
राज्याच्या अनेक भागांत गुरुवारी पावसाचा जोर (Rain Intensity) वाढला होता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी (Heavy Rainfall) लावली. मराठवाडा आणि विदर्भातही काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत काही मंडळांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केलाय.
कोकणात अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. बहुतांशी भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर काही नद्यांची पाणीपतळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त होतेय. किनारपट्टीलगच्या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु होता. पुणे जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केली होती. दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, मुळशी, चासकमान या धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिल्या.सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण व जावळी तालु्क्यात काही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. नाशिक जिल्ह्यातही बहुतांश भागांत जोरदार पाऊस सुरु आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत शुक्रवारी सकाळीपासून ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील 48 मंडळात शुक्रवारी हलका पाऊस झाला. पैठण तालुक्यातील बऱ्याच भागात हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
विदर्भातही ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यात काही मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही काह मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्येही पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात काही मंडळांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.