Bhogawati Sugar Factory Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नेहमी चर्चेत राहिलेल्या भोगावती कारखान्याच्या निवडणूक पुढच्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान यापार्श्वभूमिवर विरोधकांनी रान उठवण्यास सुरूवात केली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी पी.एन. पाटील यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आता भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार- पाटील यांनी टीका केली आहे.
यावेळी पाटील म्हणाले की, भोगावती कारखान्याच्या संचालक मंडळाने कर्जमुक्तीऐवजी कारखान्यावर डोंगरच उभा केला आहे. याला सर्वस्वी कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील हे जबाबदार असून त्यांनी सभासदांचा विश्वासघात केला. त्यांना त्यांची जागा दाखवा,’ असे आवाहन भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार- पाटील यांनी केले. ते येळवडे (ता. राधानगरी) येथे सर्वपक्षीय भोगावती बचाव परिवर्तन आघाडीच्या संपर्क दौऱ्यात बोलत होते.
पवार -पाटील म्हणाले, ‘पी. एन. पाटील यांच्या पॅनेलला विश्वासाने सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिले. जेव्हा त्यांच्याकडे सत्ता गेली तेंव्हा सत्तर कोटीचे कर्ज होते हेही त्यांनी मान्य केले. मोठा नेता असल्याने कारखाना कर्जमुक्त होईल आणि आमचं भलं होईल अशी भावना सभासदांची होती.
मात्र, गेल्या सहा वर्षांचा कारभार पाहता अक्षरशः लूट केली आहे. मिळेल त्या मार्गातून पैसा मिळवणे हे एकमेव काम करून कारखाना डबघाईला आणला आहे. ना कामगारांच्या पगारांचे प्रश्न सोडवले ना सभासदांच्या साखरेबाबत मार्ग काढला. ७० कोटीतले ७० रुपयेही कमी करता आले नाहीत. उलट ३७० कोटी रुपये लादले. आता त्यांना हद्दपार करण्याची जबाबदारी सभासदांची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भोगावतीची बदनामी थांबवा...
भोगावती सहकारी साखर कारखान्याची साखर परस्पर विकली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत केला होता. यावरून आता भोगावतीच्या संचालकांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगत अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भोगावती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्य उदयसिंह पाटील कौलवकर म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर भोगावती साखर कारखान्याची बदनामी करुन काहीजण द्वेषाचे राजकारण करत आहेत. भोगावतीमधील साखर विक्री रितसर आणि नियमानुसार होत आहे. परंतु, जे बदनामी करत आहेत त्याच्यांवर कायदेशीर सल्ला घेऊन कारखान्याच्यावतीने अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे कौलवकर म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.