Sunil Chavan : शेतकऱ्यांसाठी आम्ही उत्तम काम करून दाखवू
पुणे : मी शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांमध्ये वावरणारा तसेच ग्रामीण (Rural) व कृषी क्षेत्राशी (Agriculture Sector) सतत निकटचा संबंध ठेवणारा अधिकारी आहे. आयुक्तपदाची जबाबदारी शासनाने माझ्यावर सोपवत शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्याची संधी दिली आहे. मी आणि माझे सर्व कर्मचारी, अधिकारी कृषी खात्यासाठी (Agriculture Department) उत्तम काम करून दाखवू, असा निर्धार राज्याचे नवे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी बुधवारी (ता. ३०) येथे पदभार स्वीकारल्यानंतर ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला.
कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी सूत्रे स्वीकारत लगेच एक धडाकेबाज बैठक घेतली. राज्याच्या कृषी खात्यातील योजनांची स्थिती, उपक्रम तसेच काही धोरणात्मक बाबी बारकाईने समजून घेतल्या. या बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी ‘अॅग्रोवन’शी संवाद साधला.
‘‘पहिल्याच दिवशी एकदम काही सांगता येत नाही. मात्र राज्याचे सर्वांत मोठे कृषी भवन पुण्यात साकारत आहेत. त्या प्रकल्पाला चालना देणे, जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यासाठी मापदंडांमध्ये सुधारणा करणे, केंद्र पुरस्कृत योजनेत यांत्रिकीकरणासाठी आलेल्या निधीचा वापर करणे, संगणकीकरणातील अडचणी करण्यासाठी महाआयटीसोबत चर्चा करणे तसेच राज्यातील एफपीसींना (शेतकरी उत्पादक कंपनी) चालना देण्यासाठी प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घेणे अशा काही विषयांवर आमची चर्चा झाली आहे. याच विषयांना पुढे नेण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे,’’ असे कृषी आयुक्त म्हणाले.
कृषी विस्ताराबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, ‘‘विस्ताराच्या आधीच्या योजना चालू आहेच. आम्ही जरा राज्याची आणखी गरज तपासून भविष्यात विस्तार कामाला चालना देऊ. अर्थात, विविध प्रदर्शने, मेळावे, बैठकांमधून शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा प्रयत्न कृषी खात्याचा राहील. उदाहरणार्थ, सध्या आम्ही मराठवाड्याच्या सिल्लोड भागात एक आगळेवेगळे कृषी प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
त्यात शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच शेतकरी आपापल्या पातळीवर गरजेनुरूप काही संशोधन करीत उपकरणे तयार करतात. त्याला ग्रामीण भागात ‘जुगाड’ म्हणतात. हे तंत्र खूप उपयुक्त असते. या तंत्रांना व्यासपीठ मिळवून देत त्याचा प्रसार करण्यावरदेखील आमचा भर राहील.’’
बैठकीस संचालक दिलीप झेंडे (निविष्ठा व गुणनियंत्रण), संचालक सुभाष नागरे (प्रक्रिया व नियोजन), संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण), संचालक दशरथ तांभळे (आत्मा), मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, सहसंचालक तुकाराम मोटे, उपसंचालक पांडुरंग सिगेदार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, लोकप्रतिनिधींनी आणि बीड जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी श्री. चव्हाण यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.