मृत्यू झाला. दरम्यान ही घटना ताजी असताना गावातीलच एका ८ वर्षीय मुलाचा सापावर पाय पडल्याने घाबरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच गावातील दोन व्यक्तींचा मृत्यू एकाच कारणाने झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकरे गावचे शेतकरी बाजीराव पांडुरंग लोंढे यांच्यावर लहानवयातच मोठी जबाबदारी पडली होती. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईच्या मदतीने मोठ्या कष्टाने लोंढे काबाड कष्ट करत आपल्या जिवनाचा गाडा चालवत होते. परंतु अचानक मागच्या दोन दिवसांत त्यांच्यावर काळाने घाला घातला. शेतात फुले तोडत असताना सर्पदंश झाला आणि काय चावले हे कळेपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले. सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच काल(ता.१७) त्यांचा मृत्यू झाला.
बाजीराव यांच्यावर लहानवयातच घराची सर्वच जबाबदारी पडली होती त्यांनी तीन बहिणींची लग्ने केली. याचबरोबर आपलाही संसार स्थिरस्थावर करून आता कोठे सुखाचे चार दिवस आले होते, तोपर्यंत त्यांच्यावर काळाने असा दुर्दैवी घाला घातला. दूध व्यवसायाबरोबर फुलाची शेती असल्याने ते सकाळी लवकर फुले तोडण्यासाठी शेतात जात होते. गुरुवारी फुले तोडत असताना काहीतरी टोचल्यासारखे झाले.
किडी किंवा तार टोचली असेल म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत फुले तोडली. थोड्यावेळाने अस्वस्थ वाटू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या खाऊन ते झोपले. त्याच ठिकाणी ते बेशुद्ध पडले, गुरुवारी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांना मृत्यूने गाठले. बाजीरावर हे केदारलिंग पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान वाकरे गावात अशीच एक दुसरी घटना समोर आली आहे. अर्णव नवनाथ चौगले (वय ८) या मुलाचा शाळेच्या आवारात खेळताना लहान मुलाचा सापावर पाय पडला होता याच्या भीतीने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
गावातील खासगी इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये अर्णव शिकत होता. शाळेच्या आवारात खेळताना त्याचा सापावर पाय पडला. घरी आई-वडिलांना त्याने याची कल्पना दिली. त्याच्या शरीरावर व पायावर ओरखडाही नव्हता. यामुळे नातेवाइकांनी नि:श्वास सोडला; पण सापावर पडलेल्या पायामुळे तो भीतीने अस्वस्थ झाल्याने ताप भरू लागला होता. त्याला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण सर्पदंशाचे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसले तरी त्याचा ताप काही कमी होत नसल्याने नातेवाइकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण तो अत्यवस्थेत गेला. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. वाकरे गावात एकाच दिवशी सर्पदंशाशी संबंधित या दोन घटना घडल्याने शोककळा पसरली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.